तेहरान – अणुशास्त्रज्ञाच्या हत्येसाठी इस्रायलच जबाबदार असल्याचा आरोप इराणने अधिकृत पातळीवर केला आहे. मोहसिन फखरीझादेह यांच्या हत्येसाठी वापरलेली शस्त्रास्त्रे इस्रायली बनावटीची होती. या हत्येला जबाबदार असलेल्यांचा लवकरच सूड उगवला जाईल. त्यांना नेमके व निर्णायक प्रत्युत्तर मिळेल, अशी धमकी इराणचे लष्करी अधिकारी देत आहेत. तर या लष्करी प्रत्युत्तराबरोबर अणुप्रकल्पातील युरेनियमची निर्मिती दुपटीने वाढविण्याची प्रक्षोभक घोषणा इराणच्या अणुऊर्जा संघटनेचे प्रवक्ता बेहरोज कमालवंदी यांनी केली आहे.
गेल्या शुक्रवारी राजधानी तेहरानजवळ फखरीझादेह यांच्या मोटारीवर हल्ला चढवून त्यांची हत्या इस्रायलनेच घडविली, असा आरोप इराणचे नेते आणि सुरक्षा यंत्रणांनी केला आहे. काही महिन्यांपूर्वी नातांझ अणुप्रकल्पावरील हल्ल्यात सहभागी असलेले आणि फखरीझादेह यांची हत्या घडविणारे सारखेच असल्याचे इराणच्या अणुऊर्जा संघटनेचे प्रमुख कमालवंदी यांनी इराणी वर्तमानपत्राशी बोलताना सांगितले.
फखरीझादेह यांच्या हत्या झाली, त्या ठिकाणाहून हस्तगत केलेल्या शस्त्रास्त्रांवर इस्रायली बनावटीचे बोधचिन्हे होती, अशी माहिती इराणी सुरक्षा अधिकार्याने वृत्तवाहिनीशी बोलताना दिली. इराणच्या एका संकेतस्थळाने तर फखरीझादेह यांची हत्या इस्रायली अत्याधुनिक शस्त्रांनीच, पण सॅटेलाईटने नियंत्रित करुन घडविण्यात आल्याचा आरोप केला आहे.
फखरीझादेह यांच्या हत्येवर इराणच्या राजकीय तसेच लष्करी क्षेत्रातून जहाल प्रतिक्रिया उमटत आहेत. ‘अणुशास्त्रज्ञाची हत्या घडविणार्यांना दुहेरी प्रत्युत्तर द्यावे लागेल. हल्लेखोरांवर निर्णायक हल्ले चढविणे आवश्यक आहेच. पण त्याचबरोबर अणुप्रकल्पातील युरेनियमची निर्मिती दुपटीने वाढवून आम्ही या हत्येला प्रत्युत्तर देऊ’, अशी घोषणा कमालवंदी यांनी केली. इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते आयातुल्ला खामेनी यांनी आपल्या शास्त्रज्ञांना अणुकार्यक्रमाचा वेग वाढविण्याचे आदेश दिले आहेत.
इराणच्या संसदेतही आणीबाणीमध्ये काही ठराव पारित करण्यात आले. यामध्ये इराणच्या अणुप्रकल्पातील संवर्धित युरेनियमच्या महिन्यातील मर्यादेत दुपटीने वाढ करण्याच्या ठरावाचा समावेश होता. नातांझ अणुप्रकल्पातील अणुकार्यक्रमाचा वेग वाढवून आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाच्या निरिक्षकांना यापुढे इराणमध्ये प्रवेश दिला जाऊ नये, अशी मागणी करण्यात आली.
इराणच्या संसदेत अमेरिका आणि इस्रायलच्या विनाशाच्या घोषणाही देण्यात आल्या. इराणचे संरक्षणमंत्री जनरल अमिर हातामी यांनीही फखरीझादेह यांची हत्या झाल्यानंतरही इराणच्या अणुकार्यक्रमाचा वेग कमी होणार नसल्याचे जाहीर केले आहे.
दरम्यान, इराणने अणुकराराच्या मर्यादा ओलांडून १२ पट अधिक संवर्धित युरेनियमचा साठा केल्याची चिंता अणुऊर्जा आयोगाने गेल्या महिन्यात व्यक्त केली होती. अशा परिस्थितीत, फखरीझादेह यांच्या हत्येनंतर इराणमधून उमटणार्या प्रतिक्रिया अधिक चिंताजनक ठरत आहेत.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |