जेरूसलेम – अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत धांदलीचे आरोप तीव्र होऊ लागले असून एक्झिट पोलचे निकाल जो बिडेन यांच्या बाजूने दाखविले जात आहेत. अमेरिकी निवडणुकीवरील या एक्झिट पोलच्या निकालावर इस्रायलमधून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागली आहे. जो बिडेन अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षापदी निवडून आले आणि त्यांनी इराणबरोबरचा अणुकरार पुन्हा लागू केला तर इस्रायल आणि इराण यांच्यात संघर्ष पेट घेईल, असा इशारा इस्रायलच्या वरिष्ठ मंत्र्याने दिला. दरम्यान, काही दिवसांपूर्वी इराणने अमेरिकेतील निवडणुकीत ट्रम्प यांचा पराभव आवश्यक असल्याची प्रतिक्रिया दिली होती.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाचे डेमोक्रॅट पक्षाचे उमेदवार जो बिडेन यांच्या इराणविषयक भूमिकेवर इस्रायलमध्ये नाराजी आहे. इराणबरोबर नव्याने अणुकरार केला तरच इराणची अण्वस्त्रनिर्मिती रोखता येऊ शकते, अशी घोषणा करून बिडेन यांनी इराणवर लादलेल्या निर्बंधांना विरोध केला आहे. तसेच इस्रायल व अरब देशांमध्ये प्रस्थापित झालेल्या सहकार्याबाबतही बिडेन फारसे उत्साही नसल्याचे याआधी उघड झाले होते. या व्यतिरिक्त इराणच्या विरोधात कठोर भूमिका घेणारे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांच्यावर बिडेन यांनी याआधी टीका केली होती. या पार्श्वभूमीवर बिडेन यांच्या बाजूने एक्झिट पोलने कल दाखविल्यानंतर त्यावर इस्रायली नेत्यांकडून प्रतिक्रिया उमटू लागली आहे.
‘आपण राष्ट्राध्यक्ष झालो तर इराणबरोबर पुन्हा अणुकरार केला जाईल, असे बिडेन यांनी जाहीर केले होते. असे झाले तर इस्रायल आणि इराणमध्ये हिंसक संघर्ष भडकेल’, असा इशारा इस्रायलचे वरिष्ठ मंत्री ताची हानेबी यांनी दिला. बिडेन यांच्या इराणबाबतच्या या भूमिकेशी इस्रायल सहमत नसल्याचे हानेबी यांनी सांगितले. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांच्याबरोबर इस्रायलचे इतर मंत्री व नेते २०१५ साली झालेल्या अणुकराराकडे अमेरिकेची सर्वात मोठी चूक म्हणून पाहत असल्याचे हानेबी यांनी आठवण करून दिली. त्याचबरोबर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी केलेल्या चुकीची बिडेन यांनी पुनरावृत्ती करू नये, असे सूचक इशारा हानेबी यांनी दिला.
त्याचबरोबर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणबाबत स्वीकारलेल्या भूमिकेचे हानेबी यांनी स्वागत केले. ट्रम्प यांनी इराणला नवा प्रस्ताव देण्याचे जाहीर केले असले तरी इराणवरील निर्बंधांचे ओझे कमी करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे, याकडे हानेबी यांनी लक्ष्य वेधले. तर ओबामा यांनी पाच वर्षांपूर्वी केलेला आणि बिडेन यांनी समर्थन दिलेला अणुकरार इराणला अण्वस्त्रसज्जतेपासून रोखणारा नव्हता, अशी टीका इस्रायली संसदेच्या सुरक्षा व परराष्ट्र धोरणाचे अध्यक्ष हॉसेर यांनी केली. इराण अण्वस्त्रसज्ज झाला तर सौदी अरेबिया, तुर्की आणि इजिप्त देखील अण्वस्त्रनिर्मितीच्या स्पर्धेत उतरतील, असा इशारा हॉसेर यांनी दिला.
दरम्यान, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी गेल्या पाच वर्षात इराणबरोबरच्या अणुकरारातून माघार घेत लादलेल्या निर्बंधांचे इस्रायलसह अरब देशांनी देखील स्वागत केले आहे. अमेरिकेच्या या निर्बंधांमुळे इराणची कोंडी झाल्याचा दावा केला जातो. तर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प पुन्हा निवडून आले तर ते अमेरिकन जनतेसाठी योग्य नसेल, अशी टीका करून इराणने काही दिवसांपूर्वी बिडेन यांच्या निवडीचे अप्रत्यक्षरित्या समर्थन केले होते.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |