वॉशिंग्टन/बीजिंग – अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनच्या आघाडीच्या पाच वृत्तसंस्था कम्युनिस्ट राजवटीच्या एजंट असल्याचा ठपका ठेवला आहे. अमेरिकेत व्यवस्था चालविणार्या या पाचही वृत्तसंस्थांची नोंदणी ‘परदेशी हेर’ म्हणून केली जाईल. त्याचबरोबर या वृत्तसंस्थांनी अमेरिकेतील त्यांच्या कर्मचार्यांची वैयक्तिक माहिती ट्रम्प प्रशासनाकडे सुपूर्द करावी, अशी सूचना अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने केली.
चीनची आघाडीची ‘शिनहुआ’, ‘चायना ग्लोबल टेलिव्हिजन नेटवर्क’ (सीजीटीएन वृत्तवाहिनी), ‘चायना रेडिओ इंटरनॅशनल’, ‘चायना डेली डिस्ट्रिब्युशन कॉर्पोरेशन’ आणि ‘हाई तियान डेव्हलपमेंट’ या पाच वृत्तसंस्थांना अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने नोटीस बजावली आहे. चीन आपल्या या वृत्तसंस्थांच्या माध्यमातून अमेरिकेमध्ये आपला अजेंडा राबवित आहे, चीनच्या प्रचारतंत्रासाठी केला जात असल्याचा आरोप अमेरिकेने केला आहे.
‘अमेरिकेला कुठल्याही प्रकारच्या प्रचारयुद्धात अडकायचे नाही. पण चीनच्या माध्यमांनी अमेरिकेविरोधात हे युद्ध पुकारले आहे. आज अमेरिकेत कार्यरत असलेली प्रत्येक चिनी वृत्तसंस्था १०० टक्के चीनच्या कम्युनिस्ट राजवटीसाठी काम करीत आहे’, असा ठपका अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने ठेवला. या नव्या कारवाईमुळे लवकरच चिनी वृत्तसंस्थांना अमेरिकेच्या कायदा मंत्रालयाकडे ‘फॉरिन मिशन’ म्हणून नोंदणी करावी लागणार आहे. असे झाले तर या चिनी वृत्तसंस्था व त्यांच्या पत्रकारांच्या प्रत्येक हालचालीवर अमेरिकेची नजर असेल, असे बोलले जाते.
राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी चीनची सर्व सूत्रे स्वत:च्या हाती घेतली आहेत. राष्ट्राध्यक्षपदाबरोबर लष्कराचे नेतृत्व आणि कम्युनिस्ट राजवटीवरही जिनपिंग यांचाच प्रभाव आहे. जिनपिंग यांच्याशिवाय चीनमध्ये दुसरा पर्यायच नसल्याचा दावा चिनी माध्यमे आपल्याच जनतेला व लष्कराला वारंवार करून देत आहेत. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, अमेरिकेला चिनी माध्यमांवरील कारवाईचा निर्णय घ्यावा लागल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले.
अमेरिकेच्या या निर्णयावर चीनकडून प्रतिक्रिया उमटली आहे. आपल्या माध्यमांवरील अमेरिकेची ही कारवाई पूर्णपणे अमान्य असल्याचे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते ‘गेंग शुआंग’ यांनी म्हटले आहे. अमेरिका अजूनही शीतयुद्धाच्या मानसिकतेमध्ये अडकल्याचे या निर्णयातून स्पष्ट होते, असा ठपका शुआंग यांनी ठेवला. दरम्यान, शीतयुद्धाच्या काळात अमेरिकेने सोव्हिएत रशियाच्या ‘प्रावदा’ या सरकारी वृत्तसंस्थेवर अशीच कारवाई केली होती.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |