कॅराकस – मदुरो यांना सत्तेवरून खाली खेचण्यासाठी लाखोंच्या संख्येने व्हेनेझुएलाचे नागरिक रस्त्यावर उतरतील. हा व्हेनेझुएलाच्या इतिहासातील सर्वात मोठा संघर्ष ठरेल, अशी घोषणा जुआन गैदो यांनी केली होती. यानंतर व्हेनेझुएलामध्ये भीषण रक्तपाताची भयावह शक्यता वर्तविली जात आहे. क्युबा व मेक्सिको या देशांनी व्हेनेझुएलातील सत्तासंघर्षात भयंकर रक्तपात घडेल, अशी भीती व्यक्त करून हा संघर्ष थांबविण्याचे आवाहन केले आहे. तर राष्ट्राध्यक्ष मदुरो यांच्या सरकारला सहाय्य करणार्या क्युबाची कोंडी करण्याची धमकी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी दिली आहे. याबरोबरच अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी व्हेनेझुएलाच्या लष्करी अधिकार्यांनी राष्ट्राध्यक्ष मदुरो यांची सत्ता उलथून टाकावी, असा सज्जड इशारा दिला आहे.
व्हेनेझुएलाचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मदुरो यांनी सत्ता सोडली नाही, तर भयंकर परिणाम होईल, असा इशारा जुआन गैदो यांनी दिला होता. गैदो हेच व्हेनेझुएलाचे खरे राष्ट्राध्यक्ष असल्याचा दावा करून अमेरिकेसहीत ५० देशांनी त्यांनाच व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष मान्य केले आहे. त्यामुळे व्हेनेझुएलामध्ये एकाच वेळी दोन राष्ट्राध्यक्ष सक्रिय असल्याचे दिसत आहे. अशा परिस्थितीत मदुरो यांनी सत्ता सोडावी, यासाठी गैदो यांनी निर्णायक संघर्ष पुकारला असून बुधवारी लाखो नागरिक रस्त्यावर उतरणार असल्याची घोषणा केली होती. त्याच्या आधी व्हेनेझुएलाची राजधानी कॅराकस येथे निदर्शने करणार्यांवर लष्करी वाहन चढविण्याचा व्हिडिओ प्रसारित करण्यात आला होता.
त्या पार्श्वभूमीवर व्हेनेझुएलाच्या इतिहासातील सर्वात मोठे आंदोलन छेडण्याचा दावा करणार्या गैदो यांच्या निदर्शनादरम्यान भयंकर हिंसाचार होईल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. पण राष्ट्राध्यक्ष मदुरो आपल्या भूमिकेवर ठाम असून काहीही झाले तरी आपण सत्ता सोडणार नसल्याचे ते ठासून सांगत आहेत. अशा परिस्थितीत व्हेनेझुएलात महाभयंकर रक्तपात होईल, अशी चिंता मेक्सिको आणि क्युबाने व्यक्त केली. हा संघर्ष वेळीच थांबवून रक्तपात टाळता येईल, असे या दोन्ही देशांनी सुचविले आहे. पण क्युबा व्हेनेझुएलाच्या सरकारला सहाय्य करीत असल्याचा ठपका ठेवून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांंनी क्युबाची कोंडी करण्याचा इशारा दिला. यासाठी कठोर निर्बंध लादले जातील व क्युबाची संपूर्ण कोंडी होईल, असे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी बजावले आहे. क्युबाचे हस्तक मदुरो यांना व्हेनेझुएलाच्या सत्तेवर राहण्यासाठी सहाय्य करीत असल्याचा आरोप अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनी केला होता. त्यानंतर बोल्टन यांनी व्हेनेझुएलाच्या वरिष्ठ लष्करी अधिकार्यांना खरमरीत संदेश दिला आहे. मदुरो यांची घटका भरली असून त्यांच्या विरोधात सारे पर्याय खुले आहेत. अशा परिस्थितीत व्हेनेझुएलाच्या लष्करप्रमुखांनी आणि इतर वरिष्ठ अधिकार्यांनी मदुरो यांची सत्तेवरून हकालपट्टी करावी, अशी सूचना जॉन बोल्टन यांनी केली.
दरम्यान, अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी व्हेनेझुएलातील सरकारवर लष्करी कारवाई केली जाऊ शकते, असे पुन्हा एकदा बजावले आहे. या प्रकरणी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री पॉम्पिओ रशियन परराष्ट्रमंत्र्यांची भेट घेणार असल्याच्याही बातम्या समोर येत आहेत. मात्र अमेरिकेकडून मदुरो यांना सज्जड इशारे दिले जात असताना, रशिया, चीन, क्युबा, इराण हे देश मात्र मदुरो यांच्या मागे उभे राहिले आहेत. त्यामुळे अमेरिकेने व्हेनेझुएलामध्ये घुसून लष्करी कारवाई केलीच, तर त्यावर या देशांकडून प्रतिक्रिया उमटू शकते. म्हणूनच व्हेनेझुएलाचे कंत्राट खाजगी लष्करी कंपन्यांना द्यावे, असा पर्याय ‘ब्लॅकवॉटर’ या कंपनीने अमेरिकेला दिला आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |