इस्रायलच्या संरक्षणदल प्रमुखांचे लष्कराला इराणवर हल्ल्यासाठी सज्ज राहण्याचे आदेश

इस्रायलच्या संरक्षणदल प्रमुखांचे लष्कराला इराणवर हल्ल्यासाठी सज्ज राहण्याचे आदेश

जेरूसलेम – अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी इराणवरील निर्बंध मागे घेण्याची चूक करू नये, असे इस्रायलचे पंतप्रधान नेत्यान्याहू यांनी गेल्या आठवड्यात बजावले होते. तरीही बायडेन प्रशासन इराणबरोबरच्या नव्या अणुकरारावर ठाम आहे. अमेरिकेच्या या भूमिकेवर संताप व्यक्त करून इस्रायलचे संरक्षणदल प्रमुख लेफ्टनंट जनरल अविव कोशावी यांनी आपल्या लष्कराला इराणवर हल्ल्यासाठी सज्जता वाढविण्याचे आदेश दिले आहेत. गेल्या आठवड्याभरातत दुसर्‍यांदा इस्रायलच्या संरक्षणदल प्रमुखांनी बायडेन प्रशासनाला उद्देशून हा इशारा दिला आहे.

संरक्षणदल, आदेश, जनरल अविव कोशावी, निर्बंध, हल्ला, इराण, इस्रायल, ज्यो बायडेन, TWW, Third World War

गेल्या आठवड्यात ज्यो बायडेन यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली. शपथग्रहण कार्यक्रमाला चोवीस तास उलटत नाही तोच बायडेन प्रशासनाने इराणबरोबर नवा अणुकरार करण्याची घोषणा केली. यासाठी इराणने आपल्या नव्या अटी मान्य कराव्या, असेही बायडेन प्रशासनाने स्पष्ट केले. इराणने अमेरिकेचा हा प्रस्ताव धुडकावला आहे. त्याचबरोबर बायडेन प्रशासनाने इराणवरील सर्व निर्बंध बिनशर्त मागे घ्यावे. तसे करताना अमेरिकेने इराणकडून कोणत्याही नव्या अपेक्षा ठेवू नये, असे खडसावून इराणचे परराष्ट्रमंत्री जावेद झरिफ यांनी अमेरिकेच्या अटी इराण मानणार नसल्याचे स्पष्ट केले.

यानंतरही बायडेन प्रशासनाने इराणबरोबर नव्याने अणुकरार करण्यासाठी हालचाली वाढविल्या आहेत. बायडेन प्रशासनाच्या विशेष प्रतिनिधींनी इराणच्या मुद्यावर युरोपमधील मित्रदेशांशी चर्चा केल्याच्या बातम्या समोर येत आहेत. तर २०१५ साली इराणबरोबरच्या अणुकरारात महत्त्वाची भूमिका घेणारे रॉबर्ट मॅली यांना बायडेन प्रशासनाने पुन्हा इराणबाबतच्या निर्णयप्रक्रियेत सामील केले आहे. यामुळे इस्रायल तसेच सौदी अरेबिया आणि मित्रदेशांमध्ये नाराजी पसरली आहे.

संरक्षणदल, आदेश, जनरल अविव कोशावी, निर्बंध, हल्ला, इराण, इस्रायल, ज्यो बायडेन, TWW, Third World War

इस्रायलचे संरक्षणदलप्रमुख लेफ्टनंट जनरल कोशावी यांनी देखील ‘इन्स्टिट्युट फॉर नॅशनल सिक्युरिटी स्टडिज्’ या अभ्यासगटाला संबोधित करताना बायडेन प्रशासनाला पुढील परिणामांची जाणीव करून दिली. ‘कितीही कठोर अटी लादून अमेरिकेने इराणबरोबर नव्याने अणुकरार केला तरी तो सामरिकदृष्ट्या योग्य ठरणार नाही. या अणुकरारामुळे इराणचा अणुकार्यक्रम अधिक वेग पकडेल व इस्रायलला असलेला धोका वाढत जाईल. ते इस्रायल कदापि खपवून घेणार नाही. आवश्यकता निर्माण झालीच तर इस्रायल स्वबळावर इराणवर लष्करी कारवाई करील’, असा जळजळीत इशारा इस्रायलच्या संरक्षणदलप्रमुखांनी दिला.

‘इराणवरील कारवाईसाठी लष्कराला वेगवेगळ्या पर्यायी योजना तयार करण्याचे आदेश दिले आहेत. इस्रायलचे नेतृत्व यासंबंधीचा निर्णय घेईल. पण लष्कराच्या कर्तव्याचा भाग म्हणून आम्ही सर्व तयारी ठेवलेली आहे’, असेही लेफ्टनंट जनरल कोशावी पुढे म्हणाले. याआधीही इस्रायलच्या संरक्षणदलप्रमुखांनीच इराणवर हल्ल्यासाठी पर्यायी योजनांवर विचार करीत असल्याचे ठणकावले होते. दरम्यान, अमेरिकेने इराणवरील निर्बंध शिथिल केले तर इस्रायल इराणवर कारवाई करील, अशी धमकी इस्रायलने आठवड्यापूर्वीच दिली होती. यामुळे बायडेन यांच्या प्रशासनावरील दडपण वाढत चालले आहे.

English  हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info