काबूल – अमेरिकेने अफगाणिस्तानातील तालिबानच्या ठिकाणांवर हवाई हल्ले चढविले. तालिबानने संघर्षबंदीची घोषणा केल्यानंतर अमेरिकेने तालिबानवर चढविलेला हा पहिलाच हल्ला ठरतो. तालिबानने अफगाणिस्तानच्या सुरक्षा दलांवरील हल्ले कायम ठेवले तर अमेरिका तालिबानवर तीव्र हल्ले चढविल, असा इशारा अमेरिकेने आधीच दिला होता. सदर हवाई हल्ला चढवून अमेरिकेने आपला इशारा प्रत्यक्षात उतरविल्याचे दिसत आहे.
अमेरिकेच्या तालिबानवरील हल्ल्याच्या बातम्या येत असताना अफगाणिस्तानमध्ये तालिबानने घडविलेल्या हल्ल्यात अफगाणी सुरक्षा दलाचे १५ जवान ठार झाले आहेत. याआधीही तालिबानने अफगाणी जवानांना लक्ष्य ठरणारे रक्तरंजित हल्ले चढविले होते. यानंतर गेल्या दोन दिवसात अमेरिकेने अफगाणिस्तानाच्या कंदहार आणि फरहा प्रांतातील तालिबानच्या ठिकांणावर हवाई हल्ले चढविले. अमेरिकेच्या लष्कराचे प्रवक्ते सनी लेगेट्ट यांनी सोशल मीडियावरुन ही माहिती जाहीर केली. याबाबतचे अधिक तपशील प्रसिद्ध झालेले नाही.
२६ मे रोजी ईदच्या पार्श्वभूमीवर तालिबानने संघर्षबंदी जाहीर केली होती. पण त्यानंतर ही तालिबानचे अफगाणिस्तानातील सुरक्षादलांवरील हल्ल्यांचे सत्र सुरु झाले होते. त्यानंतर अमेरिकेने तालिबानला इशारा दिला होता. मात्र अमेरिकेच्या इशांऱ्याकडे दुर्लक्ष करुन तालिबानने अफगाणिस्तानातील हल्ले सुरु ठेवले होते. यामुळे संतापलेल्या अमेरिकेने तालिबानला हवाई हल्ल्यांद्वारे लक्ष्य केल्याचे दिसत आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |