टोकिओ – ‘ईस्ट चायना सी’च्या वादात चीनला घेरण्यासाठी जपानने वेगाने पावले उचलली आहेत. जपानने ‘ईस्ट चायना सी’मधील निर्जन बेट खरेदी केले. जपानने दुसर्या महायुद्धात वापरलेल्या या बेटावर लष्करी तळ प्रस्थापित करणार असल्याची माहिती जपानने दिली. यावर चीनने आक्षेप घेतला असून जपान या क्षेत्रात भीतीचे वातावरण निर्माण करीत असल्याची टीका केली आहे.
जपानच्या सरकारने दिलेल्या माहितीनुसार, ‘ईस्ट चायना सी’मधील ‘मागेशिमा’ बेटाची कायदेशीररित्या खरेदी करण्यात आली आहे. खाजगी विकासकाकडून १४ कोटी डॉलर्सच्या मोबदल्यात जपानने ‘मागेशिमा’ बेटाची खरेदी केली. जपानच्या किनारपट्टीपासून अवघ्या २० मैल अंतरावर असणार्या या बेटामुळे ‘ईस्ट चायना सी’मधील जपानच्या हितसंबंधांची सुरक्षा वाढेल, असा विश्वास जपानचे मुख्य कॅबिनेट सचिव ‘योशिहिदे सूगा’ यांनी व्यक्त केला.
‘‘‘ईस्ट चायना सी’च्या सागरी हद्दीतून प्रवास करणार्या जपानच्या विमानांच्या सुरक्षेसाठी आवश्यक असलेले लष्करी तळ म्हणून ‘मागेशिमा’ची खरेदी महत्त्वाची ठरते. लवकरच जपान सरकार या बेटावर लष्करी तळ, धावपट्टी विकसित करील’’, अशी माहिती सूगा यांनी दिली. जपानच्या ओकिनावा आणि क्युशी या दोन द्वीपसमूहांमध्ये असणारे हे बेट सामरिकदृष्ट्या महत्त्वाचे असल्याचा दावा सूगा यांनी केला.
दुसर्या महायुद्धात जपानने अमेरिकेवर हल्ले चढविण्यासाठी ‘मागेशिमा’ बेटावरील हवाईतळाचा वापर केला होता. पण दुसर्या महायुद्धानंतर सदर बेट निर्जन झाले होते. २०११ साली या बेटावर लढाऊ विमानांची चाचणी घेण्यासंबंधी अमेरिका व जपानमध्ये करार झाला होता. पण त्यानंतर अमेरिकेने टोकिओजवळच्या ‘इवो जिमा’ तळावर आपल्या विमानांची चाचणी सुरू केल्यामुळे सदर बेटाचा विकास करण्याची प्रक्रिया पुन्हा रेंगाळली होती.
अशा परिस्थितीत, जपानने सदर बेट खरेदी करण्याचा घेतलेला निर्णय महत्त्वाचा मानला जातो. सदर बेटाचा वापर लष्करी तळ म्हणून करण्याचे घोषित करून जपानने चीनला आव्हान दिल्याचा दावा केला जातो. जपानच्या सागरी हद्दीतील चीनच्या वाढत्या घुसखोरीला प्रत्युत्तर म्हणून जपान या बेटाचा वापर करील, असे स्पष्ट संकेत सूगा यांनी दिले. गेल्या वर्षभरात चीनच्या विनाशिका तसेच गस्तीनौकांनी ९९८ वेळा जपानच्या सागरी हद्दीचे उल्लंघन केले आहे.
‘ईस्ट चायना सी’मधील सेंकाकू बेटांच्या हद्दीत चीनच्या जहाजांनी ९९८ वेळा घुसखोरी केल्याची माहिती, जपानच्या सरकारने प्रसिद्ध केली. याआधी २०१३ साली चीनच्या जहाजांनी जपानच्या सागरी हद्दीचे ८१९ वेळा उल्लंघन केले होते. त्यामुळे या वर्षी चीनच्या घुसखोरीच्या प्रमाणात विक्रमी वाढ झाल्याची टीका जपानने केली. चीनच्या या घुसखोरीला प्रत्युत्तर देण्यासाठी २०१२ साली जपानने एका बेटाची खरेदी केली होती. ‘मागेशिमा’ या बेटाची खरेदी देखील चीनला उत्तर देणारी असल्याचे दिसत आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |