कोरोनाची साथ म्हणजे जैविक युद्धाचा भाग – ब्राझिलच्या राष्ट्राध्यक्षांचे चीनवर अप्रत्यक्ष, पण गंभीर आरोप

कोरोनाची साथ म्हणजे जैविक युद्धाचा भाग – ब्राझिलच्या राष्ट्राध्यक्षांचे चीनवर अप्रत्यक्ष, पण गंभीर आरोप

ब्राझिलिया – ‘कोरोनाचा विषाणू प्रयोगशाळेत जन्माला घालण्यात आलेला आहे की नको तो प्राणी खाल्ल्याने झाला हे, ते कुणाला ठाऊक नाही. पण जगभरातील लष्करांना मात्र रासायनिक, जैविक आणि किरणोत्सर्गाद्वारे केल्या जाणार्‍या युद्धाची पुरती जाणीव आहे. सध्या आपण नवे युद्ध खेळत आहोत का? आत्ताच्या काळात कुठल्या देशाचा जीडीपी सर्वाधिक प्रमाणात वाढला आहे?’, असे उद्गार काढून ब्राझिलचे राष्ट्राध्यक्ष जेर बोल्सोनारो यांनी जगभरात खळबळ माजविली. चीनचा थेट उल्लेख न करता ब्राझिलच्या राष्ट्राध्यक्षांनी कोरोनाची साथ म्हणजे चीनने छेडलेले जैविक युद्धच असल्याचे जगजाहीर केले. जगभरातील माध्यमांनी ही बातमी उचलून धरली आहे.

ब्राझिलमध्ये बुधवारी पार पडलेल्या एका कार्यक्रमात बोलताना राष्ट्राध्यक्ष बोल्सोनारो यांनी ही तोफ डागली. आपण नव्या युद्धाचा सामना करीत नाही का? असा सवाल यावेळी बोल्सोनारो यांनी केला. चीनच्या वुहानमधील प्रयोगशाळेतून कोरोनाचा विषाणू आधी चीन व त्यानंतर जगभरात फैलावला. चीनने जाणीवपूर्वक याची माहिती दडवून ठेवली. या विषाणूची माहिती वेळीच उघड झाली असती, तर कदाचित वुहानमध्येच ही साथ रोखता आली असती. पण चीनने जाणीवपूर्वक तसे होऊ दिले नाही, असा आरोप गेल्या वर्षी अमेरिकेचे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता. तसेच यामुळे अमेरिका व इतर देशांची जी काही हानी झाली, त्याला चीनच जबाबदार आहे, असा ठपका ठेवून ट्रम्प यांनी चीनला धारेवर धरले होते. कोरोना व्हायरसचा उल्लेख ट्रम्प वुहान व्हायरस असाच करीत होते.

जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाच्या उगमस्थान असलेल्या वुहानमध्ये पाहणी केली व चीनला आरोपमुक्त करणारे अहवाल दिले आहेत. पण जागतिक आरोग्य संघटनेच्या पाहणी करणार्‍या पथकातील काही अधिकार्‍यांनी आपल्याला चीनकडून सारी कागदपत्रे व माहिती मिळाली नाही, अशीही नोंद केलेली आहे. म्हणूनच काही देश अजूनही कोरोनाच्या उगमस्थानाविषयी कसून चौकशी करण्याची मागणी करीत आहेत. हा मुद्दा चीनसाठी अतिशय संवेदनशील ठरत असल्याचेही वारंवार उघड झाले आहे. त्यामुळे चीन याकडे अत्यंत सावधपणे पाहत असून या आघाडीवर शक्य तितकी माहिती दडपण्याचा प्रयत्न चीन करीत आहे. म्हणूनच या साथीबाबतची अतिशय संवेदनशील व धक्कादायक माहिती उघड करणारे चीनमधील संशोधक आकस्मिकरित्या बेपत्ता झाले आहेत.

त्याचवेळी अमेरिकेत आश्रय घेतलेल्या चिनी संशोधिकेने कोरोनाच्या साथीबाबत चीनवर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे कोरोनाची साथ म्हणजे चीनने छेडलेले जैविक युद्धच असल्याच्या आरोपांना पुष्टी मिळाली होती.

दरम्यान, कोरोनाची साथ आल्यानंतर जागतिक अर्थव्यवस्थेची घसरण झाली होती. अर्थव्यवहार ठप्प झाल्याने विकसित व विकनशील देशांच्या अर्थव्यवस्था नकारात्मक कल दाखवित होत्या. अशा परिस्थितीतही चीनच्या जीडीपीत २०२० साली २.३ टक्क्यांची वाढ झाली होती. यावर ब्राझिलच्या राष्ट्राध्यक्षांनी बोट दाखविले आहे. जागतिक अर्थव्यवस्था धोक्यात असताना, चीनच्या अर्थव्यवस्थेने केलेली कामगिरी निराळेच संकेत देत आहेत, हे राष्ट्राध्यक्ष बोल्सोनारो यांनी लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला आहे.

आधीच्या काळात युरोपिय देशांनीही कोरोनाच्या साथीसाठी चीनला जबाबदार धरले होते. पण चीनने आपल्यावरील हे आरोप फेटाळले. कोरोनाचा विषाणू चीनमधून जगात पसरला नाही, हे सिद्ध करण्यासाठी चीनची धडपड सुरू होती. पण कोरोनाची साथ चीनमधूनच जगभरात पसरली, हे सार्‍या जगाने मान्य केले आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय जनमत चीनच्या विरोधात गेले असून चीन हा जागतिक तिरस्काराचा विषय बनला आहे. अशा परिस्थितीत ब्राझिलसारख्या मोठ्या देशाच्या राष्ट्रप्रमुखांनी चीनने जैविक युद्ध छेडल्याचे संकेत देऊन चीनविरोधी राजनैतिक मोहिमेला चालना दिली आहे. पुढच्या काळात इतर देशांच्या नेत्यांनीही बोल्सोनारो यांच्या आरोपाला दुजोरा दिला, तर त्याचा फार मोठा फटका चीनला बसेल. त्याचवेळी जगाची अतोनात हानी घडवून आणणार्‍या चीनला धडा शिकविण्याची मागणी जनतेकडून आपल्या देशाच्या सरकारांकडे केली जाऊ शकते.

English  हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info