वॉशिंग्टन/रियाध – सौदी अरेबियाला गोपनीय अणुतंत्रज्ञान पुरविण्यास अमेरिकेने मान्यता दिली आहे. अमेरिकेचे ऊर्जामंत्री रिक पेरी यांनी देशातील सहा कंपन्यांना अणुऊर्जा तंत्रज्ञान सौदीला पुरविण्याची परवानगी दिल्याचे जाहीर केले. मात्र कंपन्यांनी केलेल्या विनंतीमुळे त्यांची नावे उघड करण्यात आलेली नाहीत, अशी माहिती सूत्रांनी दिली. गेल्याच महिन्यात राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सौदीला अणुतंत्रज्ञान देण्यास उत्सुक असल्याचे वृत्त समोर आले होते.
पाश्चिमात्य देशांबरोबर केलेल्या अणुकरारानंतरही इराण अण्वस्त्रसज्ज होणार असेल, तर सौदी अरेबियाही अण्वस्त्रे मिळविल्यावाचून राहणार नाही, असे सौदीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी गेल्या वर्षी बजावले होते. सौदीचे परराष्ट्रमंत्री ‘अदेल अल-जुबैर’ यांनीही सौदी अण्वस्त्रसज्ज होऊ शकतो, असा इशारा दिला होता. त्यानंतर सौदीची राजवट चीन तसेच पाकिस्तानकडून यासंदर्भातील तंत्रज्ञान मिळविण्याचे प्रयत्न करीत असल्याची माहिती अमेरिकी प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केली होती.
‘द वॉशिंग्टन पोस्ट’ या अमेरिकी दैनिकाने प्रसिद्ध केलेल्या वृत्तात, सौदीची राजधानी रियाधपासून २३० किलोमीटर अंतरावर असणार्या ‘अल-दवादमी’ या लष्करी तळावर गोपनीयरित्या क्षेपणास्त्रनिर्मिती सुरू असल्याचे म्हटले होते. या लष्करी तळावर अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्राच्या निर्मिती व चाचणीसाठी आवश्यक ते बांधकाम सौदीने पूर्ण केल्याचा दावाही अमेरिकी वर्तमानपत्राने केला होता. तसेच सौदीतील लष्करी तळाचे सॅटेलाईट फोटोग्राफ्सही सदर वर्तमानपत्राने प्रसिद्ध केले होते.
या पार्श्वभूमीवर अमेरिकेने सौदी अरेबियाला अणुतंत्रज्ञान देण्याबाबत हालचालींना वेग दिला होता. अमेरिकी कंपन्यांनी यासाठी एक गट स्थापन करून ट्रम्प प्रशासनातील अधिकार्यांशी चर्चाही सुरू केली होती. गेल्या महिन्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनीही सदर गटाच्या प्रतिनिधींची भेट घेतली होती. ट्रम्प यांच्या भेटीनंतर अमेरिकी प्रशासन सौदीला अणुतंत्रज्ञान देण्याच्या तयारीत असल्याचे दावे समोर आले होते. ऊर्जामंत्री रिक पेरी यांच्या घोषणेने त्याला दुजोरा मिळाला आहे.
अमेरिकेच्या ऊर्जा विभागाचा भाग असणार्या ‘नॅशनल न्यूक्लिअर सिक्युरिटी अॅडमिनिस्ट्रेशन’ने अमेरिकेतील कंपन्यांना सौदीला अणुतंत्रज्ञान देण्याचा मार्ग मोकळा केला आहे. मात्र हा प्राथमिक टप्पा असून त्यात कंपन्यांना फक्त त्यांची तयारी पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले असून तंत्रज्ञाना सौदीला पाठविण्याची परवानगी दिलेली नाही, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.
सौदीच्या राजवटीने देशात दोन अणुप्रकल्प उभारण्याची तयारी सुरू केली असून त्यासाठी सौदीबरोबर करार करण्यास अमेरिका उत्सुक आहे. मात्र त्याचवेळी रशिया व दक्षिण कोरिया या देशांनीही सौदीतील अणुप्रकल्प उभारण्याची तयारी दर्शविल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अमेरिकेने सौदीवर दबाव टाकण्यास सुरुवात केली असून आपल्या कंपन्यांना अणुतंत्रज्ञानासाठी पूर्वतयारी करण्यास दिलेली परवानगी त्याचाच भाग मानला जातो.
अमेरिकी कायद्यानुसार, सौदी अरेबियात अणुप्रकल्प उभारण्यापूर्वी योग्य करार होऊन त्याला संसदेची मान्यता मिळणे आवश्यक आहे. मात्र सौदीला अणुतंत्रज्ञान पुरविण्याला अमेरिकेच्या संसद सदस्यांचा कडवा विरोध आहे. त्यामुळे आखतात आण्विक स्पर्धा पेट घेईल व इथली शांतता धोक्यात येईल, असे अमेरिकी संसद सदस्यांचे म्हणणे आहे. तर दुसर्या बाजूला इराणने अणुतंत्रज्ञान व अण्वस्त्रे संपादन केल्यानंतर, सौदी या आघाडीवर मागे राहू शकत नाही, असे सौदीने याआधीच बजावले आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |