येरेवान/मॉस्को – आर्मेनियाच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला तर रशिया लष्करी हस्तक्षेप करून आर्मेनियाची जबाबदारी स्वीकारेल, असा इशारा आर्मेनियाचे पंतप्रधान निकोल पाशनियान यांनी दिला. गेले १० दिवस आर्मेनिया-अझरबैजानमध्ये जोरदार युद्ध सुरू असून दोन्ही बाजूंची मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे. अझरबैजानला तुर्कीने उघड सहाय्य पुरविले असून ‘नागोर्नो-कॅराबख’ प्रांत पूर्ण ताब्यात मिळाल्याशिवाय माघार घेणार नसल्याची उघड धमकी दिली आहे. त्याचवेळी रशियाच्या गुप्तचर यंत्रणांनी युद्ध सुरू राहिल्यास ‘नागोर्नो-कॅराबख’ इस्लामी दहशतवाद्यांचा तळ बनेल, असे बजावले आहे.
‘आर्मेनियात रशियाचा लष्करी तळ आहे आणि संयुक्त हवाईसुरक्षा यंत्रणाही सक्रिय आहे. दोन्ही देशांमध्ये झालेल्या द्विपक्षीय करारात, आर्मेनियाच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित झाल्यास या तळावर तैनात असलेले रशियन लष्कर हस्तक्षेप करेल, असा स्पष्ट उल्लेख आहे. रशिया कधी हस्तक्षेप करू शकतो याबाबतच्या तरतुदी स्पष्ट नमूद करण्यात आल्या असून, रशिया हा करार पाळेल, अशी अपेक्षा आहे’, या शब्दात आर्मेनियाच्या पंतप्रधानांनी आर्मेनिया-अझरबैजान युद्धात रशिया लवकरच उतरू शकतो, असे संकेत दिले आहेत. गेल्या १० दिवसात रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची दोनदा आर्मेनियन पंतप्रधानांशी चर्चा झाली आहे. त्यामुळे आर्मेनियन पंतप्राधानांनी केलेले वक्तव्य लक्ष वेधून घेणारे ठरते.
आर्मेनियाच्या ‘ग्यूम्रि’ शहरात रशियाचा लष्करी तळ कार्यरत असून, त्यावर तीन हजार सैनिक तैनात आहेत. त्याव्यतिरिक्त रणगाडे, तोफा, सशस्त्र वाहनांसह ‘मिग-२९’ लढाऊ विमाने व ‘एस-३००’ ही हवाईसुरक्षा यंत्रणादेखील तैनात असल्याचे सांगण्यात येते. काही वर्षांपूर्वी या तळाचे कमांडर असणाऱ्या रशियन अधिकाऱ्यांनी ‘नागोर्नो-कॅराबख’च्या ताब्यासाठी अझरबैजानने लष्करी कारवाई केली तर त्यात रशियन लष्कर सहभागी होईल, असे वक्तव्य केले होते. मात्र सध्या सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशियन लष्कराने अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही.
दरम्यान, रशियाच्या गुप्तचर यंत्रणेने आर्मेनिया-अझरबैजानमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर आखातातून मोठ्या प्रमाणात दहशतवादी व भाडोत्री मारेकरी दाखल होत असल्याचा इशारा दिला. ‘नागोर्नो-कॅराबखमध्ये शेकडो कट्टरवादी दाखल झाले असून, हजारो दाखल होण्याच्या तयारीत आहेत. हा ओघ असाच कायम राहिला तर दक्षिण कॉकेशस क्षेत्र आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांसाठी नवा तळ बनू शकतो. या भागातून रशियासह नजिकच्या देशांमध्ये दहशतवादी हल्ले चढविले जाऊ शकतात’, असे रशियाच्या ‘एसव्हीआर फॉरेन इंटेलिजन्स सर्व्हिस’चे प्रमुख सर्जेई नॅरिश्किन यांनी बजावले. सिरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर अल अस्साद यांनीही, तुर्कीने अझरबैजान युद्धात सिरियन दहशतवादी पाठविल्याचा दावा केला असून, सिरिया याचे पुरावे देऊ शकते, असेही म्हटले आहे.
यापूर्वी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी तुर्कीने आर्मेनिया-अझरबैजान युद्धात दहशतवादी उतरविल्याचा उघड आरोप केला होता. तुर्कीने हे आरोप नाकारले असले तरी दहशतवाद्यांच्या सहभागासंदर्भातील काही व्हिडिओ प्रसिद्ध झाले आहेत. सिरियातील स्थानिक गटांनीही दुजोरा दिला असून तुर्कीच्या सिक्युरिटी कंपनीज यात सामील असल्याचा दावा केला होता. तुर्कीचे सुमारे १५० लष्करी अधिकारी व सल्लागारही अझरबैजानमध्ये तैनात असल्याचे सांगण्यात येते.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |