इस्रायल-अरब देशांच्या सहकार्यामुळे इराण अधिकच एकटा पडला आहे – अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ

इस्रायल-अरब देशांच्या सहकार्यामुळे इराण अधिकच एकटा पडला आहे – अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ

जेरूसलेम – गेल्या काही आठवड्यांमध्ये इस्रायल तसेच ‘संयुक्त अरब अमिरात’ (युएई) व बहारिन यांच्यात झालेल्या सहकार्य कराराचे जगभरातून स्वागत झाले. पण जसजसे या सहकार्याचे जगभरातून स्वागत होत गेले तसतसा इराण अधिकच एकटा पडत गेला’, अशी घोषणा अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी केली. त्याचबरोबर इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला खामेनी यांच्याशी संबंधित संघटनेला लक्ष्य करणारे नवे निर्बंध लादत असल्याचेही अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी जाहीर केले.

इराण अधिकच एकटा

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री पॉम्पिओ इस्रायलच्या दौऱ्यावर दाखल झाले असून त्यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू तसेच इस्रायल भेटीवर असलेल्या बाहरिनचे परराष्ट्रमंत्री ‘अब्दुलतिफ बिन राशिद अल झयानी’ यांच्याशी चर्चा केली. इस्रायल आणि युएई व बाहरिनमधील सहकार्य इराणसाठी संदेश देणारा असल्याचे पॉम्पिओ म्हणाले.

या सहकार्यामुळे इराणसारख्या दुष्ट देशांचा प्रभाव ओसरत चालला असून इराण अधिकाधिक एकटा पडत चालला आहे. इराणने वेळीच आपली दिशा बदलली नाही तर इराण कायमस्वरूपी बहिष्कृत होईल, असा इशारा पॉम्पिओ यांनी दिला. त्याचबरोबर पॉम्पिओ यांनी इराणवर नवे निर्बंध लादत असल्याची घोषणाही केली.

इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला खामेनी यांच्याशी संलग्न असलेली ‘मुस्ताझफान फाऊंडेशन’ आणि 160 सहाय्यक कंपन्यांना लक्ष्य करणारे निर्बंध लादल्याचे पॉम्पिओ तसेच अमेरिकेच्या कोषागार विभागाने जाहीर केले. या व्यतिरिक्त इराणच्या गुप्तचर यंत्रणेचे प्रमुख महमूद अलावी यांच्यावरही अमेरिकेने निर्बंध लादले आहेत. त्याचबरोबर इराणवरील निर्बंध काढले तर या क्षेत्रातील शांततेसाठी प्रस्थातिप झालेले सहकार्य बाधित होईल आणि याचा फायदा इराणलाच होईल, असे पॉम्पिओ म्हणाले.

अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केलेले सदर विधान अमेरिकेचे भावी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या इराण धोरणाला उद्देशून असल्याचा दावा केला जातो. बायडेन यांनी इराणवरील निर्बंध शिथिल करुन इराणला पुन्हा अणुकरारात सामील करण्याचे संकेत काही आठवड्यांपूर्वी दिले होते. तर इराणने देखील बायडेन नव्याने अणुकरार करतील, असा विश्‍वास व्यक्त केला होता.

दरम्यान, अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री पॉम्पिओ गुरुवारी इस्रायलच्या ताब्यातील गोलान टेकड्यांना भेट देणार असल्याची बातमी समोर आली आहे. पॅलेस्टाईनने पॉम्पिओ यांच्या या भेटीचा कडाडून विरोध केला आहे.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info