न्यूयॉर्क – सुमारे दोनशे कोटी ‘युझर्स’ असलेल्या ‘फेसबुक’ने आपली ‘लिब्रा’ नावाची ‘क्रिप्टोकरन्सी’ सुरू करण्याची घोषणा केली आहे. २०२० सालच्या मध्यापर्यंत हे ‘डिजिटल चलन’ बाजारात येईल. या चलनाला ‘बँकेतील ठेवी’ व ‘सरकारी रोख्यांचा’ आधार असेल, असे सांगितले जाते. फेसबुकच्या या ‘लिब्रा’ चलनासाठी माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील सुमारे २८ कंपन्या एकत्र आल्या आहेत. यामध्ये ‘पेपाल’, ‘मास्टरकार्ड’, ‘व्हिसा’, ‘व्होडाफोन’, ‘ईबे’, ‘उबर’ या कंपन्यांचा समावेश आहे. जगभरात ‘चलनयुद्ध’ सुरू असल्याचे दावे अर्थतज्ज्ञांकडून केले जात असताना, फेसबुकने केलेली ‘लिब्रा’ची घोषणा लक्षवेधी बाब ठरत असून त्याचा जागतिक अर्थकारणावर फार मोठा परिणाम संभवतो.
‘लिब्रा’चा पारंपरिक चलनामध्ये सहजतेने रुपांतरीत करता येऊ शकेल. तसेच एखाद्याला एसएमएस पाठविण्याइतकेच लिब्राद्वारे व्यवहार करणे सोपे असेल, अशी माहिती या प्रकल्पाचे प्रमुख ‘डेव्हिड मार्कस’ यांनी दिली. रोमन संस्कृतीनुसार ‘लिब्रा’चा अर्थ न्याय असा होता. तर फ्रेंच भाषेत ‘लिब्रा’ म्हणजे स्वातंत्र्य असे मानले जाते. लिब्रा हे चलन म्हणजे न्याय व स्वातंत्र्य यांच्याशी पैशांची सांगड घालण्याचा प्रयत्न ठरतो, असा दावा मार्कस यांनी केला आहे. माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्र तसेच वित्तीय क्षेत्रातील बलाढ्य कंपन्या या प्रकल्पात सहभागी झाल्या आहेत. त्यामुळे या प्रकल्पाची व्याप्ती प्रचंड असल्याचे संकेत आत्तापासूनच मिळू लागले आहेत.
जगभरात फेसबुकचे सुमारे दोनशे कोटी युझर्स आहेत. त्यांच्यामार्फत ‘लिब्रा’चा वापर होऊ शकतो. त्याचवेळी तंत्रज्ञान तसेच वित्तीय क्षेत्रात अग्रगण्य मानल्या जाणार्या कंपन्यांच्या सहभागामुळे लिब्राचा वापर मोठ्या प्रमाणात होईल, असा तर्क या प्रकल्पामागे आहे. म्हणूनच पुढच्या काळात चलनाच्या बाजारांमध्ये लिब्राची खरेदी व विक्री होईल, असा विश्वास फेसबुकने व्यक्त केला आहे. तसेच बँकेचे खाते नसलेले जगभरातील जवळपास १७० कोटी जण ‘लिब्रा’चा लाभ घेतील, असा दावा फेसबुकने केला आहे.
२०२० सालाच्या मध्यापर्यंत लिब्रा जगासमोर येईल, असे सांगितले जाते. जागतिक पातळीवरील अर्थकारणात फार मोठ्या उलथापालथी होत असताना, लिब्राची घोषणा करून फेसबुकने सार्या जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. अमेरिका आणि चीनमध्ये व्यापारयुद्ध पेटले असून चीन आपले चलन युआनचा दर जाणीवपूर्वक खाली ठेवून व्यापारी लाभ उकळत असल्याची अमेरिकेची तक्रार आहे. तर सध्या जागतिक चलन म्हणून वापरला जात असलेल्या ‘डॉलर’चा वापर अमेरिका शस्त्रासारखा करीत असल्याचा आरोप रशिया व चीनकडून केला जातो. याबरोबरच इतर देशांमध्येही चलनाच्या विनिमय दरावरून मोठे वाद आहेत.
अशा परिस्थितीत ‘लिब्रा’चा आंतरराष्ट्रीय अर्थकारणातील प्रवेश अमेरिकेच्या ‘डॉलर’ला आव्हान देणारा ठरू शकतो. सध्या अमेरिकेची संसद आणि न्याय विभागाने माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांच्या गैरव्यवहार व एकाधिकारशाहीविरोधात चौकशी सुरू केली आहे. या कंपन्यांना अमर्याद स्वातंत्र्य देता येणार नाही, असे सांगून अमेरिकेच्या संसद व न्याय विभागाने या कंपन्यांना नियंत्रित करण्यासाठी नवे कायदे किंवा आधीच्या कायद्यांमध्ये सुधारणांवर विचार सुरू केला आहे. अशा कंपन्यांमध्ये ‘फेसबुक’चाही समावेश आहे. अमेरिकेची ही कारवाई म्हणजे माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांविरोधात ट्रम्प प्रशासनाने सुरू केलेले युद्धच ठरते, असा दावा अमेरिकी माध्यमांनी केला होता.
या पार्श्वभूमीवर, ‘फेसबुक’ने केलेली ‘लिब्रा’ चलनाची घोषणा निराळेच संकेत देत आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |