दोन वर्षात युक्रेन जगाच्या नकाशात शिल्लक राहणार नाही

- रशियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांचा इशारा

the world map

मॉस्को/किव्ह – दोन वर्षानंतर युक्रेन जगाच्या नकाशात असेल की नाही, याची शाश्वती देता येणार नाही असा खरमरीत इशारा रशियाचे माजी राष्ट्राध्यक्ष दिमित्रि मेदवेदेव्ह यांनी दिला. युक्रेनने अमेरिकेकडून शस्त्रांपाठोपाठ इंधनाचीही मागणी केली आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना मेदवेदव्ह यांनी युक्रेनच्या भवितव्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा इशारा दिला. रशियन नेत्यांच्या आक्रमक वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या बायडेन प्रशासनाने युक्रेनला एक अब्ज डॉलर्सचे नवे संरक्षणसहाय्य जाहीर केले आहे. अमेरिकेच्या या घोषणेला जोरदार प्रत्युत्तर देताना रशियन संरक्षणदलांनी क्षेपणास्त्रहल्ला चढवित युक्रेन-पोलंड सीमेवरील शस्त्रांचे कोठार उद्ध्वस्त केले.

रशियाने गेल्या काही दिवसात युक्रेनमधील हल्ल्यांची तीव्रता व व्याप्ती प्रचंड प्रमाणात वाढविली आहे. डोन्बास क्षेत्रात रशिया एकावेळी नऊ जागांवरून युक्रेनी लष्करावर व तळांवर हल्ले चढवित असून युक्रेनची स्थिती दिवसेंदिवस अधिकाधिक वाईट होत चालल्याची वक्तव्ये स्थानिक अधिकारी करीत आहेत. युक्रेन दररोज 200हून अधिक जवान गमावित असून शस्त्रसाठ्याची टंचाई भासू लागली आहे. त्यामुळे युक्रेनचे नेते गेले काही दिवस सातत्याने शस्त्रसाठा वेगाने मिळावा यासाठी पाश्चिमात्य देशांसमोर मागण्या मांडत आहेत. पाश्चिमात्य देशांची विशेष बैठकही बुधवारी पार पडली आहे. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्याशी संवाद साधून एक अब्ज डॉलर्सच्या संरक्षणसहाय्याची घोषणा केली.

नव्या संरक्षणसहाय्यात 18 ‘155एमएम हॉवित्झर्स’, ‘हार्पून कोस्टल डिफेन्स सिस्टिम्स’, ‘155एमएम ॲम्युनिशन’, ‘हाय मार्स रॉकेट सिस्टिम ॲम्युनिशन’, 22 ‘टॅक्टिकल व्हेईकल्स’, ‘नाईट व्हिजन डिव्हायसेस’ व एक हजार ‘सिक्युअर रेडिओज्‌‍’ यांचा समावेश आहे. अमेरिकेच्या नव्या घोषणेनंतर युक्रेनला देण्यात येणाऱ्या संरक्षणसहाय्याचा आकडा 5.5 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचला आहे. या सहाय्यापूर्वी अमेरिकेने युक्रेनला हेलिकॉप्टर्स, तोफा, सशस्त्र वाहने, ड्रोन्स, रायफल्स, जॅवेलिन क्षेपणास्त्रे व अँटी एअरक्राफ्ट वेपन्स पुरविली आहेत. मात्र अमेरिका व युरोपिय देशांकडून मिळणारे शस्त्रसहाय्य पुरत नसल्याची तक्रार करीत युक्रेनने मोठ्या शस्त्रसहाय्याची मागणी केली आहे. युक्रेनकडून होणाऱ्या शस्त्रसहाय्याच्या मागणीपाठी रशियाकडून परदेशी शस्त्रसाठ्यांवर होणारे मोठे हल्ले हेदखील महत्त्वाचे कारण ठरले आहे. गेल्या दीड महिन्यात रशियाने युक्रेनला मिळालेल्या परदेशी शस्त्रसाठ्यासह या शस्त्रांच्या तळांना मोठ्या प्रमाणात लक्ष्य केले.

बुधवारीच पोलंडच्या सीमेनजिक असलेल्या युक्रेनच्या लिव्ह भागातील नाटोचा शस्त्रसाठा क्षेपणास्त्रांच्या सहाय्याने उद्ध्वस्त केल्याची माहिती रशियाने दिली. या साठ्यात अमेरिकेने दिलेल्या तोफा व इतर यंत्रणांचा समावेश होता, असे रशियाकडून सांगण्यात आले. दरम्यान, खार्किव्हमध्ये झालेल्या संघर्षात रशियन फौजांनी दोन अमेरिकी जवानांना ताब्यात घेतल्याचे समोर आले आहे. रॉबर्ट ड्य्रूक व अँडी ह्युन अशी या अमेरिकी जवानांची नावे आहेत. यापूर्वी एप्रिल महिन्यात दोन ब्रिटीश जवानांना पकडण्यात आले होते. या जवानांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

English  हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info