उपग्रह हॅक करून शस्त्रासारखा वापर शक्य – ‘रेडिओ फ्रिक्वेन्सी वेपन्स’ तयार होऊ शकतात असा जगभरातील तज्ज्ञांचा इशारा

उपग्रह हॅक करून शस्त्रासारखा वापर शक्य – ‘रेडिओ फ्रिक्वेन्सी वेपन्स’ तयार होऊ शकतात असा जगभरातील तज्ज्ञांचा इशारा

लास व्हेगास – अंतराळातील उपग्रह सायबरहल्ल्यांपासून सुरक्षित नसून ते ‘हॅक’ केले जाऊ शकतात आणि पृथ्वीवरील त्यांच्या ‘अँटेना’चा वापर ‘मायक्रोव्हेव’प्रमाणे करून मोठे हल्ले चढविले जाऊ शकतात, असा गंभीर इशारा माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिला आहे. अमेरिकेच्या लास व्हेगास शहरात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील जागतिक परिषद सुरू असून यात उपग्रहांबरोबरच ‘सेल्फ ड्रायव्हिंग कार्स’ तसेच इतर ‘स्मार्ट’ यंत्रणाही सायबरहल्ल्याचे सहज लक्ष्य होऊ शकतात, असे बजावले आहे.

उपग्रह, हॅक, Radio frequency weapons, अँटेना, सायबरहल्ला, ww3, लास व्हेगास, मायक्रोव्हेवलास व्हेेगास शहरात ‘ब्लॅकहॅट इर्न्फोमेशन सिक्युरिटी कॉन्फरन्स’ सुरू असून त्यासाठी माहिती तंत्रज्ञान व सायबरसुरक्षा क्षेत्रातील १७ हजारांहून अधिक तज्ज्ञ व अधिकारी उपस्थित आहेत. या परिषदेत संभाव्य सायबरहल्ले तसेच ते रोखण्यासाठी उपाययोजना या मुद्यांवर महत्त्वाची चर्चा झाली. यावेळी काही तज्ज्ञांनी अंतराळातील उपग्रह तसेच त्यांच्यावर नियंत्रण ठेवणार्‍या पृथ्वीवरील यंत्रणांच्या सायबरसुरक्षेचा मुद्दा मांडला.

जगभरातील जहाजे, विमाने तसेच लष्कराकडून वापरण्यात येणारे उपग्रह हॅकर्सकडून सहजगत्या लक्ष्य केले जाऊ शकतात. या उपग्रहांवर नियंत्रण ठेवणार्‍या पृथ्वीवरील यंत्रणांवरही हॅकर्स हल्ले चढवू शकतात. उपग्रहांकडून येणारी माहिती मिळविण्यासाठी उभारण्यात आलेल्या ‘अँटेना’ हे हॅकर्सचे प्रमुख लक्ष्य ठरू शकते, असा इशारा तज्ज्ञांनी यावेळी दिला.

उपग्रह, हॅक, Radio frequency weapons, अँटेना, सायबरहल्ला, ww3, लास व्हेगास, मायक्रोव्हेवउपग्रह व त्यांच्या नियंत्रणासाठी वापरण्यात येणार्‍या ‘अँटेना’कडून रेडिओलहरींचा वापर करण्यात येतो. याच रेडिओलहरींचा वापर सायबरहल्ला तसेच प्रत्यक्षात एखादा मोठा हल्ला चढविण्यासाठीही होऊ शकतो, अशी भीती हॅकर्सनी व्यक्त केली. आपल्या मुद्याचे समर्थन करताना तज्ज्ञांनी ‘मायक्रोव्हेव’चे उदाहरण दिले. ‘मायक्रोव्हेव’मध्ये ज्याप्रमाणे लहरींचा वापर करून खाद्यपदार्थ गरम केले जातात, त्याच धर्तीवर उपग्रहांच्या ‘अँटेना’चा वापर प्रचंड ऊर्जा निर्माण करून हल्ल्यांसाठी केला जाईल, असा दावा तज्ज्ञांनी केला आहे.

त्याचवेळी उपग्रहांची यंत्रणा हॅक करून त्यातून मोठ्या प्रमाणात माहिती चोरली जाऊ शकते किंवा गहाळ केली जाऊ शकते, असा इशाराही अमेरिकेतील परिषदेदरम्यान देण्यात आला.

English  हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info