अफगाणिस्तानच्या आघाडीवर बायडेन पूर्णपणे अपयशी ठरल्याची ट्रम्प यांची टीका

वॉशिंग्टन – अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अफगाणिस्तानातील अपयशासाठी विद्यमान राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांना जबाबदार धरले. बायडेन यांच्या चुकीच्या धोरणांमुळे काबुल तालिबानच्या हाती गेल्याचा ठपका माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी ठेवला. ‘तुम्हाला अजूनही माझी आठवण येते का?’ असा खोचक प्रश्‍न ट्रम्प यांनी अमेरिकी जनतेला विचारला. काबुल तालिबानच्या हाती जाण्याच्या काही तास आधी ट्रम्प यांनी बायडेन प्रशासनावर केलेली ही खरमरीत टीका व अमेरिकी जनतेला केलेल्या भावनिक आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळत आहे.

टीका

तालिबानच्या दहशतवाद्यांनी रविवारी सकाळी राजधानी काबुलमध्ये घुसून राष्ट्राध्यक्ष गनी यांचे सरकार पाडले. तालिबानने काबुलचा ताबा घेण्याच्या काही तास आधी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक पत्रक प्रसिद्ध केले. यामध्ये ट्रम्प यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या अफगाणविषयक धोरणावर ताशेरे ओढले. ‘अमेरिकेच्या सामर्थ्याचा तालिबानला धाक राहिलेला नाही. तालिबान जेव्हा काबुलमधील अमेरिकेच्या दूतावासावर स्वत:चा ध्वज फडकवतील, तो क्षण अमेरिकेची सर्वात मानहानी करणारा असेल. असे झाले तर ते अमेरिकेचा दुबळेपणा, अक्षमता आणि संपूर्ण धोरणात्मक अपयशाचे प्रतिक ठरेल’, अशी जळजळीत टीका माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी केली.

‘बायडेन कुठल्याही प्रकारचा दबाव हाताळू शकत नाहीत, हे ओबामा यांच्या प्रशासनातील संरक्षणमंत्री रॉबर्ट गेट्स यांनी देखील सांगितले होते’, याकडे ट्रम्प यांनी लक्ष वेधले. ‘माझ्या प्रशासनाने तयार केलेल्या योजनेनुसार अफगाणिस्तानातील अमेरिकन नागरिक व हितसंबंधांच्या सुरक्षेची हमी घेण्यात आली होती. तालिबान अमेरिकन दूतावासाचा कधीही ताबा घेऊ शकणार नाही किंवा अमेरिकेवर हल्ले चढविण्यासाठी तालिबानला तळ मिळणार नाही, याची काळजी घेतली होती. वास्तविकतेचा अभ्यास करून सैन्यमाघारीची योजना आखली होती. पण अफगाणिस्तानबाबत आम्ही तयार केलेल्या योजनेवर चालण्याऐवजी बायडेन यांनी अफगाणिस्तानातून अक्षरशः पळ काढला’, असा ठपका ट्रम्प यांनी ठेवला.

टीका

त्याचबरोबर ट्रम्प यांनी ‘सेव्ह अमेरिका’ असे पत्रक जारी करून बायडेन यांच्या अफगाणिस्तानसह राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय धोरणांनाही लक्ष केले. ‘अफगाणिस्तानातील गदारोळ, पूर्णपणे मोकळी आणि तुटलेली सीमा, विक्रमी पातळीवरील गुन्हेगारी, छतापर्यंत पोहोचलेल्या इंधनाच्या किंमती, महागाईत वाढ आणि या परिस्थितीचा संपूर्ण जग घेत असलेला लाभ’ या साऱ्यांवर उपहासात्मक टीका करून ट्रम्प यांनी अमेरिकन जनतेला – तुम्हाला माझी अजून आठवण येते का? असा खोचक प्रश्‍न केला.

दरम्यान, तालिबान काबुलमध्ये घुसलेले असताना, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन सुट्टी घेऊन कॅम्प डेव्हिडमध्ये जाऊन बसल्याच्या बातम्या समोर येत आहेत. त्यामुळे जगभरातून बायडेन यांच्यावर जोरदार टीका होत आहे. बायडेन यांनी अफगाणिस्तानातील वेगवान सैन्यमाघार घेऊन तालिबानला खुले रान दिल्याचे आरोप होऊ लागले. अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अश्रफ गनी यांनीआवाहन करूनही बायडेन यांनी सैन्यमाघारीचा वेग कमी केला नाही, याकडे टीकाकार लक्ष वेधत आहेत. अशा परिस्थितीत, ट्रम्प यांनी बायडेन यांच्यावर केलेल्या टीकेला सोशल मीडियातून जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे.

English      English

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info