जेरुसलेम/अंकारा – तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी इस्रायलला ज्यूधर्मियांचे राष्ट्र घोषित करणार्या ‘नेशन-स्टेट लॉ’वर टीका करताना इस्रायली नेत्यांची तुलना नाझी हुकुमशहा अॅडॉल्फ हिटलरशी केली होती. याला उत्तर देताना इस्रायलचे पंतप्रधान नेत्यान्याहू यांनी एर्दोगन यांना सिरियन आणि कुर्दांच्या हत्याकांडांची आठवण करून दिली.
गेल्या आठवड्यात, इस्रायलच्या संसदेत ‘नेशन-स्टेट लॉ’ संमत झाला होता. सदर विधेयक इस्रायल ही ज्यूधर्मियांची अधिकृत भूमी असल्याचा मुद्दा अधोरेखित करणारा आहे. त्यामुळे या भूभागाचे नागरिक म्हणून ज्यूधर्मियांना विशेष दर्जा या विधेयकाने दिला असून जेरूसलेम तसेच वेस्ट बँकमधील ज्यूधर्मियांच्या वस्त्यांचे बांधकाम देखील यापुढे कायदेशीर ठरणार आहे. तसेच या विधेयकामुळे ज्यूधर्मियांची ‘हिब्रू’ ही इस्रायलची अधिकृत भाषा ठरून या भाषेला विशेष दर्जा देण्यात आला आहे.
यावर अरब देश व पॅलेस्टाईनने जोरदार टीका केली होती. तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनीही त्यावर सडकून टीका केली. ‘नेशन-स्टेट लॉ’ला दिलेली मान्यता म्हणजे इस्रायल हे सर्वाधिक फॅसिस्ट व वंशद्वेषी राष्ट्र असल्याचे शिक्कामोर्तब करणारी घटना आहे, असा ठपका राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी ठेवला. त्याचवेळी या कायद्याच्या मान्यतेमुळे इस्रायलच्या नेत्यांमध्ये नाझी हुकुमशहा अॅडॉल्फ हिटलरचे भूत अवतरल्याचे दिसत आहे, असा आरोपही त्यांनी केला.
एर्दोगन यांच्या या टीकेवर संतापलेल्या इस्रायली पंतप्रधानांनी त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले. लोकशाहीचे पुरस्कर्ते असणार्या एर्दोगन यांच्यासारख्याने ‘नेशन स्टेट लॉ’वर केलेली टीका हा कायदा योग्यच असल्याचे दाखवून देत आहे, अशा उपरोधिक शब्दात पंतप्रधान नेत्यान्याहू यांनी एर्दोगन यांना लक्ष्य केले. त्याचवेळी तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष हजारो तुर्की नागरिकांना तुरुंगात डांबून सिरियन तसेच कुर्दांचे हत्याकांड करीत आहेत. तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष आपल्याच नागरिकांना तुरुंगात डांबून हुकूमशाही राबवित आहेत. तर इस्रायल मात्र सर्वांसाठी समान हक्कांचा पुरस्कार करीत आहे, असा टोला इस्रायलच्या पंतप्रधानांनी लगावला.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |