व्हेनेझुएलात अमेरिकेची निर्णायक कारवाई सुरू – दूतावासातील सर्व कर्मचार्‍यांना माघारी बोलावले

व्हेनेझुएलात अमेरिकेची निर्णायक कारवाई सुरू – दूतावासातील सर्व कर्मचार्‍यांना माघारी बोलावले

कॅराकस / वॉशिंग्टन – व्हेनेझुएलाच्या निकोलस मदुरो यांच्यावर सत्ता सोडण्यासाठी सातत्याने दडपण टाकणार्‍या अमेरिकेने आता निर्णायक हालचाली सुरू केल्या आहेत. सोमवारी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी एका ट्विटच्या माध्यमातून येत्या काही दिवसात व्हेनेझुएलाच्या अमेरिकी दूतावासातील सर्व कर्मचारी माघारी येतील, अशी घोषणा केली. त्याचवेळी रशिया व क्युबा व्हेनेझुएलातील मदुरो यांची राजवट टिकविण्यासाठी धडपडत असल्याचा आरोपही केला.

व्हेनेझुएलात मदुरो यांच्या राजवटीवरील दडपण दिवसेंदिवस वाढत चालले असून त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर असणारा पाठिंबाही कमी होत चालला आहे. रशिया, चीन, क्युबा यासारखे मोजके देश वगळले तर बहुतांश देशांनी व्हेनेझुएलातील मदुरो यांच्याशी असलेले संबंध तोडले आहेत. त्यामुळे व्हेनेझुएलातील परिस्थिती चिघळत चालली असून अन्नधान्य, औषधे, वीज यासारख्या मूलभूत घटकांची प्रचंड टंचाई निर्माण झाली आहे. मात्र मदुरो लष्करी बळाच्या जोरावर आपली सत्ता टिकविण्याची धडपड करीत असल्याचे समोर येत असून त्यांना विरोध करणार्‍या ‘जुआन गैदो’ यांनी निर्णायक संघर्षाचा इशारा दिला आहे.

त्याचवेळी अमेरिकेकडून व्हेनेझुएलात लष्करी कारवाईची तयारी सुरू असल्याची वृत्ते सातत्याने समोर येत आहेत. अमेरिकेने व्हेनेझुएलाचे शेजारी देश असलेल्या ब्राझिल, कोलंबिया, प्युर्टो रिको यासारख्या देशांमध्ये लष्करी तुकड्या उतरविल्याचे दावे पुढे आले आहेत. अमेरिकेची ड्रोन्स व टेहळणी विमाने व्हेनेझुएलाच्या सागरी क्षेत्रात दिसल्याचेही सांगण्यात येते. त्यामुळे येत्या काही दिवसात अमेरिका लष्करी कारवाई करु शकतो, असे मानले जाते.

सोमवारी अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने व्हेनेझुएलाचा दूतावास पूर्णपणे रिकामा करण्याबाबत दिलेले आदेश त्याचाच भाग दिसत आहे. यापूर्वी जानेवारी महिन्यात अमेरिकेने मदुरो यांनी दिलेला ‘अल्टिमेटम’ नाकारून दूतावास चालू ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता परराष्ट्रमंत्री पॉम्पिओ यांनी, व्हेनेझुएलातील दूतावास अमेरिकेच्या धोरणांवर दडपण आणणारा घटक ठरत असून सर्व कर्मचार्‍यांना मायदेशी परतण्यास सांगितले आहे.

त्याचवेळी अमेरिकेच्या कोषागार विभागाने रशिया व व्हेनेझुएलाची भागीदारी असलेल्या रशियातील बँकेवर निर्बंध लादल्याची घोषणा केली आहे. या बँकेत व्हेनेझुएलातील इंधनव्यापाराशी निगडित व्यवहार होत असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे त्यावर निर्बंध टाकून मदुरो यांची आर्थिक बाजू कमकुवत करण्यासाठी अमेरिकेने सदर पाऊल उचलल्याचे दिसत आहे.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info