तैवान हा चीनचा भाग नाही – अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ

तैवान हा चीनचा भाग नाही – अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ

वॉशिंग्टन – ‘तैवान हा चीनचा भाग नाही आणि यासंदर्भातील धोरण साडेतीन दशकांपूर्वी रिगन प्रशासनाने निश्चित केले होते. अमेरिका आजही त्याचे पालन करीत असून हे धोरण दोन्ही पक्षांनी मान्य केले आहे’, अशी स्पष्ट ग्वाही अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी दिली. पॉम्पिओ यांच्या या वक्तव्याने चीन चांगलाच बिथरला असून, आपल्या हितसंबंधांना धक्का देणाऱ्यांना कठोर प्रत्युत्तर दिले जाईल, अशा शब्दात धमकावले आहे. त्याचवेळी तैवानने अमेरिकी परराष्ट्रमंत्र्यांच्या विधानाचे स्वागत केले असून, तैवान हा सार्वभौम व स्वतंत्र देश असल्याचा पुनरुच्चार केला आहे.

चीनचा भाग

अमेरिकेतील रेडिओ नेटवर्कवरील एका मुलाखतीत, सूत्रधार ह्युज हेविट यांनी, ट्रम्प प्रशासनाचे तैवान धोरण व चीनकडून देण्यात येणाऱ्या धमक्या यासंदर्भात प्रश्न विचारला होता. त्याला उत्तर देताना परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी तैवान चीनचा भाग नसल्याचे सांगितले. चीनने तैवानला यापूर्वी दिलेली वचने पाळायला हवीत, असा इशाराही अमेरिकी परराष्ट्रमंत्र्यानी यावेळी दिला.

चीनचा भाग

अमेरिका तैवानप्रति वचनबद्ध असून ही वचने पूर्ण करणे महत्त्वाचे आहे. तैवानची संरक्षणक्षमता वाढविण्यासाठी अमेरिकेने प्रगत शस्त्रांची विक्री करण्याचा निर्णयही घेतला आहे. चीन व तैवानने परस्परांना दिलेली वचने पाळली जावीत, या हेतूने अमेरिकेने ही पावले उचलली आहेत’, या शब्दात परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी अमेरिकेची तैवानसंदर्भातील भूमिका बदलणार नसल्याचे संकेतही दिले. यावेळी अमेरिकी परराष्ट्रमंत्र्यांनी चीनच्या कम्युनिस्ट पार्टीलाही लक्ष्य करून, त्यांच्या कारवायांचा धोका टाळण्यासाठी अमेरिकेकडून सुरू असणारी मोहीम अजून संपली नसल्याचे बजावले. व्हाईट हाऊससह परराष्ट्र व कोषागार विभागाकडून लवकरच चीनविरोधात निर्णयांची घोषणा केली जाईल, असे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी सांगितले.

चीनचा भाग

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तैवानबरोबरील सहकार्याच्या मुद्द्यावर अधिक सक्रीय भूमिका घेतली आहे. अमेरिकेने तैवानमध्ये सुरू केलेले राजनैतिक कार्यालय, अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी घेतलेली तैवानच्या नेत्यांची भेट आणि वाढते संरक्षण सहकार्य या गोष्टी ट्रम्प यांच्या भूमिकेचा भाग मानल्या जातात. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी, तब्बल तीन दशकांच्या कालावधीनंतर तैवानला लढाऊ विमानांचा पुरवठा करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता. त्यापाठोपाठ तैवानला आधुनिक क्षेपणास्त्रे, टॉर्पेडो व प्रगत संरक्षण यंत्रणाही पुरविण्यात येत आहेत. अमेरिकेने तैवाननजीकच्या सागरी क्षेत्रातील तैनातीही वाढविली असून विमानवाहू युद्धनौकांसह विनाशिका, ड्रोन्स, टेहळणी विमाने व लढाऊ विमाने यांचा वावर वाढला आहे.

अमेरिकेच्या या भूमिकेवर चीनने वारंवार नाराजी व्यक्त करून इशारेही दिले होते. अमेरिकेने त्याकडे सर्रास दुर्लक्ष केले असून, आपली आक्रमक भूमिका कायम ठेवली आहे. मात्र परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी तैवान चीनचा भाग नसल्याचे सांगणे, हे चीनच्या ‘वन चायना पॉलिसी’ला दिलेले उघड आव्हान ठरते. काही महिन्यांपूर्वी अमेरिकेने चीनचा ‘साऊथ चायना सी’वरील दावा नाकारून मोठा धक्का दिला होता. त्यानंतर आता चीनच्या तैवानवरील दाव्यालाही झटका देऊन, चीनविरोधातील राजनैतिक संघर्ष नव्या टप्प्यावर नेण्याचे संकेत दिले आहेत.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info