इराकमधील अमेरिकी तळांवर इराणने रॉकेट हल्ले घडविले – अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचा आरोप

इराकमधील अमेरिकी तळांवर इराणने रॉकेट हल्ले घडविले – अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचा आरोप

वॉशिंग्टन – ‘गेल्या काही दिवसांमध्ये इराकमध्ये झालेल्या रॉकेट हल्ल्यांना इराणच जबाबदार आहे. इराकमधील इराणसंलग्न गट रॉकेट हल्ले चढवून अमेरिकेचे लष्करी तळ तसेच अमेरिकी सैनिकांना लक्ष्य करीत आहेत’, असा आरोप अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने केला. त्याचबरोबर या रॉकेट हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्याचा पूर्ण अधिकार अमेरिका राखून ठेवत असल्याचे अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाने ठणकावले. दरम्यान, आखातातील अमेरिकेच्या २१ लष्करी तळांवर इराणने हजारो क्षेपणास्त्रे रोखल्याची धमकी इराणच्या वरिष्ठ लष्करी अधिकार्‍याने गेल्याच आठवड्यात दिली होती.

गेल्या पाच आठवड्यांमध्ये इराकमधील अमेरिकेचे लष्करी तळ, तसेच अमेरिकी सैनिक तैनात असलेल्या मित्रदेशांच्या लष्करी तळांवर नऊ वेळा रॉकेट हल्ले झाले आहेत. तर सोमवारी राजधानी बगदादमधील आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ चार रॉकेट हल्ले झाले. या रॉकेटचे लक्ष्य आंतराष्ट्रीय विमानतळ नाही तर जवळच असणारा आपला लष्करी तळ होता, असा आरोप अमेरिकेने केला आहे. हल्ला झाला त्याठिकाणी अमेरिकेचे सैनिक गस्त घालत होते. या रॉकेट हल्ल्यात जीवितहानी टळली. पण अमेरिकेने रॉकेट हल्ल्यांचे सत्र अधिक गांभीर्याने घेतले आहे.

इराण, रॉकेट हल्ले, डेव्हिड शेंकर, लष्करी तळ, प्रत्युत्तर, अमेरिका, इराक, इस्रायल

अमेरिकेचे सैनिक व लष्करी तळांना लक्ष्य करणार्‍या रॉकेट हल्ल्यांसाठी इराण व इराकमधील इराणसंलग्न गट जबाबदार असल्याचा आरोप अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी डेव्हिड शेंकर यांनी केला. ‘‘बलाड, अल-असाद, इत्यादी लष्करी तळांवर ‘आयएस’विरोधी कारवाईसाठी तैनात असलेल्या अमेरिका व मित्रदेशांच्या सैनिकांना लक्ष्य करण्यासाठी इराणसंलग्न गट हे रॉकेट हल्ले चढवित आहे. इतिहास लक्षात घेतला तर या हल्ल्यांसाठी इराणच जबाबदार असल्याचे उघड होईल. अमेरिका केवळ सबळ पुराव्याची प्रतिक्षा करीत आहे’’, असा इशारा शेंकर यांनी दिला.

पेंटॅगॉनचे प्रवक्ते कमांडर शॉन रॉबर्टसन यांनी अमेरिकी वृत्तवाहिनीशी बोलताना, लष्करी तळांवरील रॉकेट हल्ल्यांची गंभीर दखल घेतल्याचे स्पष्ट केले. ‘अमेरिका व मित्रदेशांचे सैनिक किंवा येथील लष्करी तळांवर सुरू असलेले हल्ले अमेरिका कदापि सहन करणार नाही. या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्याचे अधिकार अमेरिका राखून ठेवत आहे’, असे सांगून कमांडर रॉबर्टसन यांनी इराण व इराणसंलग्न गटांवर कारवाईचे संकेत दिले.

गेल्या महिन्याभरात इराकमधील लष्करी तळांवरील हल्ल्यांसाठी वापरलेल्या रॉकेट्सची बनावट व त्यांची मारक क्षमता पाहता, हे हल्ले इराणनेच केल्याचा दावा लष्करी विश्‍लेषक करीत होते. इराणने आखातातील अमेरिकेच्या २१ लष्करी तळांवर हल्ल्यांची तयारी केली असून दर दिवशी २१ हजार क्षेपणास्त्रे दागण्याची क्षमता आपल्याकडे असल्याचा दावा इराणच्या वरिष्ठ अधिकार्‍याने केला होता. पुढच्या काही तासात अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेने देखील इराणची क्षेपणास्त्रे अमेरिका, सौदी अरेबिया व इस्रायलवर रोखल्याचे बजावले होते.

अशा परिस्थितीत, इराकमधील अमेरिकेचे लष्करी तळ व सैनिकांवर झालेल्या रॉकेट हल्ल्यांमुळे या क्षेत्रातील तणाव वाढला आहे. याआधीच अमेरिकेने आखातात मोठ्या प्रमाणात सैन्यतैनाती करून ठेवलेली आहे. अशावेळी अमेरिका किंवा मित्रदेशांनी इराणच्या या रॉकेट हल्ल्यांना प्रत्युत्तर दिले तर आखातात संघर्षाचा मोठा भडका उडण्याची दाट शक्यता आहे.

दरम्यान, अमेरिकेने इराकमधील दूतावासाद्वारे आपल्या नागरिकांना सावध राहण्याचा इशारा जारी केला आहे. इराकमधील निदर्शनांचा वापर करून अमेरिकी नागरिकांना लक्ष्य केले जाऊ शकते, अशी चिंता अमेरिकेच्या राजदूताने व्यक्त केली आहे.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info