इथिओपियातील वांशिक हत्याकांडात ८०हून अधिक जणांचा बळी

इथिओपियातील वांशिक हत्याकांडात ८०हून अधिक जणांचा बळी

आदिस अबाबा – इथिओपियाच्या बेनिशंगुल-गुमुझ प्रांतात घडविण्यात आलेल्या वांशिक हत्याकांडात ८०हून अधिक जणांचा बळी गेल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. मंगळवारी पहाटे दलेत्ती भागातील नागरिक झोपेत असतानाच सशस्त्र टोळ्यांनी निर्घृण हल्ला चढविल्याची माहिती मानवाधिकार आयोगाने दिली. या हत्याकांडानंतर लष्कराने विशेष शोधमोहिम हाती घेतली असली तरी अद्याप हल्लेखोरांना पकडण्यात यश मिळाले नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. गेल्या सहा महिन्यात बेनिशंगुल-गुमुझ प्रांतात झालेला हा पाचवा मोठा हल्ला ठरला आहे.

मंगळवारी पहाटे सहा ते सातच्या दरम्यान १००हून अधिक हल्लेखोरांनी बंदुका व सुरे घेऊन देलेत्तीमधील घरांवर हल्ला केला. यावेळी मोठ्या प्रमाणात जाळपोळही करण्यात आली. बळींमध्ये दोन वर्षाच्या मुलापासून ४५ वर्षापर्यंतच्या व्यक्तींचा समावेश असल्याची माहिती ‘इथिओपिया ह्युमन राईट्स कमिशन’ने दिली. हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही गटाने स्वीकारली नसली तरी त्यामागे ‘गुमूझ मिलिशिया’चा हात असल्याचा आरोप स्थानिक राजकीय नेत्यांकडून करण्यात येत आहे.

इथिओपियात ८०हून अधिक वांशिक गट असून ‘ओरोमो’ व ‘अम्हारा’ त्यातील प्रमुख गट मानले जातात. बेनिशंगुल-गुमुझ हा प्रांत ‘अम्हारा’ वंशियाचे प्राबल्य असलेल्या प्रांताला जोडलेला आहे. गेल्या काही वर्षात अम्हारावंशियांनी बेनिशंगुल-गुमुझ प्रांतात घुसखोरी सुरू केल्याचा दावा स्थानिकांकडून करण्यात येत आहे. या घुसखोरीला स्थानिक ‘गुमूझ’वंशियांचा विरोध असून त्यातून हल्ल्यांचे सत्र सुरू झाले असावे, असे सांगण्यात येते.

यापूर्वी डिसेंबर महिन्यात झालेल्या हल्ल्यात तब्बल २००हून अधिक जणांचा बळी गेला होता. तर नोव्हेंबर महिन्यात झालेल्या हल्ल्यांमध्ये ५४ हून अधिक जण मारले गेले होते. या हल्ल्यांनंतर पंतप्रधान अबि अहमद यांनी सदर भागांना भेटही दिली होती. या भेटीनंतर बेनिशंगुल-गुमुझ प्रांताचा भाग असलेल्या ‘मेतेकल’मध्ये अतिरिक्त सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली होती. मात्र या तैनातीनंतरही मोठे हत्याकांड झाल्याने खळबळ उडाली आहे.

अडीच वर्षांपूर्वी पंतप्रधान अहमद यांनी इथिओपियाची सूत्रे हाती घेतली होती. त्यानंतर शेजारी देश इरिट्रियाबरोबरील संघर्ष थांबविण्यात त्यांनी यश मिळविले होते. त्याबद्दल अहमद यांना नोबेल शांती पुरस्काराने सन्मानितही करण्यात आले होते. मात्र शेजारी देशांबरोबर शांतता प्रस्थापित करणारे पंतप्रधान देशातील वांशिक संघर्ष मिटवू शकलेले नाहीत. नोव्हेंबर महिन्यात पंतप्रधान अबि अहमद यांनी तिगरे प्रांतातील बंडखोरांविरोधात निर्णायक लष्करी कारवाई हाती घेतली होती. त्याला यश मिळाल्याचा दावा सरकारकडून करण्यात आला असला तरी तिगरेतील हिंसाचार अद्यापही थांबलेला नाही.

त्याचवेळी सुदान व इजिप्तबरोबरील तणावही चिघळण्याचे संकेत मिळत आहेत. सुदानने काही दिवसांपूर्वी सीमाभागात कारवाई करून मोठा भाग ताब्यात घेतल्याचा दावा केला होता. तर इजिप्तने नाईल नदीवरील धरणाच्या मुद्यावरीन इथिओपियाला बजावले होते.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info