अमेरिकेची लढाऊ विमाने ‘लेझर’ने सज्ज होणार

अमेरिकेची लढाऊ विमाने ‘लेझर’ने सज्ज होणार

वॉशिंग्टन – ‘गेल्या दीड दशकात रशिया व चीनने शस्त्रनिर्मितीत घेतलेली आघाडी भरून काढण्यासाठी अमेरिकेने मोठे पाऊल उचलले आहे. अमेरिकी वायुसेनेच्या सामर्थ्यात वाढ करण्यासाठी तसेच हवाई सुरक्षा यंत्रणा भक्कम करण्यासाठी लवकरच अमेरिकेची लढाऊ विमाने लेझरने सज्ज होणार आहेत’, असे अमेरिकी वायुसेनेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी जाहीर केले. अमेरिकेची ही लेझरयुक्त लढाऊ विमाने रशिया व चीनच्या हायपरसोनिक क्षेपणास्त्रांसाठी जबरदस्त प्रत्युत्तर असेल, असा दावा अमेरिकी विश्‍लेषक करीत आहेत.

शस्त्रनिर्मितीत आघाडीवर असलेल्या अमेरिकेच्या ‘लॉकहिड मार्टिन’ या कंपनीने याआधीच अमेरिकी युद्धनौकांवर लेझर यंत्रणा सज्ज करण्याची तयारी केली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये अमेरिकेच्या नौदलातील ‘एर्ले बुर्के’ श्रेणीतील युद्धनौकांवर ‘एक्सएन-१’ लेझरची यशस्वी चाचणी घेतली होती. पुढच्या काही वर्षात अमेरिकी युद्धनौका लेझरने सज्ज होतील, असा दावा अमेरिकेच्या लष्करी विश्‍लेषकांकडून केला जातो. तसेच अमेरिकेच्या लांब पल्ल्याच्या टेहळणी विमानांमध्येही ‘लेझर’ किंवा ‘डेथ रे’ बसविल्याच्या बातम्या मधल्या काळात प्रसिद्ध झाल्या होत्या. पण अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाने याबाबत अधिकृतरित्या माहिती उघड केलेली नाही.

मात्र अमेरिकेची लढाऊ विमाने लवकरच लेझरने सज्ज होणार असल्याची माहिती ‘एअर फोर्स रिसर्च लॅबोरेटरी’च्या प्रवक्त्या ‘इव्हा ब्लेलॉक’ यांनी दिली. ‘लेझरने सज्ज असलेली लढाऊ विमाने वेगवान आणि अचूक लक्ष्य भेदण्याची संधी देतील. यामुळे अमेरिकी संरक्षणदलांच्या क्षमतेत प्रचंड वाढ होईल’, असा दावा ब्लेलॉक यांनी केला. अमेरिकन वायुसेनेच्या या प्रयोगशाळेमध्ये लेझर वेपन्सचा वापर करण्याबाबत सध्या वेगाने प्रयोग सुरू असून युद्धनौकांवर तैनात केल्या जाणार्‍या ‘लेझर पॉड’चा आकार कमी करून त्याचा वापर लढाऊ विमानांमध्ये करण्यासाठी संशोधन महत्त्वाच्या टप्प्यात पोहोचले आहे.

प्राथमिक स्तरावर या ‘लेझर पॉड’ची चाचणी वायुसेनेतील ‘सी-१३०’ आणि ‘सी-१७’ या अवजड विमानांमध्ये करण्यात येईल. त्यानंतर या लेझर पॉडची तैनाती ‘एफ-३५’ या अतिप्रगत स्टेल्थ लढाऊ विमानात करण्यात येईल, अशी माहिती ब्लेलॉक यांनी दिली. लढाऊ विमानातील ‘गन पॉड’ची जागा घेतील. यामुळे लढाऊ विमानांची हल्ल्याची क्षमता वाढेल, असा दावा अमेरिकन वायुसेनेने केला. या ‘लेझर पॉड’च्या यशस्वी चाचणीनंतर २०२१ साली अमेरिकी लढाऊ विमाने लेझरने सज्ज होतील, असे बोलले जाते.

दरम्यान, रशिया व चीन यांनी हायपरसोनिक क्षेपणास्त्रांच्या निर्मितीत आघाडी घेतल्याचे अमेरिकेचे संरक्षणदल मान्य करीत असून अमेरिकेनेही या स्पर्धेत आघाडी घेण्यासाठी हायपरसोनिक क्षेपणास्त्रांच्या निर्मितीचा वेग वाढविण्यास सुरुवात केली आहे. अशा परिस्थितीत लेझरने सज्ज असलेली अमेरिकेची लढाऊ विमाने रशिया व चीनसाठी इशाराघंटा ठरतील, असा दावा अमेरिकी विश्‍लेषक व लष्करी माध्यमे करीत आहेत.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info