वॉशिंग्टन – रशिया व चीनच्या आक्रमक कारवायांच्या पार्श्वभूमीवर, त्यांच्याबरोबर निर्माण झालेल्या क्षेत्रिय समस्येचे रुपांतर अणुयुद्धात होण्याची शक्यता वास्तवात उतरु शकते, असा इशारा अमेरिकेच्या ‘स्ट्रॅटेजिक कमांड’च्या प्रमुखांनी दिला. अमेरिकेच्या नेतृत्त्वानेही याची जाणीव ठेऊन धोरणात बदल करण्यासी आवश्यकता आहे, असा सल्लाही ‘स्ट्रॅटेजिक कमांड’चे प्रमुख ऍडमिरल चार्ल्स रिचर्ड यांनी दिला. यावेळी ऍडमिरल रिचर्ड यांनी रशिया व चीनकडून होणारे सायबरहल्ले तसेच अंतराळक्षेत्रातील धोक्यांकडेही लक्ष वेधले आहे.
अमेरिकेतील अण्वस्त्रांची संपूर्ण जबाबदारी ‘स्टॅटेजिक कमांड’वर असल्याने त्याच्या प्रमुखांनी अणयुद्धाबाबत केलेले वक्तव्य महत्त्वाचे मानले जाते. ऍडमिरल रिचर्ड यांनी अमेरिकेच्या ‘नॅव्हल इन्स्टिट्यूट’कडून प्रसिद्ध होणार्या ‘प्रोसिडिंग्ज्’ या मासिकात आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ‘फोर्जिंग २१स्ट सेंच्युरी स्ट्रॅटेजिक डिटरन्स’ या शीर्षकाखाली लिहिलेल्या लेखात ‘स्ट्रॅटेजिक कमांड’च्या प्रमुखांनी सोव्हिएत युनियनच्या विघटनाचा उल्लेख केला आहे. या घटनेनंतर अमेरिकेच्या संरक्षण विभागाने दुसर्या देशाबरोबर थेट अणुयुद्ध होऊ शकते, ही शक्यता काही काळासाठी बाजूला ठेवली होती, अशी कबुली ऍडमिरल रिचर्ड यांनी दिली.
मात्र गेल्या काही वर्षातील रशिया व चीनच्या हालचालींच्या पार्श्वभूमीवर अमेरिकी संरक्षणदलांना भूमिका बदलणे भाग पडत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. ‘रशिया व चीनच्या आक्रमक हालचाली आंतरराष्ट्रीय व्यवस्था व शांतीला आव्हान देणार्या ठरल्या आहेत. शीतयुद्ध संपल्यानंतर प्रथमच सत्तेचा व लष्करी बळाचा अत्यंत आक्रमक वापर होताना दिसत असून यात सायबरहल्ले तसेच अंतराळक्षेत्रातील धोक्यांचाही समावेश आहे’, असे ऍडमिरल रिचर्ड यांनी बजावले.
‘रशिया व चीन या दोन्ही देशांनी आपले सामर्थ्य प्रचंड प्रमाणात वाढविले आहे. पारंपारिक संघर्षात गमावलेली एखादी गोष्ट हा थेट आपल्या राजवटीला धोका आहे, अशी समजूत हे देश करून घेऊ शकतात. तसे झाले तर एखाद्या क्षेत्रिय समस्येवरून भडकलेल्या संघर्षाचे रुपांतर अणुयुद्धात होण्याची शक्यता वास्तवात उतरु शकते’, असा इशारा अमेरिकेच्या ‘स्ट्रॅटेजिक कमांड’च्या प्रमुखांनी दिला. अणुयुद्ध वास्तवात शक्य नाही ही समजूत अमेरिकेच्या संरक्षणदलांनीही बदलण्याची गरज असून हे वास्तव समजून तयारी करायला हवी, असा सल्लाही त्यांनी दिला.
रशिया व चीन हे दोन्ही देश सध्या सुरू असलेल्या कोरोना साथीचा फायदा उचलून आपल्या घातक क्षमता वाढवित असल्याचा दावाही अमेरिकी अधिकार्यांनी केला. रशियाने दशकभरापूर्वीच आपल्या ‘न्यूक्लिअर फोर्सेस’चे आधुनिकीकरण सुरू केले होते आणि सध्या जवळपास ७० टक्क्यांपर्यंत आधुनिकीकरण पूर्ण झाले आहे, याकडे ऍडमिरल रिचर्ड यांनी लक्ष वेधले. त्याचवेळी रशिया हायपरसोनिक व्हेईकल्स व न्यूक्लिअर टॉर्पेडोज् यासारख्या अनोख्या यंत्रणाही विकसित करीत आहे, याचीही जाणीव त्यांनी करून दिली.
चीनच्या आण्विक क्षमतांनाही कमी लेखून चालणार नाही व हा देश अमेरिकेचा प्रमुख सामरिक प्रतिस्पर्धी म्हणून पुढे येत असल्याचा दावा अमेरिकेच्या ‘स्ट्रॅटेजिक कमांड’च्या प्रमुखांनी केला.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |