अमेरिकेचा इंडो-पॅसिफिक क्षेत्रात मोठा युद्धसराव

अमेरिकेचा इंडो-पॅसिफिक क्षेत्रात मोठा युद्धसराव

वॉशिंग्टन – अमेरिकेच्या दोन अजस्त्र विमानवाहू युद्धनौका, १० हून अधिक विनाशिका, ४०० पॅराट्रूपर्स यांच्यासह टेहळणी विमाने यांचा समावेश असलेले युद्धसराव इंडो-पॅसिफिक क्षेत्रात नुकतेच पार पडले. गुआम बेट, तैवानचे आखात आणि फिलिपाईन्सच्या सागरी हद्दीत हे सराव सुरू होते. येत्या काळात युद्ध पेटल्यास इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील बेटांचा ताबा घेण्याच्या उद्देशाने सदर सराव पार पडल्याची माहिती अमेरिकेच्या यंत्रणांनी दिली. चीनबरोबरचा तणाव वाढत असताना अमेरिकेने गुआम बेटापासून ते फिलिपाईन्सच्या सागरी क्षेत्रापर्यंत आयोजित केलेले सराव चीनसाठी इशारा ठरतात.

अमेरिकी लष्कराच्या पाच ‘सी-१७ ग्लोबमास्टर’ विमानांमधून ४०० पॅराट्रूपर्स बुधवारी गुआम बेटावर दाखल झाले. यावेळी गुआम बेटावरील अँडरसन एअरबेसचा ताबा घेणे आणि येथील धावपट्टी सुरक्षित करण्याचा सराव पार पडला. ‘अमेरिकेचे सैनिक इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील कुठल्याही तळावर कमीतकमी वेळात तैनात केले जाऊ शकतात आणि संबंधित भागाचा ताबा घेऊ शकतात, हे उद्दिष्ट या युद्धसरावातून गाठता आले’, अशी माहिती अमेरिकेच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी दिली. गेल्या कित्येक दशकांमध्ये गुआम बेटांवर पार पडलेला हा सर्वात मोठा सराव होता, अशी माहिती स्थानिक माध्यमे देत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून गुआम बेट वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत आहे. जपानपासून अडीच हजार किलोमीटर अंतरावर असलेल्या या गुआम बेटावर अमेरिका बी-२१ स्टेल्थ बॉम्बर्स विमाने तैनात करणार आहे. गेल्याच महिन्यात अमेरिकेने या बेटावर विनाशिकाभेदी क्षेपणास्त्रांनी सज्ज असलेली बी१-बी सुपरसोनिक बॉम्बर विमानांची आणखी एक तुकडी तैनात केली होती. अशात अमेरिका जर्मनीतून माघारी घेत असलेले ९,५०० सैनिक देखील याच सागरी क्षेत्रात तैनात करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे. याव्यतिरिक्त अमेरिका भारत, ऑस्ट्रेलिया आणि जपान या क्वाड देशांच्या वैमानिकांना गुआम बेटावरच विशेष प्रशिक्षण देणार आहे. तर काही दिवसांपूर्वी तैवानच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी गुआम बेटाला भेट देऊन अमेरिकी अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. या सर्व घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर, अमेरिकेच्या पॅराट्रूपर्सचा गुआम बेटांवरील सराव निराळेच संकेत देत आहेत.

गुआम बेटावरील या युद्धसरावा व्यतिरिक्त तैवानचे आखात आणि फिलिपाईन्सच्या सागरी क्षेत्रात अमेरिकेच्या नौदलाचा मोठा सराव पार पडला. अमेरिकेच्या नौदलातील ‘यूएसएस निमित्झ’ आणि ‘यूएसएस रोनाल्ड रिगन’ या दोन अजस्त्र विमानवाहू युद्धनौकांनी आपल्या विनाशिका आणि पाणबुड्यांच्या ताफ्यासह सराव केला. येथील सागरी क्षेत्रातील कुठल्याही आगळिकीला तोंड देण्यासाठी अमेरिकेच्या विमानवाहू युद्धनौकेचा ताफा सज्ज असल्याचे स्पष्ट संकेत या युद्धसरावातून दिल्याचे अमेरिकी नौदलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. रात्रीच्या अंधारात पार पडलेल्या या युद्धसरावात अमेरिकी नौदलाच्या १० हजार सैनिकांनी सहभाग घेतला होता. गेल्याच आठवड्यात ‘यूएसएस निमित्झ’ आणि ‘यूएसएस थियोडोर रुझवेल्ट’ या युद्धनौकांनी सराव केला होता.

इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील अमेरिकी वायुसेना आणि नौदलाचा हा सराव सुरू होण्याआधी गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेची टेहळणी विमाने येथील सागरी क्षेत्रात गस्त घालीत आहेत. गेल्या दहा दिवसात अमेरिकेच्या तीस विमानांनी ‘साऊथ चायना सी’ आणि फिलिपाईन्सच्या सागरी क्षेत्राजवळ गस्त घातल्याची माहिती समोर येत आहे. अमेरिकन नौदलाचा युद्धसराव सुरू होण्याच्या काही तास आधी किमान सहा टेहळणी विमाने या क्षेत्रात गस्त घालत असल्याचे एका संकेतस्थळाने म्हटले आहे. यामध्ये ‘इलेक्ट्रॉनिक्स अँड सिग्नल्स इंटेलिजन्स’च्या विमानासह नौदलाचे लांब पल्ल्याची टेहळणी विमाने, ड्रोन्स, पाणबुडीभेदी विमाने आणि इंधनवाहू टॅंकर विमानांचाही समावेश होता.

दरम्यान, इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील अमेरिकेचा हा युद्धसराव चीनला इशारा देणारा होता, हे उघड आहे. गेल्या आठवड्यात ‘साऊथ चायना सी’ क्षेत्रातील अमेरिकी युद्धनौकांच्या गस्तीवर चीनने टीका केली होती. त्यामुळे अमेरिकेच्या या युद्धसरावावर चीनकडून प्रतिक्रिया अपेक्षित आहे.

English      हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info