अथेन्स/अंकारा – ‘ग्रीसवर मनोवैज्ञानिक दडपण टाकून तुर्कीच्या अजेंड्यानुसार अटी मानण्यास भाग पाडणे, ही राष्ट्राध्यक्ष रेसेप एर्दोगन यांची महत्त्वाकांक्षा आहे. पण ही गोष्ट त्यांना लष्करी संघर्षाशिवाय मिळवायची आहे. जर ग्रीसविरोधात युद्ध छेडले तर तुर्की फौजांना रणांगणात पराभव पत्करावा लागेल, याची एर्दोगन यांना पूर्ण कल्पना आहे’, असा इशारा ग्रीसच्या ‘नॅशनल डिफेन्स अकॅडमी’मधील विश्लेषक जॉर्ज फिलीस यांनी दिला. जर्मन विश्लेषक अँड्रीअस क्लुथ यांनीही, ‘कॅस्टेलोरीझो’ या ग्रीक बेटावरून ग्रीक व तुर्की या नाटो देशांमध्ये युद्धाचा भडका उडू शकतो, असे बजावले आहे. या वक्तव्यांच्या पार्श्वभूमीवर ग्रीसच्या परराष्ट्रमंत्र्यांनी आर्मेनियाला भेट दिली असून, त्यावरून चवताळलेल्या तुर्कीने ग्रीसला धमकावल्याचे वृत्तही समोर आले आहे.
गेल्या आठवड्यात, तुर्कीने ‘ओरूक रेईस’सह आपली तीन जहाजे पुन्हा भूमध्य सागरी क्षेत्रात रवाना केली होती. ही तिन्ही जहाजे २२ ऑक्टोबरपर्यंत या क्षेत्रात सक्रिय असतील, असे तुर्कीकडून सांगण्यात आले आहे. तुर्की इंधनाचा शोध सुरूच ठेवेल व आपल्या अधिकारांचेही रक्षण करेल, अशा शब्दात तुर्कीच्या ऊर्जामंत्र्यांनी मोहिमेचे समर्थन केले होते. त्यानंतर तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप एर्दोगन यांनी, ग्रीसला धमकावलेही होते. ‘तुर्कीची जहाजे त्यांचे कर्तव्य पार पाडण्यासाठी भूमध्य सागरात दाखल झाली असून, विरोध करणाऱ्यांना जशास तसे प्रत्युत्तर दिले जाईल. ग्रीस व सायप्रसने चर्चेदरम्यान दिलेली वचने पाळलेली नाहीत’, अशी धमकी एर्दोगन यांनी दिली होती. ग्रीससह अमेरिका व युरोपिय देशांनी तुर्कीला कडक शब्दात बजावल्यानंतरही राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी माघार घेण्याचे नाकारल्याचे नव्या हालचालींवरून समोर येत आहे.
या पार्श्वभूमीवर, ग्रीक तसेच जर्मन विश्लेषकांनी दोन देशांमधील युद्धाबाबत केलेली वक्तव्ये लक्ष वेधून घेणारी ठरतात. येत्या दोन दिवसात तुर्कीची जहाजे ग्रीसच्या ‘कॅस्टेलोरीझो’ या बेटापासून सहा नॉटिकल मैलांच्या हद्दीत दाखल होण्याचे संकेत आहेत. तसे झाल्यास ग्रीसकडून तीव्र प्रत्युत्तर मिळेल व युद्धाचा भडका उडेल, असा दावा ‘न्यूजबॉम्ब’ या ग्रीक वेबसाईटने केला आहे. तुर्कीकडून हल्ल्याचा प्रयत्न झाल्यास ग्रीस युरोपिय महासंघाच्या ‘आर्टिकल ४२’ नुसार लष्करी सहाय्याची मागणी करेल, असा दावाही वेबसाईटवर करण्यात आला आहे.
याच वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत विश्लेषक जॉर्ज फिलीस यांनी, तुर्कीला पराभवाचा इशारा दिला आहे. ‘ग्रीक संरक्षणदलांनी तुर्की जहाजांना फक्त रोखले तर ते मोठे यश म्हणता येणार नाही. जर तुर्कीची जहाजे ग्रीक हद्दीत आली तर ती सुरक्षित परत जाणार नाहीत, याची दक्षता आपण घ्यायला हवी. तुर्कीला असा धक्का द्यायला हवा की त्यानंतर त्यांना भूमध्य सागरी क्षेत्रातूनच माघार घेणे भाग पडेल’, असे फिलीस यांनी बजावले. त्याचवेळी तुर्कीच्या आक्रमकतेविरोधात आपल्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी ग्रीसने फ्रान्सबरोबर उघड लष्करी आघाडी उभारावी, असा सल्लाही त्यांनी दिला.
ग्रीक वेबसाईट व विश्लेषकांपाठोपाठ जर्मन विश्लेषकांनीही ग्रीस व तुर्कीमध्ये युद्ध भडकण्याचा दावा केला आहे. ‘ब्लूमबर्ग’ या आघाडीच्या न्यूज वेबसाईटवर लिहिलेल्या लेखात, अँड्रीअस क्लुथ यांनी, ग्रीस व तुर्कीमधील वाद आंतरराष्ट्रीय कायद्यांनुसार सुटणे कठीण असून, या नाटो सदस्य देशांमध्ये युद्धाचा भडका उडण्याची शक्यता वाढली आहे, असे बजावले. संयुक्त राष्ट्रसंघाच्या कायद्यांनुसार, ग्रीस आपल्या अधिकारांबाबत दावे करीत असला तरी यासंदर्भातील ठरावाला तुर्कीने मान्यता दिलेली नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले. भूमध्य सागरी क्षेत्रातील इंधन साठ्यावरून पेटणाऱ्या युद्धामागे ‘ऑटोमन’ साम्राज्याच्या अस्तानंतर ग्रीक व तुर्कीमध्ये असलेले वैर हादेखील महत्त्वाचा घटक असल्याची जाणीव क्लुथ यांनी यावेळी करून दिली.
दरम्यान, ग्रीस व तुर्कीमध्ये भूमध्य सागरी क्षेत्रावरून निर्माण झालेला वाद अधिकच चिघळण्याचे संकेत मिळाले आहेत. ग्रीसचे परराष्ट्रमंत्री निकॉस डेंडीआस यांनी नुकतीच आर्मेनियाला भेट दिल्याचे समोर आले आहे. या भेटीवरून तुर्की चांगलाच भडकला असून, या भेटीतून ग्रीस हाच समस्येचे मूळ असल्याचे तसेच समस्या निर्माण करण्यासाठी समर्थन देत असल्याचे सिद्ध होते, असा आरोप तुर्कीच्या परराष्ट्र विभागाने केला आहे. गेले तीन आठवडे आर्मेनिया-अझरबैजान युद्ध सुरू असून तुर्कीने आपले संपूर्ण समर्थन अझरबैजानच्या पाठीशी उभे केले आहे. अशा वेळी ग्रीसने आर्मेनियाला पाठिंबा देऊन तुर्कीला चिथावल्याचे दिसत आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |