सौदीने स्फोटकांनी सज्ज ड्रोन बोट उद्ध्वस्त केली – रेड सीमधील मोठा घातपाती कट उधळल्याचा सौदीचा दावा

सौदीने स्फोटकांनी सज्ज ड्रोन बोट उद्ध्वस्त केली – रेड सीमधील मोठा घातपाती कट उधळल्याचा सौदीचा दावा

दुबई – रेड सीच्या क्षेत्रात असणार्‍या आपल्या ‘यांबू’ बंदरावर भयंकर दहशतवादी हल्ला उधळल्याचा दावा सौदी अरेबियाने केला आहे. स्फोटकांनी भरलेली ड्रोन बोट या बंदरावर आदळविण्याची हल्लेखोरांची योजना होती. या क्षेत्रातून होणार्‍या सौदीच्या इंधन व्यापाराला हादरे देण्यासाठी हे कारस्थान आखले होते. पण त्याआधीच सदर बोट नष्ट करून हे कारस्थान हाणून पाडल्याचे सौदीने जाहीर केले. हा कट प्रत्यक्षात उतरल्यास आखाती क्षेत्रात हाहाकार माजला असता. त्यामुळे फार मोठी दुर्घटना टळल्याचे दावे केले जात आहेत.

सौदी अरेबियाच्या पश्‍चिमेकडील यांबू आणि राबिघ या दोन बंदराच्या मधोमध ही घटना घडली. मंगळवारी सकाळी रिमोट कंट्रोलवर चालणारे आणि स्फोटकांनी भरलेले मोठे जहाज यांबू बंदराच्या दिशेने धोकादायकरित्या प्रवास करीत होते. यावेळी सदर बंदरात इंधनाची वाहतूक करणारी जहाजे होती. त्यामुळे या सागरी क्षेत्राचा व इतर जहाजांच्या सुरक्षेचा विचार करून सदर जहाजावर हल्ला चढविल्याची माहिती सौदीच्या लष्कराचे प्रवक्ते कर्नल तुर्की अल-मलिकी यांनी दिली.

या हल्ल्यासाठी वापरलेले जहाज कोणत्या देशाचे किंवा संघटनेचे होते, याचे तपशील प्रसिद्ध झालेले नाहीत. या घातपाती कटासाठी सौदीने कुणावरही संशय व्यक्त करण्याचे टाळले आहे. एरवी रेड सीमधील घातपाती हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारणार्‍या येमेनमधील हौथी बंडखोरांनीही या घटनेची जबाबदारी स्वीकारलेली नाही.

रेड सी आणि पर्शियन आखात क्षेत्र गेल्या काही आठवड्यांपासून अतिशय संवेदनशील क्षेत्र बनले आहे. युरोप ते आशियाई देशांना जोडणार्‍या या सागरी क्षेत्रात परदेशी जहाजांवरील हल्ले वाढले आहेत. या क्षेत्रात इस्रायल आणि इराणमधील अघोषित युद्ध तीव्र झाल्याचा दावा अमेरिकेच्या वर्तमानपत्राने काही दिवसांपूर्वी केला होता.

दरम्यान, महिन्याभरापूर्वीच सुएझ कालव्यात कंटेनर जहाज फसल्यामुळे मालवाहतुकीची झालेली कोंडी जगाने अनुभवली होती. त्यामुळे सदर कट यशस्वी ठरला असता तर त्याचा हादरा सार्‍या जगाला बसला असता.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info