Breaking News

इराणचे युरेनियम संवर्धन अणुकरार संकटात टाकणारे – युरोपिय महासंघाची टीका

ब्रुसेल्स/व्हिएन्ना – ‘इराणचा अणुकरार वाचवायचा असेल तर काही आठवडेच आपल्या हातात आहेत. कारण इराण ज्या वेगाने युरेनियमचे संवर्धन करीत आहे. आत्ताच्या घडीला इराणकडे महिन्याभरात इराणकडे १० किलोपर्यंत युरेनियमचे संवर्धन करण्याची क्षमता आलेली आहे’, असा इशारा आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष राफेल ग्रॉसी यांनी दिला. तर आतापर्यंत अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात जाऊन इराणच्या अणुकराराचे समर्थन करणार्‍या युरोपिय महासंघाने इराणला स्पष्ट शब्दात खडसावले आहे. ‘युरेनियमचे संवर्धन २० टक्क्यांपर्यंत वाढविण्याची इराणची घोषणा पाच वर्षांपूर्वीच्या अणुकराराला संकटात टाकणारी ठरते. इराणने तत्काळ ही प्रक्रिया थांबवावी’, असे आवाहन महासंघाने केले आहे.

गेल्या आठवड्यात इराणने आपल्या अणुकार्यक्रमाबाबत धडाधड घोषणा केल्या. २०१५ सालच्या अणुकराराचे उल्लंघन करून इराणने फोर्दो अणुप्रकल्पात युरेनियमचे संवर्धन सुरू केले. तसेच युरेनियमच्या संवर्धनाची मात्रा २० टक्क्यांपर्यंत नेण्याची प्रक्रिया सुरू केल्याचेही इराणने जाहीर केले. याबरोबर १००० सेंट्रीफ्यूजेसवरही काम सुरू असल्याची माहिती इराणने सार्वजनिक केली. तर दोन दिवसांपूर्वीच इराणच्या मागण्या मान्य केल्या नाही तर अणुऊर्जा आयोगाच्या निरिक्षकांची हकालपट्टी करू, असे संसद सदस्याने धमकावले. आधीच इराणच्या संसदेने या निरिक्षकांना अणुप्रकल्पाच्या पाहणीसाठी प्रवेश नाकारला आहे.

आत्ता आत्तापर्यंत इराणबरोबरच्या अणुकराराचे समर्थन करणारे ब्रिटन, फ्रान्स व जर्मनी हे युरोपमधील ‘ई-३’ देश देखील अडचणीत सापडले आहेत. गेल्या आठवड्यात ‘ई-३’ सदस्य देशांनी संयुक्त निवेदनाद्वारे इराणच्या हालचालींवर ताशेरे ओढले होते. तसेच इराण २०१५ सालच्या अणुकराराचे उल्लंघन करीत असल्याची टीका या देशांनी करून दिली होती. साधारण या सारखीच भूमिका सोमवारी युरोपिय महासंघाने देखील घेतली. फोर्दो येथील भुमिगत अणुप्रकल्पातील युरेनियमचे संवर्धन २० टक्क्यांपर्यंत नेण्याची घोषणा करणार्‍या इराणचे हेतू चिंता वाढविणारे असल्याची टीका महासंघाच्या परराष्ट्र धोरणाचे प्रमुख जोसेफ बोरेल यांनी केली.

‘इराणची ही कारवाई २०१५ सालच्या अणुकरारातील अटींचे उल्लंघन ठरते. तसेच यामुळे अणुकरार संकटात येईल आणि अमेरिकेला नव्याने या करारात सहभागी करून घेणे अवघड होईल’, याची जाणीव बोरेल यांनी करुन दिली. ‘अणुकराराचे उल्लंघन केले म्हणून इराणला परिणामही भोगावे लागू शकतात. तेव्हा इराणने हे प्रकरण चिघळण्याआधी या प्रक्रियेतून माघार घ्यावी’, असे आवाहन बोरेल यांनी केले. तर ‘आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोग’चे (आयएईए) अध्यक्ष ग्रॉसी यांनी इराणच्या हालचालींपासून आंतरराष्ट्रीय समुदायाला सावध केले.

अमेरिकेचे भावी राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी इराणबरोबर नव्याने अणुकरार करण्यासाठी उत्सूक असल्याचे म्हटले होते. पण इराणबरोबरील अणुकरार वाचविण्यासाठी आपल्याकडे महिने नाही तर अवघे काही आठवडे शिल्लक असल्याचे ग्रॉसी म्हणाले. तसेच युरेनियमचे संवर्धन वाढविण्याचा निर्णय इराणच्या संसदेने जाहीर केला होता. त्यामुळे संसदेच्या निर्णयानुसार, इराण २० टक्क्यांपर्यंत नेईल, याची आठवण ग्रॉसी यांनी करून दिली.

इराण कधीपर्यंत २० टक्क्यांच्या लक्ष्यापर्यंत पोहोचेल, याबाबत ग्रॉसी यांना यावेळी प्रश्‍न विचारण्यात आला. तेव्हा, ‘याबाबत माहिती उघड करता येणार नाही. पण इराणच्या अणुकार्यक्रमाचा वेग आणि त्यांच्याकडे असलेली यंत्रणा पाहता महिन्याभरात इराण १० किलो किंवा त्याहून थोडे अधिक संवर्धित युरेनियमचे संवर्धन करू शकेल’, असे सांगून ग्रॉसी यांनी इराणच्या युरेनियमचा वेग वाढत असल्याचे स्पष्ट केले.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info