अमेरिकेची नवी ‘मिसाईल डिफेन्स स्ट्रॅटेजी’ म्हणजे शीतयुद्धाच्या काळातील ‘स्टार वॉर्स प्रोग्राम’ची पुनरावृत्ती

अमेरिकेची नवी ‘मिसाईल डिफेन्स स्ट्रॅटेजी’ म्हणजे शीतयुद्धाच्या काळातील ‘स्टार वॉर्स प्रोग्राम’ची पुनरावृत्ती

मॉस्को/वॉशिंग्टन – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलेला ‘मिसाईल डिफेन्स रिव्ह्यू’ म्हणजे शीतयुद्धाच्या काळातील ‘स्टार वॉर्स प्रोग्राम’ची आठवण करून देणारी योजना असल्याची टीका रशियाने केली आहे. १९८३ साली अमेरिकेचे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन यांनी ‘स्ट्रॅटेजिक न्यूक्लिअर वेपन्स’ना प्रत्युत्तर देणारी ‘मिसाईल डिफेन्स’ यंत्रणा उभारण्याची घोषणा केली होती. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी रशिया व चीनसह इतर देशांच्या प्रगत क्षेपणास्त्रांना रोखण्यासाठी थेट अंतराळात ‘स्पेस सेन्सर्स’ व ‘इंटरसेप्टर्स’ तैनात करण्याचे संकेत दिले आहेत.

गुरुवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी संरक्षण मुख्यालय ‘पेंटॅगॉन’मध्ये अमेरिकेच्या ‘मिसाईल डिफेन्स रिव्ह्यू’ची घोषणा केली होती. त्यात ‘इम्पॉर्टन्स ऑफ स्पेस’ या नावाने दोन स्वतंत्र परिच्छेदांचा समावेश करण्यात आला आहे. त्यात ‘स्पेस बेस्ड्स सेन्सर्स’चा स्पष्ट उल्लेख असून ही क्षमता अमेरिकेच्या ‘मिसाईल डिफेन्स’ यंत्रणेला अधिक प्रभावी करणारी ठरेल, असे नमूद करण्यात आले आहे. सेन्सर्सव्यतिरिक्त ‘स्पेस बेसिंग ऑफ इंटरसेप्टर्स’ शत्रूच्या क्षेपणास्त्रांना सुरुवातीच्या टप्प्यातच नष्ट करण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात, याकडे लक्ष वेधण्यात आले आहे.

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी आपल्या वक्तव्यात अंतराळक्षेत्र हे युद्धातील नवे ‘रणांगण’ असल्याचे सांगून अमेरिकेचा ‘स्पेस फोर्स’ त्याचे नेतृत्त्व करेल, असा दावाही केला. कोणत्याही भागातून अथवा क्षेत्रातून अमेरिकेला लक्ष्य करणारे क्षेपणास्त्र भेदणे हेच अमेरिकेच्या ‘मिसाईल डिफेन्स रिव्ह्यू’चे उद्दिष्ट असेल असेही राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी स्पष्ट केले. अंतराळातील ‘मिसाईल डिफेन्स’ यंत्रणेसाठी अमेरिकेचा संरक्षण विभाग नजिकच्या काळात विविध संकल्पना व तंत्रज्ञानाच्या चाचण्या करेल, असे ‘मिसाईल डिफेन्स रिव्ह्यू’मध्ये सांगण्यात आले आहे.

अमेरिकेच्या ‘मिसाईल डिफेन्स रिव्ह्यू’मध्ये अंतराळक्षेत्रातील यंत्रणेला दिलेले महत्त्व म्हणजे बेजबाबदार व चिथावणीखोर कृत्य असल्याची टीका रशियाने केली आहे. रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने ट्रम्प यांची घोषणा म्हणजे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन यांनी शीतयुद्धाच्या काळात केलेल्या ‘स्टार वॉर्स प्रोग्राम’ची पुनरावृत्ती असल्याचा आरोपही केला. रेगन यांनी जाहीर केलेल्या योजनेत ‘स्पेस बेस्ड् मिसाईल सिस्टिम्स’ व ‘लेझर’ यंत्रणेचा समावेश होता.

‘ट्रम्प यांच्या नव्या धोरणातून अंतराळात प्रगत क्षेपणास्त्रांचे तळ उभारण्यास मान्यता दिल्याचे स्पष्टपणे दिसून येते. अमेरिकेने या संकल्पनेची अंमलबजावणी केल्यास ती अंतराळातील शस्त्रास्त्रस्पर्धेची सुरुवात ठरेल. त्याचे नकारात्मक परिणाम आंतरराष्ट्रीय सुरक्षा व स्थैर्यावर उमटू शकतात’, अशा शब्दात रशियन परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिकेवर टीकास्त्र सोडले आहे.

रेगन यांच्या ‘स्टार वॉर्स’ची पुनरावृत्ती असलेले व अधिक प्रगत तंत्रज्ञानाचा वापर असणारे हे धोरण अमेरिकेने मागे घ्यावे आणि अण्वस्त्रांच्या मुद्यावर रशियाबरोबर चर्चेत सहभागी व्हावे, असे आवाहनही रशियाकडून करण्यात आले आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प व वरिष्ठ नेते तसेच अधिकार्‍यांनी अमेरिकेकडून अंतराळक्षेत्रात सुरू असलेल्या हालचाली रशिया व चीनकडून विकसित करण्यात येणार्‍या हायपरसोनिक आणि इतर प्रगत क्षेपणास्त्रांना रोखण्यासाठीच असल्याचे यापूर्वी स्पष्ट केले आहे. नव्या धोरणाद्वारे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी पुन्हा एकदा अंतराळक्षेत्राचे महत्त्व, त्याची सुरक्षा व अमेरिकेचे त्यातील स्थान अधोरेखित केल्याचे दिसत आहे.

हिंदी English

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info