संयुक्त राष्ट्र- ‘सौदी अरेबियाच्या इंधनप्रकल्पांवर झालेल्या हल्ल्यांसाठी इराणच जबाबदार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या हल्ल्यांबाबत सुरू असलेल्या चौकशीला ब्रिटन, फ्रान्स आणि जर्मनी यांचे पूर्ण समर्थन असेल’, अशी घोषणा तीनही युरोपिय देशांनी संयुक्त निवेदनाद्वारे केली. त्याचबरोबर इराणने आपल्या आण्विक आणि क्षेपणास्त्र कार्यक्रमावर नव्याने चर्चा सुरू करावी, अशी सूचना या तीनही देशांनी केली आहे. याआधी इराणबरोबर झालेल्या अणुकराराचे समर्थन करणार्या ब्रिटन, फ्रान्स व जर्मनी या देशांनी सौदीवरील हल्ल्याला इराणच जबाबदार असल्याचे सांगून आपल्या मोठ्या भूमिकेत बदल झाल्याचे संकेत दिले आहेत.
संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेसाठी न्यूयॉर्क येथे उपस्थित असलेल्या ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन, जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यात विशेष बैठक पार पडली. या बैठकीनंतर जॉन्सन, मर्केल आणि मॅक्रॉन यांनी प्रसिद्ध केलेल्या संयुक्त निवेदनात इराणवर ताशेरे ओढले. ‘सौदीच्या इंधनप्रकल्पांवरील हल्ल्यांसाठी इराणच जबाबदार असल्याचे सुस्पष्ट झाले आहे. याबाबत इराणकडून इतर कुठल्याही प्रकारची चलाखी खपवून घेतली जाणार नाही’, असे सांगूने ब्रिटन, फ्रान्स व जर्मनीने इराणला फटकारले.
‘आखातातील स्थैर्य, सुरक्षा आणि शांतीसंदर्भातील ब्रिटन, फ्रान्स आणि जर्मनीची भूमिका एकसमान आहे. आखातात तणाव निर्माण होऊ नये आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील शांती व सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर इराणने नव्याने चर्चेत सहभागी व्हावे’, असे आवाहन या निवेदनातून करण्यात आले. ‘इराणने यापुढे कुठल्याही प्रकारच्या प्रक्षोभक कारवायांमधील सहभाग टाळावा. आपल्या आण्विक, क्षेपणास्त्र आणि क्षेत्रीय तणावाच्या मुद्यांवर चर्चा करण्यासाठी इराणने पुढाकार घेण्याची हीच योग्य वेळ आहे’, याची जाणीव तीनही युरोपिय देशांनी इराणला करून दिली.
पण इराणने सौदी अरेबियाच्या इंधनप्रकल्पांवरील हल्ल्यांचे आरोप फेटाळले आहेत. तसेच पाश्चिमात्य देशांबरोबर अणुकराराबाबत कुठल्याही नव्या चर्चेत सहभागी होणार नसल्याचे इराणचे परराष्ट्रमंत्री जावेद झरिफ यांनी स्पष्ट केले. २०१५ साली झालेल्या अणुकरारातील आश्वासनांचे पालन करण्यात युरोपिय देश अपयशी ठरल्याचा ठपका झरिफ यांनी राष्ट्रसंघाच्या बैठकीआधी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केला. त्याचबरोबर चार वर्षांपूर्वीच्या अणुकराराचे उल्लंघन करून इराणने सेंट्रिफ्युजेस व संवर्धित युरेनियमच्या निर्मितीची संख्या वाढविली आहे.
दरम्यान, इराणचा मुद्दा राजनैतिक स्तरावर सोडविण्यासाठी अमेरिका उत्सुक असून इराणच युद्धासाठी उतावीळ झाल्याचा आरोप अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी केला आहे. इराणचे राजकीय नेते व लष्करी अधिकारी देखील अमेरिका, सौदी व मित्रदेशांना सातत्याने युद्धाच्या धमक्या देत आहेत.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |