मॉस्को/अंकारा/येरेवान – मध्य आशियातील आर्मेनिया व अझरबैजानमध्ये सुरू असलेले युद्ध थांबविण्यासाठी अमेरिका, रशिया व फ्रान्सने पुन्हा एकदा संघर्षबंदीचे आवाहन केले आहे. मात्र अझरबैजान व त्याला समर्थन देणाऱ्या तुर्कीने हे आवाहन धुडकावून लावल्याचे समोर आले असून उलट अटी घालण्यास सुरुवात केली आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाने केलेली विनंती तुर्कीने यापूर्वीही नाकारली होती. तुर्कीची ही भूमिका रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या नाराजीचे कारण ठरली असून, त्यातून आर्मेनिया-अझरबैजानमध्ये सुरू असणारे युद्ध हे रशिया व तुर्कीमधील नवे ‘प्रॉक्सी वॉर’ ठरेल, असा इशारा विश्लेषकांकडून देण्यात आला आहे.
गेल्या १० दिवस मध्य आशियातील आर्मेनिया व अझरबैजानमध्ये जोरदार युद्ध सुरू आहे. या युद्धात शेकडोजणांचा बळी गेला असून त्यात दोन्ही देशांच्या जवानांसह नागरिकांचाही समावेश आहे. दोन्ही देशांनी आपापल्या सीमांवर मोठ्या प्रमाणात लष्करी जमवाजमव केली असून, ड्रोन्स, लढाऊ विमाने, क्षेपणास्त्रे व रणगाड्यांच्या सहाय्याने जोरदार हल्ले सुरू आहेत. युद्धात संयुक्त राष्ट्रांकडून बंदी टाकलेल्या ‘क्लस्टर बॉम्ब्स’चा वापर झाल्याचेही समोर आले आहे. आर्मेनियाचे नियंत्रण असलेल्या ‘नागोर्नो-कॅराबख’मधील काही गावे ताब्यात घेतल्याचा दावाही अझरबैजानने केला आहे.
हे युद्ध अधिकाधिक भडकत असतानाच जागतिक स्तरावरील प्रमुख देशांचा त्यातील सहभाग लक्ष वेधून घेणारा ठरतो आहे. युद्ध सुरू झाल्याच्या दिवसापासून तुर्कीने आपण अझरबैजानच्या पाठीशी असल्याची उघड भूमिका घेतली आहे. तुर्कीने अझरबैजानमध्ये मोठ्या प्रमाणात दहशतवादी तसेच शस्त्रास्त्रे पाठविल्याचेही समोर आले आहे. अझरबैजानमध्ये तुर्की वंशाचे नागरिक असल्याने त्याला सहाय्य करणे आपली जबाबदारी असल्याचा दावा तुर्की राष्ट्राध्यक्ष रेसेप एर्दोगन यांनी केला आहे. हा निर्णय घेणाऱ्या तुर्कीने आंतरराष्ट्रीय समुदायाला धुडकावून लावण्याची हेकेखोर भूमिकाही घेतली आहे. तुर्कीचे हे धोरण रशियाला चांगलेच नाराज करणारे ठरल्याचे दावे रशियन विश्लेषक तसेच सूत्रांकडून करण्यात येत आहेत.
आर्मेनिया व अझरबैजान हे दोन्ही देश एकेकाळी ‘सोव्हिएत युनियन’चा भाग होते. १९९१ साली त्याचे विघटन झाल्यानंतर हे देश स्वतंत्र झाले असले तरी रशिया या देशांमध्ये आपला प्रभाव अद्यापही राखून आहे. यापूर्वी १९८८ साली या दोन देशांमध्ये सुरू झालेले युद्ध रशियाच्या मध्यस्थीने थांबले होते. आर्मेनिया व अझरबैजान या दोन्ही देशांशी रशियाचे चांगले संबंध असून त्यांच्यात गेल्या अडीच दशकात झालेले छोटेमोठे संघर्ष रशियाने आपला प्रभाव वापरून मिटविले आहेत. एकेकाळी रशियन संघराज्याचा भाग असणाऱ्या देशांमध्ये वाद झाल्यास त्यात रशियाची भूमिका निर्णायक राहील, ही रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांची ठाम धारणा आहे. याच मुद्यावरून त्यांनी गेल्या दशकभरात अमेरिका व युरोपिय देशांशी उघड संघर्ष घेतल्याचेही दिसून आले आहे.
गेल्या काही वर्षांत रशियाचे तुर्कीबरोबरील संबंध संमिश्र स्वरूपाचे राहिले आहेत. रशियाकडून शस्त्रास्त्रे व इंधन खरेदी करणारा तुर्की, सिरिया तसेच लिबियात रशियन हितसंबंधांविरोधात खडा ठाकला आहे. तरीही सध्या रशियाने इतर मुद्यांवर तुर्कीशी असलेले सहकार्य रोखलेले नाही. मात्र आर्मेनिया-अझरबैजान युद्धातील तुर्कीची भूमिका पुतिन यांच्या सहनशीलतेची कसोटी घेणारी ठरत असून, ते उघडपणे तुर्की व त्याच्या हितसंबंधांविरोधात संघर्षाचा निर्णय घेऊ शकतात, असा इशारा विश्लेषक देत आहेत. यातूनच रशिया व तुर्कीमध्ये नवे ‘प्रॉक्सी वॉर’ भडकण्याचे संकेत मिळत असून हा संघर्ष दोन्ही देशांसाठी निर्णायक ठरेल, असेही सांगण्यात येत आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |