Breaking News

बायडेन प्रशासनाकडून सौदीच्या क्राऊन प्रिन्स विरोधात कारवाईचे संकेत

वॉशिंग्टन – पत्रकार जमाल खाशोगी यांची हत्या सौदीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्या आदेशानेच करण्यात आल्याचा आरोप अमेरिकेच्या गुप्तचर विभागाने केला आहे. गुप्तचर विभागाने यासंदर्भातील अहवाल प्रसिद्ध केला असून माध्यमांनी ही बातमी उचलून धरली आहे. पुढच्या काळात सौदीच्या क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांना अमेरिका लक्ष्य करणार असल्याचे संकेत याद्वारे दिले जात आहे. बायडेन प्रशासनाने याची तयारी केल्याच्या बातम्या याआधीच प्रसिद्ध झाल्या होत्या. मात्र सौदीच्या सत्तेवर घट्ट पकड बसविण्यात यशस्वी ठरलेल्या प्रिन्स मोहम्मद यांना हटविण्याच्या बायडेन प्रशासनाच्या प्रयत्नांना यश मिळेल का, यावर अमेरिकन विश्‍लेषकांमध्येच मतभेद असल्याचे समोर येत आहे.

२ ऑक्टोबर २०१८ रोजी तुर्कीच्या इस्तंबूल येथील सौदी अरेबियाच्या उच्चायुक्तालयात खाशोगी यांची हत्या करण्यात आली होती. अमेरिकेतील आघाडीच्या वृत्तपत्रासाठी काम करणार्‍या खाशोगी यांच्या हत्येचे पाश्‍चिमात्य जगतात मोठे पडसाद उमटले होते. सौदीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी खाशोगी यांच्या हत्येची आदेश दिल्याचा ठपकाही ठेवण्यात आला होता. सौदीने सुरुवातीला हे आरोप फेटाळले होते. अमेरिकेचे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील सौदीबरोबरच्या मैत्रीपूर्ण संबंधाना अधिक महत्त्व देऊन यावर कारवाई करण्याचे टाळले होते.

पण बायडेन प्रशासन खाशोगी हत्येचे प्रकरण बाहेर काढणार, क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्यासमोरील अडचणी वाढविणार, अशी चर्चा आहे. त्यानुसार बायडेन प्रशासनाने अमेरिकेच्या गुप्तचर विभागाचा खाशोगी प्रकरणाचा चौकशी अहवाल शुक्रवारी प्रसिद्ध केला. यामध्ये क्राऊन प्रिन्स यांनी खाशोगी यांना अटक किंवा जीवे मारण्याचे आदेश दिले होते, असे म्हटले आहे. २०१७ सालापासून प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी सौदीच्या राजवटीची सत्तेवर पकड घेतल्याचा दावा केला आहे. त्यामुळे त्यांच्या आदेशाशिवाय ही कारवाई होऊच शकत नसल्याचा दावा यात करण्यात आला आहे.

दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्या पुढील चार वर्षांच्या कार्यकाळात अमेरिका आणि सौदीतील संबंध तणावपूर्ण असतील, अशी दाट शक्यता समोर येत आहे. या काळात इराणबरोबरचा अणुकरार, सौदीने पुकारलेला येमेनमधील संघर्ष, लिबिया तसेच मानवाधिकारांच्या मुद्यांवरुन अमेरिका व सौदीमध्ये मतभेद निर्माण होतील. तसेच सौदीसमोर आव्हानेही उभे राहतील, असा इशारा अमेरिकी विश्‍लेषकाने इराणी वर्तमानपत्राशी बोलताना दिला. बायडेन प्रशासनाने खाशोगी हत्येप्रकरणी क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांना लक्ष्य करून त्याचे संकेत दिले आहेत.

English  हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info