तैवानवर हल्ला चढविण्याची चीनसमोर नामी संधी – चीनच्या माजी लष्करी अधिकाऱ्यांचा दावा

तैवानवर हल्ला चढविण्याची चीनसमोर नामी संधी – चीनच्या माजी लष्करी अधिकाऱ्यांचा दावा

बीजिंग – संपूर्ण जग कोरोनाव्हायरसच्या साथीचा मुकाबला करण्यात गुंतले असताना चीनने आक्रमण करून तैवान ताब्यात घ्यावा, अशी मागणी चीनच्या लष्कराशी संबंधित विश्लेषक व तज्ञांकडून होत आहे. काहींनी मात्र घाईची गरज नसून राष्ट्राध्यक्ष जिनपिंग योग्य वेळी निर्णय घेतील असा सल्ला दिला आहे. एकीकडे तैवान ‘डब्ल्यूएचओ’मध्ये (वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन) कोरोनाच्या साथीबाबत भूमिका मांडण्यासाठी प्रयत्न करीत असताना चीनमधून यासंदर्भात येत असलेल्या बातम्या या देशाचे इरादे उघड करताना दिसत आहे.

कोरोनाच्या साथीतून विविध देशांमधील संरक्षणदलेही सुटलेली नाहीत. अमेरिकेकडून जगाच्या विविध भागांमध्ये तैनात असणाऱ्या सैनिकांनाही कोरोनाव्हायरसची लागण झाली असून त्यातून आशिया-प्रशांत क्षेत्रात तैनात असणाऱ्या अमेरिकी विमानवाहू युद्धनौकाही सुटलेल्या नाहीत. या क्षेत्रात तैनात असणाऱ्या चारही विमानवाहू युद्धनौकांवरील सैनिकांना कोरोनाव्हायरसची लागण झाली आहे. त्यामुळे तैवानच्या संरक्षणासाठी वचनबद्ध असलेली अमेरिका युद्धनौकांचा वापर करू शकणार नाही व त्याचा फायदा चीनने उचलायला हवा, अशी मागणी चीनच्या माजी लष्करी अधिकाऱ्यांनी केली आहे.

तियान फेइलॉंग नावाच्या विश्लेषकांनी थेट २००५ सालच्या एका कायद्याचा आधार घेऊन चीनने बिनधास्तपणे लष्करी बळावर तैवान ताब्यात घ्यावा, असा सल्ला दिला आहे. तैवानमधील सध्याच्या राजकीय व सामाजिक घटना पाहता शांतीपूर्ण मार्गाने वाटाघाटी करून तैवानचा मुद्दा सुटणार नाही, असेही फेइलॉंग यांनी म्हटले आहे.

चीनच्या माजी लष्करी अधिकारी व विश्लेषकांनी तैवानवरील आक्रमणाबाबत केलेल्या मागणीला एका माजीं अधिकाऱ्यानेच विरोध केला आहे. किओ लिआंग यांनी, आता तैवानवर हल्ला करणे जोखमीचे व खर्चिक ठरेल, असे म्हटले आहे. चीनकडे अमेरिकेला आव्हान देता येईल असे आर्थिक व लष्करी आल्यानंतरच तैवानवर हल्ला करावा, अशी सूचना लिआंग यांनी केली आहे.

चीनच्या माजी लष्करी अधिकारी आणि विश्लेषकांकडून पुढे येणारी मागणी देशातील सत्ताधारी कम्युनिस्ट राजवटीचे इरादे उघड करीत आहे. चीनकडून ‘साऊथ चायना सी’ व नजिकच्या क्षेत्रात आक्रमक सामरिक हालचाली सुरू असल्याचे गेल्या काही आठवड्यांमधील घटनांवरून समोर आले होते. अमेरिकेसह मित्रदेशांनी चीनच्या या हालचालींवर तीव्र आक्षेपही घेतला होता. पण चीनने त्याकडे दुर्लक्ष केले असून आपल्या महत्त्वाकांक्षा व त्या पूर्ण करण्याचे इरादे उघड करण्यास सुरुवात केल्याचे दिसत आहे.

चीनमध्ये तैवानवरील आक्रमणाचा सूर तीव्र होत असतानाच ‘डब्ल्यूएचओ’च्या बैठकीतील समावेशाबाबतही चीनने दबावाची भूमिका घेतली आहे. कोणत्याही स्थितीत तैवान १८ मे रोजी होणाऱ्या बैठकित सहभागी होऊ नये यासाठी चीनने सदस्य देशांवर आर्थिक व राजनैतिक दडपण आणण्यास सुरुवात केल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले आहे.

हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info