कट्टरपंथिय गटांकडून असणार्‍या ‘बायो टेररिझम’च्या धोक्याविरोधात पाश्‍चिमात्यांनी सज्ज राहिलेले बरे

ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर यांचा इशारा

लंडन – ‘कट्टरपंथिय हे सुरक्षेला असणारा पहिला व सर्वात मोठा धोका आहे. त्याचवेळी कट्टरपंथिय गटांकडून जैविक शस्त्रांचा वापर होण्याचा धोका असून पाश्‍चात्यांनी त्याविरोधात सज्ज रहायला हवे’, असा इशारा ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर यांनी दिला आहे. सोमवारी ब्रिटनच्या आघाडीच्या अभ्यासगटात ‘९/११ नंतरची दोन दशके’ या विषयावर बोलताना ब्लेअर यांनी हा इशारा दिला. यावेळी त्यांनी अफगाणिस्तानचा उल्लेख करताना, दहशतवादाविरोधातील लढाईत लष्करी तैनाती आवश्यक असल्याकडेही लक्ष वेधले.

टोनी ब्लेअर

ब्रिटनच्या ‘रॉयल युनायटेड सर्व्हिसेस इन्स्टिट्यूट’(रुसी) या अभ्यासगटाने सोमवारी एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात ब्रिटनच्या माजी पंतप्रधानांनी ९/११च्या दहशतवादी हल्ल्यानंतरची स्थिती व धोके यावर आपली भूमिका मांडली. ‘कट्टरपंथिय विचारसरणी व त्यातून होणारा हिंसाचार हा आजही सुरक्षेला असणारा पहिला धोका आहे. जर त्याकडे लक्ष दिले नाही तर तो आपल्यापर्यंत येऊन पोहोचू शकतो. हिंसाचाराचे केंद्र दूर असले तरी त्याचा धोका टाळता येणारा नाही, हे ९/११च्या हल्ल्याने दाखवून दिले’, असे ब्लेअर यांनी सांगितले.

टोनी ब्लेअर

‘कोरोनाच्या साथीने जगाला घातक विषाणूंची ओळख करून दिली आहे. जैविक दहशतवाद ही केवळ विज्ञानकथांमधील काल्पनिक संकल्पना राहिली नसून वास्तवात येत आहे. कट्टरपंथिय गट त्याचा वापर करु शकतात. या धोक्याविरोधात पाश्‍चात्य देशांनी सज्ज रहायला हवे’, असा इशारा ब्रिटनच्या माजी पंतप्रधानांनी यावेळी दिला. यावेळी ब्लेअर यांनी अफगाणिस्तानच्या मुद्याकडेही लक्ष वेधले.

अमेरिका यापुढे लष्करी तैनातीसाठी फारशी उत्सुक असेल, असे वाटत नाही. अशा स्थितीत ब्रिटनने युरोपिय देशांबरोबर अधिक सहकार्य करून दहशतवादाचा धोका टाळण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, असा सल्लाही त्यांनी दिला. यावेळी त्यांनी आफ्रिकेच्या ‘साहेल रिजन’मधील दहशतवादाच्या धोक्याचाही उल्लेख केला. दहशतवादाविरोधातील संघर्षासाठी लष्करी तैनाती हा आवश्यक घटक असल्याचेही ब्लेअर यांनी यावेळी बजावले. स्थानिक लष्कर हे प्राधान्य असले तरी दरवेळेस ते शक्य नाही, असे सांगून त्यांनी परदेशी लष्करी तैनातीचे समर्थनही केले.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info