पॅरिस – भूमध्य समुद्रातील इंधनवायूच्या उत्खननासाठी तुर्कीने सुरू केलेल्या आक्रमक हालचालींवर फ्रान्ससह युरोपिय महासंघाकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्यूएल मॅक्रॉन यांनी तुर्कीला भूमध्य समुद्रातील ‘रेड लाईन’ न ओलांडण्याचा इशारा दिला. तुर्कीने या रेड लाईनचे उल्लंघन केले तर लष्करी कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट संकेत फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी दिले आहेत. तर या प्रकरणी युरोपिय महासंघाने तुर्कीवर आर्थिक निर्बंध लादण्यात येतील, असे बजावले आहे. दरम्यान, फ्रान्ससह युरोपिय महासंघाकडून कारवाईचे इशारे दिले जात असताना, भूमध्य समुद्रात तुर्की आणि ग्रीसच्या लढाऊ विमानांमध्ये ‘डॉगफाईट’ (हवाई चकमक) झाल्याची माहिती समोर येत आहे.
गेल्या काही महिन्यांपासून लिबियातील संघर्ष, नाटोतील भूमिका आणि भूमध्य समुद्रातील इंधनवायूचे उत्खनन या मुद्द्यांप्रश्नी फ्रान्स आणि तुर्कीतील संबंध तणावपूर्ण बनले आहेत. यापैकी भूमध्य समुद्रातील इंधनवायूच्या उत्खननासाठी तुर्कीने ग्रीस व सायप्रस या नाटो सदस्य देशांविरोधात स्वीकारलेल्या आक्रमक भूमिकेवर फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी शुक्रवारी टीका केली. तुर्कीच्या कारवाईमुळे भूमध्य समुद्रात तणाव आणि असुरक्षितता निर्माण झाल्याचा ठपका राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी ठेवला. नाटोचा सदस्य देश म्हणून तुर्कीने भूमध्य समुद्राच्या सार्वभौमत्वाच्या सुरक्षेसाठी दिलेल्या वचनांचे पालन करणे आवश्यक ठरते. पण गेल्या काही वर्षांपासून तुर्की नाटो सदस्य देशांप्रमाणे वागत नसल्याचा असा आरोप फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी केला.
तर भूमध्य समुद्रात आक्रमक भूमिका स्वीकारुन तुर्कीने ‘रेड लाईन’चे उल्लंघन करु नये. अथवा रेड लाईनचे उल्लंघन केले म्हणून फ्रान्सने सिरियात ज्याप्रकारे कारवाई केली तशीच कारवाई तुर्कीवरही करण्यात येईल, असे स्पष्ट संकेत राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी दिले. सिरियातील रासायनिक शस्त्रास्त्रांच्या साठ्यावर फ्रान्सच्या लढाऊ विमानांनी चढविलेल्या हल्ल्याची आठवण राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी करुन दिली. ही कारवाई करण्याआधी फ्रान्सने सिरियातील अस्साद राजवटीला रेड लाईन ओलांडू नये, असे बजावले होते. पण त्यानंतरही सिरियन लष्कराने सदर रासायनिक शस्त्रास्त्रांचा वापर केल्यामुळे फ्रान्सला हल्ले चढवावे लागले होते, याची जाणीव राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी तुर्कीला करुन दिली.
तर भूमध्य समुद्रात इंधनवायूचे उत्खनन आणि लिबियामध्ये बेकायदेशीरपणे शस्त्रास्त्रांची तस्करी करुन युरोपिय महासंघाच्या निर्बंधांचे उल्लंघन करणार्या तुर्कीवर निर्बंध लादावे, अशी मागणी मॅक्रॉन यांनी केली. याप्रकरणी तुर्कीवर निर्बंध लादण्याची तयारी सुरू असल्याची माहिती महासंघातील वरिष्ठ नेते जोसेफ बोरेल यांनी दिली. भूमध्य समुद्रातील या वादात महासंघ ग्रीस आणि सायप्रस यांच्या बाजूने असल्याचे बोरेल म्हणाले. तर जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल यांनी भूमध्य समुद्रातील वाद वाटाघाटीने सोडविण्याचे आवाहन केले आहे.
भूमध्य समुद्रासह, एजियन आणि ब्लॅक सीच्या क्षेत्रातील आपल्या सार्वभौम अधिकारांच्या सुरक्षेसाठी तुर्की कशाचीही हयगय करणार नाही, अशी धमकी तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप एर्दोगन यांनी दोन दिवसांपूर्वी दिली होती. त्याचबरोबर तुर्कीने भूमध्य समुद्रात ‘लाईव्ह फायर’ युद्धसरावाची घोषणा केली. तुर्कीचा हा युद्धसराव आपल्या सुरक्षेसाठी धोकादायक असल्याची टीका करुन ग्रीसने संयुक्त अरब अमिरात’च्या (युएई) साथीने हवाई सराव सुरू केला आहे. या हवाई सरावासाठी युएईच्या एफ-१६ विमानांचा ताफा दोन दिवसांपूर्वीच ग्रीसच्या क्रेटे बेटावर दाखल झाला होता. हा हवाई सराव सुरू असताना ग्रीस आणि तुर्कीची एफ-१६ विमाने आमनेसामने आल्याचे आणि त्यांच्यात ‘डॉगफाईट’ झाल्याची माहिती तुर्कीच्या संरक्षण मंत्रालयाने जाहीर केली आहे. मात्र याबाबत अधिक तपशील प्रसिद्ध झालेले नाहीत.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |