जेरूसलेम/वॉशिंग्टन – ‘आता अमेरिका इराणच्या अणुप्रकल्पांवर हल्ला चढविणार नाही. त्यामुळे अण्वस्त्रधारी इराण स्वीकारायचा किंवा इराणला धोका टाळण्यासाठी स्वतंत्रपणे कारवाई करायची, याचा निर्णय इस्रायलला घ्यावच लागेल’, असे इस्रायलचे वरिष्ठ मंत्री ताशी हनेबी यांनी बजावले आहे. अमेरिकेने पर्शियन आखातासाठी तैनात केलेली ‘युएसएस निमित्झ’ ही विमानवाहू युद्धनौका या क्षेत्रातून माघारी घेतली आहे. यानंतर इस्रायलमधून या संतप्त प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.
अमेरिकेचे तेव्हाचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही आठवड्यांपूर्वी ‘युएसएस निमित्झ’ला पर्शियन आखातात तैनात केले होते. इराणच्या वाढत्या लष्करी हालचालींमुळे या क्षेत्रात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, इराणला इशारा देण्यासाठी ही तैनाती केल्याचे ट्रम्प प्रशासनाने जाहीर केले होते. पण अमेरिकेचे संरक्षण मुख्यालय पेंटॅगॉनचे प्रवक्ते जॉन किरबाय यांनी मंगळवारी माध्यमांशी बोलताना, ‘युएसएस निमित्झ’ला पर्शियन आखात सोडण्याचे आदेश दिल्याचे जाहीर केले.
‘आखातातील घडामोडींना उत्तर देण्यासाठी अमेरिकेने या क्षेत्रात जोरदार तैनाती केली आहे. त्यामुळे अजस्त्र विमानवाहू युद्धनौकेची या क्षेत्रात आवश्यकता नाही, असे संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन यांचे आदेश आहेत’, असे किरबाय म्हणाले. किरबाय यांच्या या घोषणेनंतर इस्रायलचे वरिष्ठ मंत्री आणि पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांचे विश्वासू असलेल्या हनेबी यांनी इस्रायलला परिस्थितीची जाणीव करून दिली.
इराणच्या अणुकार्यक्रमापासून धोका वाढला म्हणून अमेरिका या देशाच्या अणुप्रकल्पावर हल्ला चढविल, अशा भ्रमात इस्रायलींनी राहू नये, असे हनेबी यांनी बजावले. इराणबरोबर अणुकरार करण्यासाठी वेगाने हालचाली करणारे बायडेन प्रशासन इराणवर हल्ला चढवू शकत नाही, असे हनेबी यांनी एका रेडिओवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ठासून सांगितले. ‘कदाचित भविष्यात इस्रायलला इराणवर स्वतंत्रपणे कारवाई करू लागू शकते. इस्रायलच्या नेतृत्वाला याबाबत कठोर निर्णय घ्यावे लागू शकतात’, असे हनेबी म्हणाले.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी सूत्रे हातात घेतल्यापासून इराणबरोबर अणुकरार करण्याचे संकेत दिले आहेत. त्याचबरोबर बायडेन प्रशासन इराणवर दबाव कायम राखण्यात अपयशी ठरत असल्याची टीका इस्रायल व आखाती माध्यमे करीत आहेत. बायडेन प्रशासनाच्या या भूमिकेमुळे इस्रायल तसेच सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात (युएई) या आखातातील मित्रदेशांमध्ये नाराजी वाढत चालल्याचे हनेबी यांच्या प्रतिक्रियेतून उघड होत आहे.
दरम्यान, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू येत्या काही दिवसात युएईचा दौरा करणार आहेत. इस्रायलच्या पंतप्रधानांचा हा ऐतिहासिक आखाती दौरा असेल. अमेरिकेच्या बायडेन प्रशासनाची भूमिका आणि इराणबरोबरच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, नेत्यान्याहू यांच्या युएई भेटीकडे पाहिले जाते.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |