बीजिंग – ‘तैवान हा चीनच्या सार्वभौमत्वाचा आणि अखंडतेचा मुद्दा आहे. चीनच्या अखंडतेला आव्हान देऊन कुणी तैवानला चीनपासून वेगळे करण्याचा प्रयत्न केलाच, तर त्याविरोधात चीनचे लष्कर कुठल्याही थराला जाईल’, असा इशारा चीनचे संरक्षणमंत्री ‘वेई फेंघ’ यांनी दिला. आपल्या विनाशिका तैवानमध्ये रवाना करणार्या अमेरिकेला चीनने हा इशारा दिल्याचे दिसत आहे. चीनच्या या इशार्यानंतर तैवानने ‘साऊथ चायना सी’च्या क्षेत्रात ‘लाईव्ह फायर ड्रिल’ युद्धसराव आयोजित करण्याची घोषणा करून प्रत्युत्तर दिले आहे.
चार दिवसांपूर्वी क्षेपणास्त्रभेदी यंत्रणेनी सज्ज असलेल्या अमेरिकेच्या दोन युद्धानौकांनी तैवानच्या आखातात गस्त घातली होती. अमेरिकी युद्धनौकांच्या या गस्तीचे तैवानने स्वागत केले होते. पण तैवान हा आपलाच भूभाग असल्याचा दावा करणार्या चीनने या कारवाईवर आक्षेप घेऊन अमेरिकेला धमकावले आहे. दरवर्षी सिंगापूर येथे आयोजित होणार्या ‘शांग्री-ला’ बैठकीप्रमाणे चीनने राजधानी बीजिंगमध्ये आपल्या समर्थक देशांसह आयोजित केलेल्या बैठकीत चीनचे संरक्षणमंत्री ‘वुई फेंघ’ यांनी अमेरिकेला तैवानपासून दूर राहण्याचा इशारा दिला.
‘तैवान चीनच्या सार्वभौमत्वाचा गाभा असून इतर देशांनी हे ध्यानात ठेवावे. चीनच्या सार्वभौमत्वाच्या मुद्यावर वारंवार चिथावणी देणे अतिशय धोकादायक ठरेल. त्यामुळे तैवानला चीनपासून स्वतंत्र करण्याचा प्रयत्न केलाच तर चीनचे लष्कर जोरदार प्रत्युत्तर देईल’, असे संरक्षणमंत्री फेंघ यांनी बजावले. चीनच्या संरक्षणमंत्र्यांनी अमेरिकेला उद्देशून हा इशारा दिल्याचा दावा चीनमधील सरकारी माध्यमे करीत आहेत. चीनच्या या धमकीवर अमेरिकेची प्रतिक्रिया आलेली नाही. पण तैवानने चीनला उत्तर दिले आहे.
‘साऊथ चायना सी’मधील स्प्रार्टले द्विपसमुहांच्या सागरी क्षेत्राजवळ तैवानने युद्धसराव आयोजित करण्याचे जाहीर केले आहे. शत्रू देशाने आपल्या भूभागावर किंवा सागरी क्षेत्रावर हल्ला चढविलाच तर त्यांना पिटाळून लावण्याची तयारी या युद्धसरावात केली जाणार आहे. या युद्धसरावात तैवानची लढाऊ विमाने, विनाशिका सहभागी होतील. हा युद्धसराव आपल्याच सागरी क्षेत्रात पार पडेल’, असा दावा तैवान करीत असल्याचे हॉंगकॉंगस्थित दैनिकाने म्हटले आहे.
‘साऊथ चायना सी’च्या सागरी हद्दीवर आग्नेय आशियाई देशांप्रमाणे तैवान देखील आपला अधिकार सांगत आहे. तर चीनने इतर सर्व देशांचे अधिकार फेटाळून लावले आहेत. या सागरी क्षेत्रात फिलिपाईन्स, व्हिएतनामच्या जहाजांना देखील चीनच्या कारवाईचा सामना करावा लागतो. असे असताना तैवानने याच सागरी हद्दीत ‘लाईव्ह फायर ड्रिल’च्या आयोजनाची घोषणा करून चीनला चिथावणी दिल्याचे दिसत आहे.
दरम्यान, याआधीही चीनने तैवानबाबत अमेरिका व इतर देशांना धमकावले होते. तैवान हा चीनचा अविभाज्य भूभाग असून कुठल्याही देशाने तैवानबरोबर राजकीय सहकार्य प्रस्थापित करू नये, अशी धमकी चीनने दिली आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये चीनच्या या धमकीमुळे काही देशांनी तैवानबरोबरच्या सहकार्यातून माघार घेतली आहे. पण अमेरिकेने तैवानबरोबरच्या सहकार्यात वाढ केली आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तेवर आल्यापासूनच तैवानबरोबरचे राजकीय सहकार्य वाढविण्यास सुरुवात केली असून तैवानमध्ये उच्चायुक्तालय सुरू केले आहे. त्याचबरोबर तैवानला लष्करी सहाय्य देण्यासाठीही अमेरिकेने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. तैवानच्या राष्ट्राध्यक्षा ‘त्साई ईंग-वेन’ यांनीही स्वतंत्र तैवानची मागणी उचलून धरून अमेरिका व इतर देशांनी आपल्याला सहाय्य करावे, असे आवाहन केले आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |