अफगाणिस्तानातील आत्मघाती हल्ल्यात १८ जणांचा बळी

अफगाणिस्तानातील आत्मघाती हल्ल्यात १८ जणांचा बळी

काबुल – अफगाणिस्तानात काबुलमध्ये झालेल्या आत्मघाती हल्ल्यात १८ जणांचा बळी गेला असून ५७ जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये शालेय विद्यार्थ्यांचाही समावेश असल्याचे सांगितले जाते. अद्याप या स्फोटाची जबाबदारी कुणीही स्वीकारलेली नाही. तालिबाननेही आपला या स्फोटाशी संबंध नसल्याचे म्हटले आहे. मात्र याच्या एक दिवस आधी अफगाणिस्तानात झालेल्या हल्ल्यात २० जवानांचा बळी गेला होता व हा हल्ला तालिबाननेच घडविल्याचे उघड झाले होते.

१८ जणांचा बळी

काबुलमधील हा आत्मघाती हल्ला शैक्षणिक संस्थेला लक्ष्य करण्यासाठी झाल्याचे दिसत आहे. आत्मघाती हल्लेखोराला या संस्थेच्या इमारतीत शिरुन अधिक भयंकर घातपात घडवायचा होता. पण सुरक्षा रक्षकांनी त्याला प्रवेशद्वारापशीच रोखले. इथेच या आत्मघाती हल्लेखोराने स्वत:ला उडवून दिल्याचे सांगितले जाते. या घातपाताच्या एक दिवस आधी तालिबानने चढविलेल्या हल्ल्यात अफगाणी लष्कराच्या २० जवानांचा बळी गेला. तसेच तालिबानने दोन अफगाणी जवानांचे अपहरण केल्याचे वृत्त आहे.

अफगाणिस्तानातून अमेरिका आपले लष्कर माघारी घेण्याच्या तयारीत आहे. अशा काळात अफगाणिस्तानात हिंसाचाराचा भडका उडाला असून दहशतवादी संघटना या देशात भीषण रक्तपात घडवित आहेत. अफगाणी सरकार व तालिबानमध्ये शांतीचर्चा पुढे सरकत नसून याला आपण जबाबदार नसल्याचे दावे दोन्ही बाजूंकडून केले जातात. अशा परिस्थितीत, अमेरिकेने अफगाणिस्तानातून सैन्य मागे घेतले तर, या देशात पुन्हा एकदा अराजक माजेल, असा इशारा विश्लेषक देत आले आहेत. गेल्या काही दिवसात सुरू असलेला भीषण रक्तपात विश्लेषकांची चिंता प्रत्यक्षात उतरल्याचे दाखवून देत आहे.

नजिकच्या काळात अफगाणी सरकार आणि तालिबानमध्ये समेट झाला नाही तर याहूनही अधिक भयंकर हिंसाचाराचा अफगाणिस्तानला सामना करावा लागू शकतो, असे संकेत मिळत आहेत.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info