दमास्कस – इस्रायलच्या लढाऊ विमानांंनी सिरियाची राजधानी दमास्कस आणि कुनित्रा प्रांतात हवाई हल्ले चढविल्याचा दावा सिरियन माध्यमांनी केला. या हवाई हल्ल्यात आठ जण ठार झाल्याचे सिरियातील मानवाधिकार संघटनेने म्हटले आहे. त्याचबरोबर इस्रायली विमानांनी येथील हिजबुल्लाहच्या तळांना लक्ष्य केल्याची माहिती समोर येत आहे. सिरियात हल्ले चढवून पळ काढणाऱ्या इस्रायलचा अंत जवळ आल्याची धमकी इराणने दोन दिवसांपूर्वीच दिली होती. त्यामुळे सिरियात नवा हल्ला चढवून इस्रायलने आपण इराणच्या धमक्यांना भीक घालत नसल्याचे दाखवून दिले आहे.
सिरियाचे मुखपत्र ‘सना’ आणि ‘अल-अखबारिया’ या वृत्तवाहिनीने हल्ल्याची इस्रायलच्या हल्ल्याची बातमी प्रसिद्ध केली. मंगळवारी मध्यरात्री 12 वाजताच्या सुमारास इस्रायलच्या लढाऊ विमानांनी राजधानी दमास्कसच्या दक्षिणेकडील भागात त्याचबरोबर गोलान सीमेजवळील कुनित्रा प्रांतात हल्ले चढविले. सिरियन लष्कराच्या हवाई सुरक्षा यंत्रणेने इस्रायलचे हल्ले उधळून लावल्याचा दावा सिरियन माध्यमांनी केला. त्याचबरोबर या हल्ल्यात जीवितहानी झाली नसून थोडीफार वित्तहानी झाल्याचे म्हटले आहे.
मात्र ब्रिटनस्थित सिरियन मानवाधिकार संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, सिरियातील इराणी लष्कर आणि हिजबुल्लाहच्या ताब्यातील शस्त्रास्त्राच्या गोदामांना लक्ष्य करण्यात आले. ‘जेबल मेन हाईट्स’ या लष्करी तळावरील हल्ल्यात हिजबुल्लाहचे आठ दहशतवादी ठार झाल्याचे या मानवाधिकार संघटनेने सांगितले. एका इस्रायली वर्तमानपत्राने देखील सिरियातील हिजबुल्लाहच्या तळावर हल्ले चढविल्याचे म्हटले आहे. इस्रायलच्या लष्कराने यावर प्रतिक्रिया दिलेली नाही.
आठवड्याभरात सिरियातील इराणसंलग्न गटांवर झालेला हा दुसरा हल्ला ठरतो. गेल्या बुधवारी सिरियातील गोलान भागात इराणच्या कुद्स फोर्सेसच्या तळावर इस्रायली लष्कराने हल्ला चढविला होता. या हल्ल्यात कुद्स फोर्सेसचे किमान 11 जवान ठार झाल्याची माहिती समोर आली होती. इस्रायली लष्करानेच या हल्ल्याची माहिती उघड केली होती. तसेच या हल्ल्याच्या आधीचे व नंतरचे सॅटेलाईट फोटोग्राफ्स प्रसिद्ध करून, इराणच्या तळावरील जमिनीवरुन हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांचे गोदाम नष्ट केल्याचे इस्रायली लष्कराने जाहीर केले होते.
यावर खवळलेल्या इराणने इस्रायलला धमकावले होते. ‘सिरियात हल्ले चढवून पळ काढणाऱ्या इस्रायलचा काळ संपत आला आहे. यापुढे सिरियातील हल्ल्यांना प्रत्युत्तर मिळेल’, अशी धमकी इराणच्या परराष्ट्र मंत्रालयने दिली होती. इराणने दिलेल्या या धमकीचा मुद्दा इस्रायलने संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत मांडला आहे.
इस्रायलच्या गोलान टेकड्यांच्या सीमेजवळ इराणच्या लष्करी हालचाली तसेच संबंधित ठिकाणी स्फोटके पेरून हल्ला चढविण्याचा इराणचा कट 1974 सालच्या कराराचे उल्लंघन करणारा असल्याची आठवण राष्ट्रसंघातील इस्रायली राजदूत गिलाड एरडन यांनी करून दिली. इराणच्या जवानांची इस्रायलच्या सीमेजवळील उपस्थिती येथील स्थानिकांबरोबरच राष्ट्रसंघाच्या शांतीसैनिकांच्या सुरक्षेसाठी देखील धोकादायक ठरते. त्यामुळे सिरियातील इराणचे जवान व इराणसंलग्न गटांची हकालपट्टी करावी, अशी मागणी एरडन यांनी राष्ट्रसंघाला पाठविलेल्या पत्रात केली आहे.
सिरियातील अस्थैर्याचा लाभ घेऊन इराणने सिरियात आपले जवान तैनात केले आहेत. तसेच इराणशी एकनिष्ठ असणारी हिजबुल्लाह या दहशतवादी संघटनेचे सदस्यही सिरियाच्या अस्साद राजवटीसाठी लढत आहेत. सिरियातील इराणची ही तैनाती इस्रायलच्या सुरक्षेसाठी धोकादायक असल्याचे सांगून इस्रायलने सिरियातील इराणच्या लष्करी तळ व हिजबुल्लाहच्या दहशतवाद्यांवर घणाघाती हल्ले सुरू केले होते. या हल्ल्यांच्या बातम्यांवर अधिकृत पातळीवर प्रतिक्रिया न देण्याचे धोरण इस्रायलने स्वीकारले आहे.
इराणने सिरियातील हल्ल्यांवरून इस्रायलला दिलेल्या धमकीनंतर काही दिवस उलटत नाही तोच नवा हवाई हल्ला चढवून इस्रायलने आपण इराणच्या धमक्यांना भीक घालत नसल्याचे दाखवून दिले आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |