अमेरिकेच्या परराष्ट्र विभागावर रशियाचा सायबरहल्ला झाल्याचे उघड – अमेरिकी अधिकार्‍यांचा आरोप

अमेरिकेच्या परराष्ट्र विभागावर रशियाचा सायबरहल्ला झाल्याचे उघड – अमेरिकी अधिकार्‍यांचा आरोप

वॉशिंग्टन/मॉस्को – अमेरिकेच्या परराष्ट्र विभागावर रशियाने सायबरहल्ला केल्याचे उघड झाले आहे. या हल्ल्यात रशियन हॅकर्सनी परराष्ट्र विभागाच्या अधिकार्‍यांचे हजारो ईमेल्स चोरल्याचे सांगण्यात येते. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात अमेरिकेतील ‘फायर आय’ व ‘सोलरविंड्स’ या माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांवर मोठा सायबरहल्ला करण्यात आला होता. रशियाने चढविलेल्या या हल्ल्यात अमेरिकेच्या ‘न्यूक्लिअर वेपन्स नेटवर्क’सह अर्थ, ऊर्जा व व्यापार विभागाच्या कॉम्प्युटर सिस्टिम्सना लक्ष्य करण्यात आल्याचे समोर आले होते. मात्र परराष्ट्र विभागावरील हल्ला याच हल्ल्याचा भाग आहे का याची माहिती अमेरिकी यंत्रणांनी उघड केलेली नाही.

मंगळवारी अमेरिकेतील काही माध्यमांनी रशियाच्या सायबरहल्ल्याचे वृत्त प्रसिद्ध केले. या वृत्तात बायडेन प्रशासन तसेच संसदेतील सूत्रांच्या हवाल्याने माहिती देत असल्याचा दावा करण्यात आला आहे. रशियन हॅकर्सनी चढविलेल्या सायबरहल्ल्यात परराष्ट्र विभागाच्या ‘ब्युरो ऑफ युरोपियन ऍण्ड युरेशियन अफेअर्स’ तसेच ‘ब्युरो ऑफ इस्ट एशियन ऍण्ड पॅसिफिक अफेअर्स’च्या ईमेल्सना लक्ष्य करण्यात आले. परराष्ट्र विभाग तसेच व्हाईट हाऊसकडून या हल्ल्याबाबत प्रतिक्रिया आली असली तरी ठोस माहिती देण्यात आलेली नाही.

आम्ही सायबरहल्ल्यांचा मुद्दा गांभीर्याने हाताळतो आहोत, असे परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्यांनी म्हटले आहे. तर, विशिष्ट विभागावरील सायबरहल्ल्यांसंदर्भात व्हाईट हाऊस निवेदन देणार नाही, असे राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागार ऍन न्यूबर्गर यांनी सांगितले. गेल्या दशकभरात रशियाने अमेरिकेच्या परराष्ट्र विभागावर सायबरहल्ला करण्याची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी २०१४ साली रशियन हॅकर्सनी अमेरिकेच्या परराष्ट्र विभागावर सायबरहल्ला चढविल्याचे उघड झाले होते.

गेल्या वर्षी अमेरिकेच्या खाजगी कंपन्या तसेच सरकारी विभागांवर झालेल्या सायबरहल्ल्यांमागे रशियाचाच हात असल्याचे स्पष्ट झाले होते. अमेरिकेचे माजी परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी सदर हल्ल्यामागे रशियाचा हात असल्याची स्पष्ट कबुली दिली होती. अमेरिकेतील ‘सायबरसिक्युरिटी ऍण्ड इन्फ्रास्ट्रक्चर सिक्युरिटी एजन्सी’सह (सीआयएसए) ‘होमलँड सिक्युरिटी’, ‘एफबीआय’ व ‘नॅशनल सिक्युरिटी एजन्सी’ या प्रमुख यंत्रणांनी हल्ल्यामागे रशियाच असल्याचा अहवाल दिला होता. या अहवालात हल्ल्याची व्याप्ती अद्याप पूर्णपणे स्पष्ट झाली नसल्याचेही बजावले होते.

त्यानंतर जानेवारी महिन्यात राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतलेल्या ज्यो बायडेन यांनी प्रशासनाला प्रत्युत्तर देण्याची योजना सादर करण्याचे निर्देश दिले होते. रशियाच्या या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याची तयारी अमेरिकी प्रशासनाने केली असून रशियन नेटवर्क्सवर छुपे सायबरहल्ले चढविले जातील, असे संकेत अमेरिकी अधिकार्‍यांकडून देण्यात आले होते. अमेरिकेच्या या योजनेवर रशियाकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली होती. या पार्श्‍वभूमीवर, रशियाच्या नव्या सायबरहल्ल्याबाबत वृत्त प्रसिद्ध होणे लक्ष वेधून घेणारे ठरते.

दरम्यान, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी इंटरनेटच्या वापराबाबत एक आंतरराष्ट्रीय करार होणे आवश्यक आहे, असे आवाहन केल्याचे वृत्त रशियन माध्यमांनी दिले आहे.

English  हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info