बर्लिन/बीजिंग – ‘चीन अतिशय धूर्तपणे युरोपसह आशिया व आफ्रिका खंडात आपला प्रभाव वाढविण्याच्या हालचाली करीत आहे. सध्या चीन संपूर्ण जगावर वर्चस्व मिळविण्याच्या अतिशय जवळ पोहोचला आहे. चीनचा हा धोका युरोपिय देशांनी वेळीच ओळखायला हवा’, असा इशारा जर्मनीचे माजी गुप्तचर प्रमुख गेरहार्ड शिंडलर यांनी दिला. काही दिवसांपूर्वीच जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल यांनी, जर्मन कंपन्यांना चीनमधून बाहेर पडण्याचा सल्ला दिला होता. तर जर्मनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी, चीनविरोधातील शीतयुद्धात युरोपने अमेरिकेला साथ देणे महत्त्वाचे असल्याचे बजावले होते.
कोरोना साथीसह इतर मुद्द्यांवरून युरोप व चीनमधील तणाव सातत्याने वाढत असून, युरोपिय महासंघाने वारंवार चीनला फटकारले आहे. मात्र चीनच्या विस्तारवादी कारवाया व आडमुठी भूमिका अद्याप कायम असून, युरोपिय महासंघात फूट पाडण्याचे तसेच व्यापारी हितसंबंधांचे दडपण आणण्याचे प्रयत्नही सुरू आहेत. आपल्यावर टीका करणाऱ्या युरोपिय नेते व अधिकाऱ्यांवर चीनकडून शीतयुद्धकालिन मानसिकता व वसाहतवादी दृष्टीकोन बाळगत असल्याचे आरोप केले जात आहेत. चीनमध्ये कार्यरत युरोपिय अधिकारी तसेच कंपन्यांना धमकावण्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. ५जी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून चीन युरोपिय संपर्कयंत्रणा ताब्यात घेण्याचे प्रयत्न करीत असल्याचेही आरोप होत आहेत.
या पार्श्वभूमीवर, गेल्या काही महिन्यात युरोपिय देशांमधील प्रमुख नेते व अधिकारी चीनविरोधात आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत. जर्मनीच्या माजी गुप्तचर प्रमुखांचा इशाराही याचाच भाग ठरतो. गेरहार्ड शिंडलर यांनी यावेळी ५जी क्षेत्रात चिनी कंपन्यांकडून असलेल्या धोक्याकडेही लक्ष वेधले. ‘हुवेई कंपनी ५जी नेटवर्कमध्ये छुप्या रीतीने माहिती मिळविण्याचे मार्ग निर्माण करू शकते. ते नक्की काय करीत आहेत, हे आपल्याला कळणारही नाही. एखादी वेळ अशी येईल की जर्मनी संकटात असेल आणि चिनी कंपनी धमकावून आपली पूर्ण यंत्रणा बंद पाडेल. जर्मनीने एखादा निर्णय घ्यावा यासाठी अशा प्रकारे दबाव टाकला जाऊ शकतो, याची जाणीव ठेवा’, या शब्दात जर्मनीच्या माजी गुप्तचर प्रमुखांनी चीनच्या कारवायांबाबत बजावले.
जर्मन सरकारने चीनवरील परावलंबित्व कमी करणे गरजेचे असून, हुवेईसारख्या कंपनीवरील बंदी त्यातील महत्त्वाचे पाऊल ठरू शकते, असा दावाही शिंडलर यांनी केला. सगळ्याच गोष्टींचा विचार व्यापारी दृष्टीकोनातून करता येणार नाही, असा परखड सल्लाही त्यांनी दिला. चीनच्या वाढत्या वर्चस्ववादाचा मुद्दा मांडताना साऊथ चायना सीमधील चीनच्या आक्रमक कारवायांकडे दुर्लक्ष करता येणार नसल्याची जाणीवही माजी गुप्तचर प्रमुखांनी करून दिली. शिंडलर २०११ ते २०१६ या कालावधीत जर्मनीच्या गुप्तचर यंत्रणेचे प्रमुख होते. याच काळात जर्मन चॅन्सेलर मर्केल यांनी चीनबरोबरील संबंध अधिक मजबूत करून व्यापार वाढविण्यासाठी पुढाकार घेतला होता. त्यामुळे या काळात गुप्तचर यंत्रणेची जबाबदारी सांभाळणाऱ्या अधिकाऱ्याने चीनबाबत दिलेला धोक्याचा इशारा महत्त्वाचा ठरतो.
गेल्या काही महिन्यात जर्मनीने हॉंगकॉंग, उघुरवंशीय तसेच व्यापाराच्या मुद्यावरून चीनला सातत्याने लक्ष्य केले आहे. गेल्याच महिन्यात जर्मनीचे परराष्ट्रमंत्री हैको मास यांनी तैवानच्या मुद्यावरूनही चिनी मंत्र्यांना पत्रकार परिषदेतच उघडपणे फटकारले होते. काही दिवसांपूर्वी जर्मनीने चीनच्या कारवायांवर नाराजी व्यक्त करून ‘इंडो-पॅसिफिक’ क्षेत्रासाठी स्वतंत्र धोरणाची घोषणा केली होती. जर्मनी हा युरोपातील आघाडीचा देश असून, सध्या युरोपिय महासंघाचे अध्यक्षपदही जर्मनीकडे आहे. या पार्श्वभूमीवर जर्मन नेतृत्व व अधिकारी वर्तुळातून चीनविरोधात घेण्यात येणारी आक्रमक भूमिका महत्त्वाची ठरते. अमेरिका, भारत, ऑस्ट्रेलिया यासारख्या प्रमुख देशांबरोबर चीनचे संबंध आधीच तणावपूर्ण स्थितीत असताना युरोपकडून मिळणारा संभाव्य धक्का चीनच्या महत्त्वाकांक्षांना धुळीस मिळवू शकतो.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |