हमास व हिजबुल्लाहच्या प्रमुखांची इस्रायलविरोधी संघर्षावर चर्चा

बैरूत – ‘जेरूसलेम हाच इस्रायलविरोधी संघर्षाचा केंद्रबिंदू आहे आणि लष्करी संघर्षातून जेरूसलेम मुक्त केल्याखेरीज याला दुसरा पर्याय नाही’, अशी घोषणा हमास या दहशतवादी संघटनेचा प्रमुख इस्माईल हनिया याने केली. लेबेनॉनमधील इराणसंलग्न हिजबुल्लाह या दहशतवादी संघटनेचा प्रमुख हसन नसरल्ला याच्याबरोबर झालेल्या भेटीनंतर हमासच्या प्रमुखाने हे दावे केले. हिजबुल्लाहप्रमुखाच्या भेटीआधी हनियाने इराणचा दौरा करुन प्रमुख नेत्यांशी चर्चा केली होती.

इस्रायलविरोधी

कतारमध्ये आश्रय घेतलेला हमासचा प्रमुख गेल्या काही दिवसांपासून अरब-आखातातील मित्र देशांच्या दौर्‍यावर आहे. रविवारी लेबेनॉनमध्ये दाखल झालेल्या हमासच्या प्रमुखाने राष्ट्राध्यक्ष मिशेल एयॉन, संसदेचे सभापती नबी बेरी यांची भेट घेतली. त्यानंतर इस्माईल हनियाने हिजबुल्लाह या दहशतवादी संघटनेचा प्रमुख हसन नसरल्लाची भेट घेतली. याचे तपशील प्रसिद्ध झाले नाहीत. पण या भेटीनंतर माध्यमांसमोर बोलताना हमासच्या प्रमुखाने इस्रायलविरोधी संघर्षासाठी पॅलेस्टिनींना एकजुटीचे आवाहन केले.

दोन्ही दहशतवादी संघटनेच्या प्रमुखांमध्ये इस्रायलविरोधात संघर्षाबाबत चर्चा झाल्याची माहिती आखाती व आंतरराष्ट्रीय माध्यमे देत आहेत. येत्या काळात इस्रायलच्या विरोधात हमास आणि हिजबुल्लाहची संयुक्त आघाडी कशी उभारता येईल? यासाठी मे महिन्यात इस्रायलविरोधात छेडलेल्या 11 दिवसांच्या संघर्षातील अनुभवाचा कसा वापर करता येईल? यावर हमास आणि हिजबुल्लाह या दहशतवादी संघटनेच्या प्रमुखांमध्ये खल झाल्याचे बोलले जाते.

11 दिवसांच्या संघर्षात हमासने इस्रायलवर हजारो रॉकेट्सचा मारा केला होता. यातील काही रॉकेट्स जेरूसलेमजवळ कोसळली होती. या संघर्षानंतरही आपल्याकडे हजारो रॉकेटचा साठा असल्याचा दावा हमासने केला होता. तर हिजबुल्लाहने देखील आपल्याकडे हजारो रॉकेट्स व क्षेपणास्त्रांचा साठा असल्याची घोषणा केली होती.

मे महिन्यातील संघर्षात हिजबुल्लाह सहभागी झाली नसली तरी यापुढील संघर्षात हमास व हिजबुल्लाह एकजुटीने इस्रायलवर हल्ले चढवतील, असे हिजबुल्लाहप्रमुख नसरल्लाने बजावले आहे. या पार्श्वभूमीवर, या दोन्ही दहशतवादी संघटनांच्या प्रमुखांची भेट व चर्चा निराळेच संकेत देत आहे. या भेटीमागे इराणचे इस्रायलविरोधी डावपेच असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info