वॉशिंग्टन – ‘द वॉशिंग्टन पोस्ट’ या अग्रगण्य अमेरिकन वर्तमानपत्राचे स्तंभलेखक असलेल्या जमाल खशोगी यांची हत्या घडविल्याचा आरोप करून अमेरिकन माध्यमे सौदी अरेबियाच्या राजघराण्याला लक्ष करीत आहेत. मात्र राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी या हत्येवरून सौदी अरेबियासारख्या निकटतम सहकारी देशाविरोधात कारवाई करण्यास नकार दिला. त्यांच्या या निर्णयावर टीका होत असताना, जमाल खशोगी यांच्याबाबत वादग्रस्त माहिती समोर येत आहे. ‘अल कायदा’चा प्रमुख ओसामा बिन लादेन व आखातातील कट्टरपंथीयांची संघटना ‘मुस्लिम ब्रदरहूड’शी खशोगी यांचे संबंध होते, अशी माहिती अमेरिकन माध्यमांमधूनच प्रसिद्ध होत आहे.
खशोगी यांची हत्या म्हणजे पत्रकारिता व अभिव्यक्ती स्वातंत्र्याची हत्या ठरते, अशी भूमिका अमेरिकन माध्यमे घेत आहेत. अमेरिकेचे काही लोकप्रतिनिधी देखील ट्रम्प प्रशासनाला या प्रकरणी धारेवर धरत आहेत. सौदी अरेबियाचे राजघराणे, विशेषतः क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांना विरोध केल्यामुळे खशोगी यांची हत्या झाली, असे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे. तुर्कीतील सौदीच्या दूतावासासात झालेल्या या हत्येचे आंतरराष्ट्रीय राजकारणातही पडसाद उमटले होते. तुर्कीने या प्रकरणी सौदीच्या विरोधात ठाम भूमिका घेतली होती.
मात्र सौदी हा आखातातील अमेरिकेचा निकटतम सहकारी देश असून खशोगी यांच्या दुर्दैवी हत्येवरून सौदीला दुखावण्याची जोखीम आपले प्रशासन पत्करणार नाही, असे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी जाहीर केले. त्यामुळे सौदीबरोबरील व्यापार व राजकीय संबंध, मानवाधिकार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यापेक्षा अधिक प्रभावी ठरले, अशी टीका अमेरिकन माध्यमांमधील एका गटाने सुरू केली होती. ही टीका तीव्र होत असतानाच, खशोगी यांच्याबद्दल वादग्रस्त माहिती समोर येऊ लागली. काही नियतकालिकांमध्ये खशोगी ‘मुस्लिम ब्रदरहूड’ या आखाती देशांमध्ये सक्रिय असलेल्या कट्टरपंथीय संघटनेचे सदस्य होते, अशी माहिती देण्यात आली होती. याच कारणामुळे ‘मुस्लिम ब्रदरहूड’कडून धोका असलेल्या प्रिन्स मोहम्मद यांनी खशोगी यांचा काटा काढल्याचे दावे करण्यात येत आहेत.
इतकेच नाही, तर कोरे स्टुअर्ट यांनी खशोगी चांगली व्यक्ती नव्हती, असा दावा ‘सीएनएन’ या अमेरिकी वृत्तवाहिनीवरील कार्यक्रमात केला. सत्ताधारी रिपब्लिकन पक्षाचे सदस्य असलेल्या स्टुअर्ट यांनी खशोगी यांचे ‘मुस्लिम ब्रदरहूड’ तसेच ‘ओसामा बिन लादेन’शी संबंध असल्याचा दाखला दिला. त्याची हत्या ही दुर्दैवी बाब ठरत असली तरी आखाती देशांमध्ये अशा रितीने मानवाधिकारांचे हनन ही काही नवी बाब नाही, याकडेही स्टुअर्ट यांनी लक्ष वेधले. म्हणूनच खशोगी यांच्याबाबत अतिरेकी प्रतिक्रिया देऊन सौदीसारख्या आखातातील जवळच्या मित्रदेशाला अमेरिकेने दुखवू नये, असे आवाहन स्टुअर्ट यांनी केले आहे.
अमेरिकन माध्यमांमधील उदारमतवादी गटाने स्टुअर्ट यांच्या या विधानांवर टीकेची झोड उठविली आहे. आपण वयाच्या विशीत असताना ‘मुस्लिम ब्रदरहूड’मध्ये सहभागी झालो होतो, याची कबुली खशोगी यांनी जाहीरपणे दिली होती व कालांतराने आपला मार्ग बदलल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते, याकडे खशोगी यांचे समर्थक लक्ष वेधत आहेत. पण खशोगी यांची पत्रकार म्हणून असलेली प्रतिमा त्यांच्याबाबत समोर आलेल्या नव्या वादग्रस्त माहितीमुळे बदलल्याचे दिसत आहे. यामुळे खशोगी प्रकरणात ट्रम्प प्रशासनाने स्वीकारलेल्या भूमिकेला होणारा विरोध मावळू लागल्याचे दिसत आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |