अणुकरारासाठी अमेरिकेने इराणला धाकात ठेवलेच पाहिजे

- अमेरिकेच्या माजी संरक्षणमंत्र्यांसह वरिष्ठ अधिकार्‍यांचा इशारा

व्हिएन्ना – इराणच्या अणुकरारावर व्हिएन्ना इथे सुरू असलेली चर्चा स्थागित झाली आहे. इराणचे प्रतिनिधी आपल्या सरकारशी चर्चा करण्यासाठी मायदेशी परतल्याने ही चर्चा काही काळासाठी थांबविण्यात आली. या वाटाघाटींचा वापर करून इराण वेळ काढत आहे व या अवधीचा वापर इराण अण्वस्त्रे विकसित करण्यासाठी करील, असा इशारा इस्रायलने याआधीच दिला होता. युरोपिय देशांनीही  व्हिएन्नामधील चर्चा स्थगित झाली, ही निराश करणारी बाब असल्याचे म्हटले आहे. तर अमेरिकेच्या माजी संरक्षणमंत्री तसेच वरिष्ठ लष्करी व राजनैतिक अधिकार्‍यांनी बायडेन प्रशासनाला इराणला धडकी भरेल अशी कारवाई करण्याची मागणी करणारे पत्र पाठविले आहे. त्याखेरीज इराण अणुकरारासाठी तयार होणार नाही, असा दावा या पत्रात करण्यात आला आहे.

अणुकरारासाठी

इराणचा अणुकार्यक्रम वेगाने पुढे चालला आहे. अणुबॉम्ब विकसित करण्याचे ध्येय गाठण्याच्या जवळ इराण पोहोचला असल्याचे दावे आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाकडूनही केले जात आहेत. अशा परिस्थितीत इराणला रोखण्याची वेळ हातातून निसटत चालली आहे, असा इशारा इस्रायल देत आहेत. इतकेच नाही तर आखातातील देशांनीही इराणच्या विरोधात एकजूट करून इराण अण्वस्त्रसज्ज झालेला खपवून घेणार नाही, असे धमकावले आहे. सौदी अरेबियाचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी तर व्हिएन्ना येथे सुरू असलेल्या वाटाघाटीत सौदी अरेबियालाही सहभागी करून घेण्याची मागणी नुकत्याच पार पडलेल्या ‘जीसीसी’च्या बैठकीत केली होती. मात्र  बायडेन प्रशासन अजूनही इराणबाबतची उदार भूमिका सोडून द्यायला तयार नसल्याची टीका होत आहे.

व्हिएन्ना येथील वाटाघाटीत अमेरिका व युरोपिय देशांनी समोर ठेवलेल्या प्रस्तावाबाबत आपल्या देशाच्या नेतृत्त्वाशी चर्चा करणे आवश्यक असल्याचे सांगून इराणचे प्रतिनिधी मायदेशी परतले. यामुळे चर्चा स्थगित झाली असून यावर युरोपिय देशांच्या राजनैतिक अधिकार्‍यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. चर्चा स्थगित झाली, ही निराश करणारी बाब ठरते, असे युरोपिय देशांच्या राजनैतिक अधिकार्‍यांनी म्हटले आहे. नेमक्या या काळात बायडेन प्रशासनाला अमेरिकेच्या माजी संरक्षणमंत्र्यांसह संरक्षणदलांशी निगडीत असलेल्या माजी वरिष्ठ अधिकार्‍यांनी पाठविलेले पत्र चर्चेत आले आहे.

अणुकरारासाठी

अमेरिकेचे माजी संरक्षणमंत्री लिऑन पॅनेट्टा, माजी जनरल डेव्हिड पेट्रॉस, माजी उपसंरक्षणमंत्री मिशेल फ्लॉरनी, माजी लोकप्रतिनिधी हॉवर्ड बर्मेन आणि जेन हार्मन आणि प्रख्यात विश्‍लेषक रॉबर्ट सॅटलॉफ तसेच डेनिस रोझ यांनी पाठविलेल्या संयुक्त पत्रात बायडेन यांच्या प्रशासनाला इराणबाबत अत्यंत महत्त्वाची मागणी करण्यात आलेली आहे. अणुकार्यक्रमावरील चर्चेबाबत चालढकल करणार्‍या इराणला धाक दाखविणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी अमेरिकेने व्यापक युद्धसरावाचे आयोजन करण्याची गरज आहे. किंवा अमेरिका हल्ला चढवू शकते, याची जाणीव इराणला करून द्यावी लागेल. अशा स्वरुपाची भीती उत्पन्न झाल्याखेरीज इराणला अणुकराराची गरज वाटणार नाही, असा इशारा या सर्वांनी आपल्या पत्रात दिला आहे.

गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेने लष्करी हालचाली वाढवून इराणला इशारे देण्याचे प्रयत्न केले होते. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन आपल्या देशासमोर इराणला रोखण्यासाठ लष्करी पर्यायही असल्याचे वारंवार सांगत आहेत. त्याचा इराणवर फारसा परिणाम झालेला नाही. अशा परिस्थितीत इराणला धाकात ठेवण्याची माजी मंत्री, माजी वरिष्ठ अधिकारी व लोकप्रतिनिधी तसेच विश्‍लेषकांनी केलेली मागणी बायडेन प्रशासनावर अधिकच दडपण वाढवित आहे. त्याचवेळी कुठलीही किंमत मोजून इराणला अण्वस्त्रसज्ज होऊ देणार नाही, असे सांगणार्‍या इस्रायलचा संयम देखील संपत आल्याचे स्पष्टपणे दिसू लागले आहे.

इराणला रोखण्यासाठी इस्रायलला आखाती देशांचे सहाय्य मिळू लागल्याचेही दिसत आहे. याचेही दडपण बायडेन प्रशासनावर येत आहे. त्यामुळे इराणच्या अणुकार्यक्रमाचा मुद्दा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांसमोरील सर्वात मोठे आव्हान ठरत असल्याचे दिसते आहे.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info