Breaking News

लवकरच युरोपच्या सीमेवर कोट्यवधी निर्वासित धडकतील – तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप एर्दोगन

अंकारा/अथेन्स – ‘तुर्कीने शरणार्थी व निर्वासितांसाठी केलेला स्वार्थत्याग आता संपुष्टात आला आहे. यापुढे तुर्की या निर्वासितांना आश्रय देणार नाही. गेल्या काही तासात हजारो-लाखो निर्वासित युरोपच्या सीमेवर धडकले असून लवकरच कोट्यवधी निर्वासितांसाठी युरोपने तयार रहावे’, अशी घोषणा तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप एर्दोगन यांनी केली. ग्रीस आणि हंगेरीने निर्वासितांना स्वीकारण्यास नकार दिला असून आपल्या सीमारेषा बंद केल्या आहेत. यानंतर तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांनी ही घोषणा करून युरोपिय देशांना धमकावले.

            

शनिवारी तुर्कीने निर्वासितांचे लोंढे युरोपिय देशांच्या दिशेने सोडले. तुर्कीच्या या कारवाईवर युरोपिय महासंघाने टीका केली असून ग्रीस, हंगेरी, मॅसेडोनिया, फ्रान्स या देशांनी नव्या निर्वासितांसाठी आपल्या सीमारेषा बंद केल्या आहेत. तर काही युरोपिय देश आपल्या संपर्कात असल्याचा दावा तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी केला. ‘तुर्कीने युरोपसाठीची आपली सीमारेषा बंद करून निर्वासितांना थोपवून धरावे’, यासाठी युरोपिय नेते आपल्याला फोन करीत असल्याचे एर्दोगन यांनी सोमवारी स्पष्ट केले.

पण या निर्वासितांच्या आधी सिरियातील अस्साद राजवटीच्या कारवाईवर चर्चा होणे आवश्यक असल्याचे एर्दोगन यांनी म्हटले आहे. ‘यासाठी जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल तसेच बल्गेरियाच्या पंतप्रधानांची आपण भेट घेणार असून पाच देशांच्या बैठकीत यावर चर्चा पार पडणार आहे. पण तोपर्यंत तुर्की युरोपिय देशांसाठी निर्वासितांचा लोंढा रवाना करणे सुरू ठेवणार असून आपल्या मागण्या मान्य झाल्या नाही तर कोट्यवधी निर्वासित युरोपिय देशांच्या सीमेवर धडकतील’, असे एर्दोगन यांनी धमकावले.

एर्दोगन यांच्या या घोषणेआधी ग्रीसचे पंतप्रधान कॅरिआकोस यांनी राष्ट्रीय सुरक्षा समितीची बैठक घेऊन सीमेवरील गस्त वाढविण्याची घोषणा केली. तसेच एकही निर्वासित ग्रीसमध्ये दाखल होणार नाही, याची खबरदारी घेण्याची सूचना केली. बेकायदेशीररित्या आपल्या सीमेजवळ किंवा सागरी हद्दीजवळ दाखल झालेल्या निर्वासितांना माघारी पाठविले जाईल, असेही ग्रीसच्या पंतप्रधानांनी बजावले.

ग्रीसपाठोपाठ हंगेरीने देखील निर्वासितांसाठी आपली सीमारेषा बंद केली आहे. निर्वासितांनी दिलेले कुठलेही अर्ज, फिर्याद मान्य केली जाणार नाही. कोरोनाव्हायरसचा फैलाव व त्याचा धोका लक्षात घेऊन हंगेरीने हा निर्णय घेतल्याचे सुरक्षा यंत्रणांनी स्पष्ट केले. या निर्वासितांमध्ये इराणी नागरिकांचाही समावेश असू शकतो. सध्या चीनबाहेर इराणमध्ये कोरोनाव्हायरसचा फैलाव वेगाने होत असल्यामुळे ही खबरदारी घेतल्याचे हंगेरीच्या वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले.

English     हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info