राजकीय असंतोष व अनिश्‍चिततेच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेतील बंदुकांची विक्री प्रचंड प्रमाणात वाढली – इलिनॉयस राज्यात एका महिन्यात १० लाखांहून अधिक बंदुकांची विक्री

राजकीय असंतोष व अनिश्‍चिततेच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेतील बंदुकांची विक्री प्रचंड प्रमाणात वाढली – इलिनॉयस राज्यात एका महिन्यात १० लाखांहून अधिक बंदुकांची विक्री

वॉशिंग्टन – कोरोना साथीचा वाढता फैलाव, राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक व राजकीय असंतोषाच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेतील बंदुकांची विक्री प्रचंड प्रमाणात वाढल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या वर्षी अमेरिकेतील बंदुकांची विक्री तब्बल ३४ टक्क्यांनी वाढली असून खरेदी करणार्‍यांमधील ४० टक्के पहिल्यांदाच खरेदी करणार्‍यांपैकी होते, असे सांगण्यात येते. २०२० साली झालेली वाढ २०२१मध्येही सुरू राहिली असून जानेवारी महिन्यात तब्बल ४१ लाख बंदुकांची विक्री झाल्याचे उघड झाले आहे.

बंदुकांची विक्री, वाढ, इलिनॉयस, बंदुक, खरेदी, अमेरिका, कृष्णवर्णिय, TWW, Third World War

अमेरिकेतील प्रमुख तपासयंत्रणा ‘फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन’ने(एफबीआय) बंदुकांच्या वाढत्या विक्रीची माहिती दिली आहे. या माहितीनुसार, २०२० साली अमेरिकेत एकूण २ कोटी, ११ लाख बंदुकींची विक्री झाली. २०१९ साली ही आकडेवारी एक कोटी, ३२ लाख अशी होती. वर्षभरात त्यात तब्बल ६० टक्क्यांची वाढ झाली आहे. यापूर्वी २०१६ साली अमेरिकेत दीड कोटींहून अधिक बंदुकांची विक्री झाली होती. त्याची तुलना करता ३० टक्क्यांहून अधिक वाढ नोंदविण्यात आल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

बंदुकांची खरेदी करणार्‍यांमध्ये ४० टक्के म्हणजेच ५० लाखांहून अधिक जण पहिल्यांदाच शस्त्र खरेदी करणार्‍यांपैकी असल्याचे समोर आले आहे. त्याचबरोबर बंदुका खरेदी करणार्‍या नागरिकांमध्ये कृष्णवर्णियांची तसेच स्त्रियांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याची माहिती ‘सीएनएन’ या वृत्तवाहिनीने दिली आहे. २०२० साली बंदुका खरेदी करणार्‍या कृष्णवर्णियांच्या संख्येत ५८ टक्क्यांची वाढ झाल्याची माहिती ‘नॅशनल शूटिंग स्पोर्टस् फाऊंडेशन’च्या हवाल्याने देत असल्याचे ‘सीएनएन’ने म्हटले आहे.

२०२० साली बंदुकांच्या खरेदीला मिळालेला वेग नव्या वर्षातही कायम राहिला असून हे वर्ष नवा विक्रम नोंदविणारे ठरेल, असा दावा या क्षेत्रातील तज्ज्ञ तसेच विश्‍लेषकांकडून करण्यात आला आहे. २०२१च्या जानेवारी महिन्यात तब्बल ४१ लाख बंदुकांची विक्री करण्यात आली आहे. हा गेल्या दोन दशकातील विक्रम असून गेल्या वर्षीच्या तुलनेत ही वाढ ६० टक्के इतकी प्रचंड आहे. एकट्या इलिनॉयस राज्यात जानेवारी महिन्यात १० लाखांहून अधिक बंदुकांची विक्री झाली आहे. इलिनॉयसव्यतिरिक्त अमेरिकेतील नऊ राज्यांमध्ये एका महिन्याच्या अवधीत एक लाखाहून अधिक बंदुकांची विक्री नोंदविण्यात आली आहे.

शस्त्रांच्या या वाढत्या विक्रीमागे कोरोनाव्हायरसची साथ, अमेरिकेत झालेली आंदोलने, राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक आणि राजकीय असंतोष व अनिश्‍चितता यासारखी कारणे असल्याचा दावा तज्ज्ञ तसेच विश्‍लेषकांकडून करण्यात आला आहे. अमेरिकेत गेल्या वर्षी ‘ब्लॅक लाईव्हज् मॅटर’ या कृष्णवर्णियांच्या गटाकडून देशभरात हिंसक निदर्शने झाली होती. या निदर्शनांमध्ये मोठ्या प्रमाणात जाळपोळ व लुटालुटीच्या घटना घडल्या होत्या. नोव्हेंबर महिन्यात झालेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेतील तीव्र राजकीय मतभेद व असंतोषही समोर आला होता. गेल्या महिन्यात राजधानी वॉशिंग्टनमध्ये कॅपिटल हिलवर झालेला हिंसाचार अमेरिकी जनतेसह संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेणारा ठरला होता.

दरम्यान, कोरोना साथीच्या पार्श्‍वभूमीवर जाहीर झालेले लॉकडाऊन व इतर निर्बंधांमुळे चिडचिड तसेच तणाव वाढला असून त्याचे परिणाम पुढील काळात दिसून येतील, असा दावा समाजशास्त्रज्ञांकडून करण्यात येत आहे.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info