‘साऊथ चायना सी’मधील चीनच्या बेटांजवळून अमेरिकी युद्धनौकांची गस्त

‘साऊथ चायना सी’मधील चीनच्या बेटांजवळून अमेरिकी युद्धनौकांची गस्त

वॉशिंग्टन – ‘साऊथ चायना सी’मधील पॅरासेलच्या सागरी क्षेत्रातून अमेरिकेच्या दोन युद्धनौकांनी गस्त घालून चीनला इशारा दिला. गेल्या काही दिवसांमध्ये चीनने ‘साऊथ चायना सी’मधील कृत्रिम बेटांवर लष्करी व लढाऊ विमाने आणि क्षेपणास्त्रे तैनात करून या सागरी क्षेत्रातील तणाव वाढविला होता. चीनच्या या लष्करी आक्रमकतेला अमेरिकेने प्रत्युत्तर दिल्याचा दावा अमेरिकेच्या अधिकार्‍यांनी केला.

अमेरिकेच्या नौदलातील क्षेपणास्त्रभेदी ‘युएसएस हिगिन्स’ युद्धनौका आणि ‘युएसएस अँटेटम’ या क्रूजर विनाशिकेने रविवारी पहाटे ‘साऊथ चायना सी’च्या सागरी क्षेत्रात गस्त घातली. ‘युएसएस हिगिन्स’ आणि ‘युएसएस अँटेटम’ या दोन्ही युद्धनौका अरबी समुद्रातील आपली मोहीम पूर्ण करून आशिया-प्रशांत सागरी क्षेत्रासाठी रवाना झाल्या आहेत.

अमेरिकी युद्धनौकात्याआधी त्यांनी पॅरासेल द्विपसमूहातील ‘वुडी’, ‘लिंकन’, ‘ट्रि’ आणि ‘ट्रिटन’ या कृत्रिम बेटांच्याजवळून अमेरिकेच्या युद्धनौकांनी गस्त घातल्याची माहिती अमेरिकेच्या दोन अधिकार्‍यांनी नाव गुपित ठेवण्याच्या अटीवर दिली. यापैकी वुडी आयलँडजवळील अमेरिकेच्या युद्धनौकांची गस्त चीनला चिथावणी देणारी असल्याचा दावा केला जातो.

चीनने गेल्या काही वर्षांमध्ये ‘साऊथ चायना सी’च्या संपूर्ण सागरी क्षेत्रावर आपला अधिकार सांगून या ठिकाणी १०० हून अधिक कृत्रिम बेटांची निर्मिती केली आहे. यामध्ये पॅरासेल, स्कारबोरो आणि स्प्रार्टले या सागरी क्षेत्रांमधील कृत्रिम बेटांचा समावेश आहे. चीनने उभारलेल्या या कृत्रिम बेटांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळालेली नाही. पण चीनने आपल्या सागरी क्षेत्रावर अतिक्रमण करून कृत्रिम बेटांचे बांधकाम केल्याची टीका व्हिएतनाम, फिलिपाईन्स, तैवान, ब्रुनेई हे आग्नेय आशियाई देश करीत आहेत.

यापैकी व्हिएतनाम, तैवान हक्क सांगत असलेल्या ‘पॅरासेल’च्या क्षेत्रातील कृत्रिम बेटांवर चीनने गेल्या काही महिन्यांपासून लष्करी हालचाली वाढविल्या आहेत. गेल्या दहा दिवसात चीनने ‘पॅरासेल’च्या वुडी आयलँड या बेटावर ‘जे-११’ ही लढाऊ विमाने तैनात केली होती. तसेच क्षेपणास्त्रभेदी यंत्रणाही तैनात केल्याचा आरोप अमेरिकेने केला होता. या व्यतिरिक्त पॅरासेल द्विपसमूहाच्या हद्दीतील कृत्रिम बेटांवर चीनने लष्करी मालवाहू विमान उतरविले. तसेच विमानभेदी तोफा आणि ड्रोन्सही तैनात केले आहेत.

चीनकडून ‘साऊथ चायना सी’चे लष्करीकरण सुरू असल्याचा आरोप अमेरिका व मित्रदेशांनी केला होता. या लष्करीकरणाद्वारे चीन ‘साऊथ चायना सी’मधील आंतरराष्ट्रीय सागरी वाहतुकीचे स्वातंत्र्य धोक्यात टाकीत असल्याची टीकाही अमेरिकेने केली होती. पण चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी गेल्या महिन्यात या सागरी क्षेत्रातील युद्धसरावाची पाहणी करून ही लष्करी सज्जता चीनच्या हितसंबंधांच्या सुरक्षेसाठी असल्याचे जाहीर केले होते.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info/status/1001129340954787840
https://www.facebook.com/WW3Info/posts/398986683843155