Breaking News

सिरियाच्या हमा प्रांतात इस्रायलचे हवाई हल्ले – सिरियन संरक्षण मंत्रालयाचा आरोप

दमास्कस – सिरियाच्या पश्‍चिमेकडील हमा प्रांतात इस्रायलच्या लढाऊ विमानांनी हवाई हल्ले चढविले. पण सिरियाच्या हवाई सुरक्षा यंत्रणांनी इस्रायलचे हे बहुतांश हवाई हल्ले यशस्वीरित्या भेदल्याचा दावा सिरियाच्या संरक्षण मंत्रालयाने केला आहे. इस्रायली विमानांनी लेबेनॉनच्या हवाई हद्दीत घुसून सिरियावर हे हल्ले चढविल्याचा आरोप सिरियाने केला आहे. तर इस्रायलने सिरियातील इराणच्या लष्करी तळाला लक्ष्य करून चढविलेल्या हल्ल्यात सहा दहशतवादी ठार झाल्याचा दावा सिरियातील मानवाधिकार संघटनेने केला आहे. इस्रायलच्या लढाऊ विमानांनी गुरुवारी मध्यरात्रीनंतर हे हवाई हल्ले सुरू केल्याचा आरोप सिरियन संरक्षण मंत्रालयाने केला. हमा प्रांतातील ‘मसयाफ’ या शहरावर इस्रायलने रॉकेट्सचा मारा केला. हे हल्ले चढवून इस्रायलने आपली आक्रमक मानसिकता दाखवून दिल्याची टीका संरक्षण मंत्रालयाने केली. तसेच सिरियाच्या हवाई सुरक्षा यंत्रणेने इस्रायलचे रॉकेट्स हाणून पाडल्याचेही सिरियन संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.

हमा प्रांतावर हल्ले चढविण्यासाठी इस्रायलच्या लढाऊ विमानांनी लेबेनॉनची राजधानी बैरूतची हवाई हवाई हद्द पार केली व सिरियाच्या सीमेजवळ असलेल्या ‘त्रिपोली’ या लेबेनीज शहरापर्यंत धडक मारुन हल्ले चढविले, असे सिरियन संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. इस्रायलच्या या हवाई हल्ल्यात किती नुकसान झाले, याचे तपशील देण्याचे सिरियन संरक्षण मंत्रालयाने टाळले. पण सिरियातील मानवाधिकार संघटना या हल्ल्यांबाबत वेगळी माहिती देत आहेत.

शुक्रवारी इस्रायली लढाऊ विमानांनी चढविलेल्या हल्ल्यात ‘मसयाफ’ शहरातील इराणच्या लष्करी तळाला लक्ष्य केले. या हल्ल्यात इराणसंलग्न दहशतवादी संघटनेचे सहा जण ठार झाल्याची माहिती या मानवाधिकार संघटनेने दिली. सिरियन संरक्षण मंत्रालयाने केलेल्या या आरोपांवर इस्रायल सरकार किंवा लष्कराने यावर प्रतिक्रिया दिलेली नाही.

हमा प्रांतातील ‘मसयाफ’ शहर हे लष्करीदृष्ट्या अतिशय महत्त्वाचे ठिकाण मानले जाते. या शहरामध्ये सिरियन लष्कराची अकादमी तसेच लष्कराशी संबंधित विज्ञान संशोधन केंद्र देखील आहे. या व्यतिरिक्त ‘मसयाफ’ शहरामध्ये इराणच्या जवानांचा तसेच इराणसंलग्न दहशतवादी संघटनांचा मोठा प्रभाव असल्याचाही दावा केला जातो. येथील इराणच्या तळाला तसेच ठिकाणांना लक्ष्य करण्यासाठी इस्रायलने याआधीही हल्ले चढविल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या.

गेल्याच महिन्यात इस्रायलने सिरियाच्या गोलान भागात हल्ले चढविले होते. या हल्ल्यात इस्रायलने इराणच्या कुद्स फोर्सेसचे जवान व इराणसंलग्न दहशतवादी संघटनांना लक्ष्य केले होते. इराणने सदर वृत्त फेटाळले होते. पण इस्रायलच्या या कारवाईत किमान आठ जण ठार झाल्याची माहिती सिरियातील मानवाधिकार संघटनांनी दिली होती.

त्यानंतर इस्रायलच्या गोलान टेकड्यांजवळ सिरियन लष्कराने हालचाली वाढविल्याची माहिती समोर आली होती. या लष्करी हालचालीच्या आड इराण, हिजबुल्लाह व इराणसंलग्न दहशतवादी संघटना इस्रायलच्या सीमेजवळ तळ ठोकण्याची तयारी करीत असल्याचा आरोप इस्रायलने केला होता. यानंतर इस्रायलने गोलान टेकड्यांच्या भागात मोठ्या प्रमाणात लष्करी जमवाजमव केली होती. यामुळे गोलान भागात तणाव निर्माण झाला होता.

English  हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info