इस्रायलची कारवाई युद्धाची घोषणाच ठरते – लेबेनॉन व इराकच्या नेत्यांचा इशारा

इस्रायलची कारवाई युद्धाची घोषणाच ठरते – लेबेनॉन व इराकच्या नेत्यांचा इशारा

बैरूत/बगदाद – इराक व लेबेनॉनमधील इराणसंलग्न दहशतवाद्यांच्या तळांवर इस्रायलने घणाघाती हवाई हल्ले चढविले होते. यावर या दोन्ही देशांकडून जहाल प्रतिक्रिया उमटली आहे. इस्रायलची ही कारवाई म्हणजे युद्धाची घोषणाच ठरते, असे लेबेनॉनचे राष्ट्राध्यक्ष ‘मिशेल एऑन’ व इराकचे नेते ‘अबु माहदी अल-मोहनदीस’ यांनी म्हटले आहे. यामुळे इराक आणि लेबेनॉनमधील इराणसमर्थक जहाल गटांकडून इस्रायलला प्रत्युत्तर देण्याची जोरदार तयारी सुरू झाल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

गेल्या दोन दिवसात इस्रायलने चार देशांमध्ये हल्ले चढविल्याचा आरोप इराण, सिरिया, लेबेनॉन व इराक करीत आहे. यामध्ये इराकमधील इराणसंलग्न ‘पीएमएफ’चे शस्त्रास्त्रांचे कोठार, सिरियातील इराणच्या कुद्स फोर्सेसचे लष्करी तळ नष्ट झाले. तर पुढच्या काही तासात इस्रायलने गाझापट्टीतील हमासचे नौदलतळ आणि लेबेनॉनमधील ‘पीएफएलपी’ या इराणसंलग्न पॅलेस्टिनी दहशतवादी गटाचे मुख्यालय बेचिराख केले. यापैकी सिरिया आणि लेबेनॉनमधील हल्ल्याची जबाबदारी इस्रायलने स्वीकारली. मात्र इराकमधील हल्ल्यासाठी देखील इस्रायलच जबाबदार असल्याचा आरोप इराकमधील ‘पीएमएफ’चे वरिष्ठ नेते अल-मोहनदीस करीत आहेत.

इस्रायलच्या या कारवाईवर लेबेनॉन आणि इराकने जहाल प्रतिक्रिया दिली. इस्रायलच्या ड्रोन्सनी लेबेनॉनच्या हवाईहद्दीत घुसखोरी करून चढविलेल्या हल्ल्यांमुळे लेबेनॉनच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन झाल्याची टीका राष्ट्राध्यक्ष एऑन यांनी केली. इस्रायलचे हे हल्ले म्हणजे युद्धाची घोषणा असून लेबेनॉनला आपल्या सार्वभौमत्वाच्या सुरक्षेसाठी त्याला प्रत्युत्तर देण्याचा पूर्ण अधिकार असल्याचे राष्ट्राध्यक्ष एऑन म्हणाले. ‘लेबेनीज जनतेला युद्ध नाही तर शांती हवी आहे. पण कुणीही आम्हाला युद्धाची चिथावणी देणार असेल तर ते सहन करणार नाही’, असा इशारा लेबेनॉनच्या राष्ट्राध्यक्षांनी दिला.

इस्रायलचे इराकमधील हल्ले म्हणजे इराकच्या जनतेविरोधात पुकारलेले युद्ध असल्याचा आरोप इराकमधील इराणसंलग्न ‘पॉप्युलर मोबिलायझेशन फोर्सेस’चे (पीएमएफ) वरिष्ठ नेते ‘अल-मोहनदीस’ यांनी केला. इस्रायलच्या या इराकमधील हल्ल्यासाठी अमेरिका देखील तितकीच जबाबदार असल्याचा ठपका या गटाने ठेवला. त्याचबरोबर अमेरिकेने इराकमधून माघार घ्यावी. इराकच्या सुरक्षेसाठी अमेरिकेच्या सैन्यतैनातीची आवश्यकता नसल्याचा दावा ‘पीएमएफ’च्या मोहनदीस यांनी केला.

दरम्यान, गेल्या दोन दिवसात लेबेनॉनमधील घडामोडींवर संयुक्त राष्ट्रसंघाने चिंता व्यक्त केली आहे. तसेच सर्व गटांनी शांती राखण्याचे आवाहन राष्ट्रसंघाने केले. लेबेनॉननच्या सरकारमध्ये हिजबुल्लाह या इराणसमर्थक संघटनेची राजकीय आघाडी सहभागी झाली आहे. त्यामुळे पुढच्या काळात हिजबुल्लाह लेबनीज लष्कराच्या सहाय्याने इस्रायलला प्रत्युत्तर देणारी कारवाई करील, असे संकेत मिळत आहेत. हिजबुल्लाहच्या नेत्यांनी तशा धमक्या इस्रायलला दिल्या आहेत.

English     हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info