बीजिंग – चीनच्या अर्थव्यवस्थेत या वर्षाच्या प्रारंभापासून सुरू झालेले घसरणीचे सत्र सलग तिसर्या तिमाहीतही कायम राहिले आहे. जुलै ते सप्टेंबर २०१९ या तीन महिन्यांच्या कालावधीत चीनची अर्थव्यवस्था सहा टक्क्यांपर्यंत घसरली आहे. ही घसरण १९९२ सालानंतरचा नीचांक मानला जातो. काही दिवसांपूर्वीच अमेरिका व चीनमध्ये पहिल्या टप्प्यातील व्यापारी करार झाल्याचे समोर आले होते. या पार्श्वभूमीवर समोर आलेली ही आकडेवारी चीनच्या चिंतेत पुन्हा नवी भर टाकणारी ठरली आहे.
चीनच्या ‘नॅशनल ब्युरो ऑफ स्टॅटिस्टिक्स’ने शुक्रवारी तिसर्या तिमाहीतील आर्थिक विकासाची आकडेवारी जाहीर केली. त्यानुसार सप्टेंबर महिन्यात संपलेल्या तिमाहीत चीनचा विकास दर जेमतेम सहा टक्क्यांची गती राखू शकला. यापूर्वी एप्रिल ते जून २०१९ या तिमाहीत हाच दर ६.२ टक्के होता. त्यानंतर चीनच्या सत्ताधारी राजवटीने ‘युआन’ चलनाच्या अवमूल्यनापासून ते बँकांना अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्यापर्यंत अनेक उपाय हाती घेतले होते.
मात्र त्याला पुरेसे यश मिळाले नसल्याचे नव्या घसरणीतून सिद्ध झाले. चीनच्या अर्थव्यवस्थेतील घसरणीचा फटका आशियाई शेअरबाजारांना बसल्याचे समोर आले आहे.
गेल्यावर्षी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनच्या उत्पादनांवर कर लादून व्यापारयुद्धाला सुरुवात केली होती. करांपाठोपाठ चीनची गुंतवणुक रोखणे तसेच चिनी कंपन्यांवर निर्बंध लादण्यासारखे आक्रमक निर्णयही ट्रम्प यांनी घेतले होते. अमेरिकेबरोबरील या व्यापारयुद्धामुळे चीनच्या अर्थव्यवस्थेला गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने मोठे फटके बसत असून आर्थिक विकासाची नीचांकी पातळी हा सर्वात मोठा धक्का ठरतो. या वर्षाच्या पहिल्या तिमाहीतही चीनचा आर्थिक विकास दर ६.४ टक्क्यांपर्यंत घसरला होता.
त्यानंतर देशातील आयात-निर्यात तसेच अर्थव्यवस्थेचा कणा असणार्या उत्पादन क्षेत्रातील निर्देशांक सातत्याने कोसळत होते. मात्र तरीही चीनची सत्ताधारी राजवट ही स्थिती ‘न्यू नॉर्मल’ असल्याचे सांगून अर्थव्यवस्थेत अतिरिक्त पैसा ओतण्याच्या व त्याला गती देण्याच्या हालचाली करीत होती. मात्र याच कालावधीत चीनच्या वरिष्ठ नेतृत्त्वाला अर्थव्यवस्था दबावाखाली असल्याची कबुलीही देणे भाग पडले होते. चीनची अर्थव्यवस्था प्रचंड दडपणाखाली असून तिची घसरण सुरू झाली आहे, असे पंतप्रधान ली केकिआंग यांनी म्हटले होते.
दुसर्या बाजूला, अमेरिकेने चीनवर लादलेल्या करांमुळे चीनच्या अर्थव्यवस्था गडगडल्याचा टोला राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लगावला होता. ‘अमेरिकेने चीनवर लादलेल्या करांमुळे चीनमधील अनेक कंपन्या असे कर न लादलेल्या देशांमध्ये जात आहेत. हजारो कंपन्या चीन सोडत आहेत’, असे सांगून ट्रम्प यांनी चीनच्या अर्थव्यवस्थेत सुरू झालेल्या घसरणीकडे लक्ष वेधले होते. त्याचवेळी, चीनच्या राजवटीने प्रसिद्ध केलेली आकडेवारी दिशाभूल करणारी असून प्रत्यक्षात चीनची आर्थिक घसरण आकडेवारीपेक्षा जास्त असल्याचा दावा अमेरिकी प्रसारमाध्यमांनी केला होता.
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प व अमेरिकी प्रसारमाध्यमांनी केलेले हे दावे खरे ठरत असल्याचे चीनच्या नव्या आर्थिक घसरणीतून दिसून येत आहे. अर्थतज्ज्ञ बो झुआंग यांनी पुढील सहा महिने चीनच्या अर्थव्यवस्थेत घसरण कायम राहिल, असा अंदाज वर्तविला आहे. ‘कॅपिटल इकॉनॉमिक्स’मधील आर्थिक विश्लेषक ज्युलिअन इव्हान्स-प्रिट्चार्ड यांनी अमेरिकेबरोबरील व्यापारी करारानंतर चीनच्या अर्थव्यवस्थेत बदल होण्याची शक्यता नाकारली आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
![]() |
https://twitter.com/WW3Info |
![]() |
https://www.facebook.com/WW3Info |