वॉशिंग्टन – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी २०० अब्ज डॉलर्सच्या चिनी उत्पादनांवर कर लादले असतानाही व्यापारयुद्धात तोडगा काढण्याचा चीनचा प्रयत्न अखेर अपयशी ठरला. गुरुवारी अमेरिकेबरोबर व्यापारी चर्चा करण्यासाठी दाखल झालेले चीनचे शिष्टमंडळ अमेरिकी राष्ट्राध्यक्षांच्या नव्या धमकीसह चीनमध्ये परतले आहे. चीनकडून अमेरिकेत निर्यात होणार्या सर्व उत्पादनांवर कर लादण्याची धमकी ट्रम्प यांनी दिली असून ते टाळण्यासाठी चीनकडे फक्त एक महिना असल्याचे बजावले आहे.
दोन दिवसांपूर्वीच, चीनने अमेरिकेबरोबरील व्यापारी कराराचा भंग केला असून चीनला याची किंमत चुकती करावीच लागेल, अशा शब्दात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी चीनला व्यापारयुद्ध तीव्र करण्याची धमकी दिली होती. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष ही धमकी देत असतानाही चीनचे उपपंतप्रधान ‘लिऊ हे’ यांच्या नेतृत्त्वाखाली चिनी शिष्टमंडळ व्यापारी वाटाघाटींसाठी अमेरिकेत दाखल झाले होते. चिनी शिष्टमंडळाची ही भेट चीनची हतबलता दाखवून देणारी असल्याची प्रतिक्रिया विविध वर्तुळांमध्ये उमटली होती.
मात्र ट्रम्प यांच्या करांमुळे जेरीस आलेल्या चीनपुढे आपली अर्थव्यवस्था वाचविण्यासाठी अमेरिकेबरोबर व्यापारी करार करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे अमेरिकेकडून करांच्या धमक्या व चिनी कंपन्यांवर निर्बंध आणि प्रवेशबंदीची कारवाई सुरू असतानाही चीन सातत्याने अमेरिकेबरोबर चर्चा करतो आहे. त्याचवेळी दुसर्या बाजूला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना चीनबरोबरील व्यापारी तूट घटवून देशातील उद्योगक्षेत्राला लाभ होईल, अशा तरतुदी चीनकडून मान्य करून घ्यायच्या आहेत.
त्यासाठी चीनकडून अमेरिकेत होणार्या पूर्ण निर्यातीला लक्ष्य करण्याची तयारीही ट्रम्प यांनी ठेवली आहे. हे करताना त्यांनी चीनकडून लादण्यात येणारे कर अथवा इतर कारवाईची पर्वा केली नसल्याचे त्यांच्या गेल्या काही दिवसातील वक्तव्यांवरून स्पष्ट होते. चिनी शिष्टमंडळ वाटाघाटीसाठी येत आहे, याची माहिती असतानाही ट्रम्प यांनी उघडपणे २०० अब्ज डॉलर्सच्या चिनी उत्पादनांवरील कर २५ टक्क्यांपर्यंत वाढविण्याचे निर्देश दिले. वाटाघाटी सुरू असतानाही चीनवर करार तोडल्याचा ठपका ठेऊन पूर्ण आयातीवर कर लादण्याचही धमकी दिली.
अमेरिकी राष्ट्राध्यक्षांच्या या आक्रमकतेनंतरही चीनच्या शिष्टमंडळाने सौम्य भूमिका घेऊन काहीही अडथळे आले तरी व्यापारी करार पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही दिली. चीनकडून येणार्या या प्रतिक्रिया आश्चर्यजनक मानल्या जात असून ट्रम्प यांच्या कठोर भूमिकेला यश मिळत असल्याचे चित्र सध्या समोर दिसत आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |