वॉशिंग्टन – ‘‘‘साऊथ चायना सी’ क्षेत्रात चीनने आपले सामर्थ्य प्रचंड प्रमाणात वाढविले आहे. या क्षेत्रावर चीनचे संपूर्ण नियंत्रण प्रस्थापित झाले आहे. आता अमेरिकेबरोबरील युद्धाच्या परिस्थितीतच चीनचे या सागरीक्षेत्रावरील नियंत्रण कमी होऊ शकते’’, अशी सुस्पष्ट जाणीव अमेरिकेचे अॅडमिरल फिलिप एस. डेव्हिडसन यांनी करून दिली. अमेरिकन काँग्रेसला दिलेल्या आपल्या लेखी अहवालात अॅडमिरल डेव्हिडसन यांनी चीनबाबत दिलेले हे इशारे औचित्यपूर्ण ठरत आहेत.
गेल्या काही आठवड्यांपासून अमेरिकी नौदलाच्या युद्धनौका व विनाशिका ‘साऊथ चायना सी’ क्षेत्रात गस्त घालत आहेत. चीनने या क्षेत्रात उभारलेल्या कृत्रिम बेटांजवळून अमेरिकेच्या नौदलाने गस्त घालून आपण चीनचे दावे व धमक्यांची पर्वा करीत नसल्याचे दाखवून दिले होते. यावर चीनची जहाल प्रतिक्रिया उमटली व चीनने आपल्या नौदलाच्या सामर्थ्याचे प्रदर्शन करून अमेरिकेला प्रत्युत्तर दिले होते. अशा काळात अमेरिकेचे अॅडमिरल डेव्हिडसन यांनी ‘साऊथ चायना सी’ क्षेत्रावरील चीनच्या नियंत्रणाबाबत दिलेले धोक्याचे इशारे महत्त्वपूर्ण ठरतात.
अमेरिकन काँग्रेसला पाठविलेल्या लेखी अहवालात अॅडमिरल डेव्हिडसन यांनी चीनने या सागरी क्षेत्रात केलेल्या तयारीचा दाखला दिला. चीनने या क्षेत्रात उभ्या केलेल्या कृत्रिम बेटांचे लष्करी तळात रुपांतर झाले आहे. यामुळे चीन या सागरी क्षेत्रावर अधिक भक्कमपणे नियंत्रण ठेवून असल्याचे अॅडमिरल डेव्हिडसन म्हणाले. हे लष्करीकरण अमेरिकेच्या या क्षेत्रातील हितसंबंधांसाठी मोठे आव्हान ठरेल, असे सांगून यापासून अमेरिकेला असलेल्या धोक्याबाबत अॅडमिरल डेव्हिडसन यांनी सावध केले आहे.
थोडक्यात सांगायचे तर, अमेरिकेबरोबरील युद्धाच्या परिस्थितीचा अपवाद वगळला, तर चीनने या क्षेत्रावर संपूर्णपणे नियंत्रण प्रस्थापित केल्याचे म्हणता येईल, असे सूचक उद्गार अॅडमिरल डेव्हिडसन यांनी काढले आहेत. वेगळ्या शब्दात अमेरिकेला या महत्त्वाच्या सागरी क्षेत्रावर आपला प्रभाव कायम राखायचा असेल, तर चीनशी युद्ध केल्यावाचून पर्याय उरलेला नाही, असेच डेव्हिडसन अमेरिकन काँग्रेसला सांगत आहेत. याआधीही अमेरिकन नौदलाचे एशिया-पॅसिफिक क्षेत्राचे कमांडप्रमुख हॅरि हॅरिस यांनीही अमेरिकन संसदेला अशाच स्वरूपाचे गंभीर इशारे दिले होते.
त्यांच्या या इशार्यानंतर अमेरिकेने आपल्या नौदलाच्या साऊथ चायना सी क्षेत्रातील हालचाली वाढविल्या होत्या. चीनने कितीही विरोध केला व आक्षेप नोंदविला तरी अमेरिका या आंतरराष्ट्रीय सागरी क्षेत्रात गस्त घालणार असल्याचे अमेरिकन अधिकार्यांनी वारंवार बजावले होते. पण या क्षेत्रातील चीनच्या नियंत्रणाबाबत इशारा देऊन अॅडमिरल डेव्हिडसन यांनी अमेरिकन संसदेला वास्तवाची जाणीव करून दिल्याचे दिसत आहे.
हिंदी महासागर क्षेत्रापासून ते पॅसिफिक महासागर क्षेत्रापर्यंत आपल्या योजना कार्यान्वित करण्यासाठी चीनने फार आधीपासून तयारी केली होती. आता या योजना चीन प्रत्यक्षात उतरवीत असून यासाठी चीन आपल्या लष्करी सामर्थ्याबरोबरच आर्थिक व राजकीय प्रभावाचाही वापर करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अमेरिकेचे वरिष्ठ अधिकारी चीनच्या हालचालींची गंभीर दखल घेऊन आपल्या देशाला याच्या परिणामांची जाणीव करून देत असल्याचे दिसत आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info/status/988786262923497475 | |
https://www.facebook.com/WW3Info/posts/386420371766453 |